Satellite Collision Alerts Pudhari
तंत्रज्ञान

Satellite Collision Alerts: अंतराळातील ‘ट्रॅफिक’ वाढलं; 1.5 लाख अपघात होण्याचे इशारे, उपग्रहाची दिशा 18 वेळा बदलली

Satellite Collision Alerts: 2025 मध्ये भारतीय उपग्रहांसाठी 1.5 लाखांहून अधिक अपघात नोंदवले आहेत. ISRO ला अनेक वेळा कक्षा बदलून धोके टाळावे लागले.

पुढारी वृत्तसेवा

Satellite Collision Alerts: पृथ्वीभोवतीचं अंतराळ आता अक्षरशः ‘हाय-स्पीड ट्रॅफिक’मध्ये बदलत चाललं आहे. 2025 मध्ये भारतीय उपग्रहांसाठी तब्बल 1.5 लाखांहून अधिक ‘कोलिजन अलर्ट्स’ (टक्कर होण्याचे इशारे) दिले आहेत. यामुळे अंतराळातील वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचं गंभीर चित्र समोर आलं आहे.

अंतराळात वाढती गर्दी

Indian Space Situational Assessment Report 2025 नुसार, जगभरात सुमारे 1.6 लाख ‘निअर-मिस’ अलर्ट्स तयार झाले. यापैकी अनेक इशारे अमेरिकेच्या स्पेस कमांडकडून दिले जातात. या अलर्ट्समुळे लक्षात येतं की उपग्रहांच्या कक्षात (orbits) आता किती गर्दी झाली आहे.

ISRO ला सतत सतर्क राहावं लागतं

या वाढत्या धोक्यामुळे ISRO ला वर्षभर सतत लक्ष ठेवावं लागलं. 2025 मध्ये भारतीय उपग्रहांनी एकूण 18 वेळा ‘Collision Avoidance Manoeuvre’ (CAM) केले. म्हणजे अपघात टाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 14 वेळा लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आणि 4 वेळा जिओसिंक्रोनस ऑर्बिट (GEO) मध्ये त्यांनी अपघात टाळण्याचे काम केले.

योजना बदलण्याची वेळ

अंतराळातील धोके टाळण्यासाठी ISRO ला अनेक वेळा आपले प्लॅन बदलावे लागले. 82 उपग्रह हालचालींच्या योजना बदलण्यात आल्या, GEO उपग्रहांसाठी 2 योजना बदलल्या. यावरून धोका किती वाढला आहे, हे स्पष्ट होतं.

चांद्रयान-2 वरही परिणाम

फक्त पृथ्वीभोवतीच नाही, तर अंतराळ मोहिमांवरही याचा परिणाम झाला. चांद्रयान-2 ऑर्बिटरने 16 वेळा कक्षा बदलली आणि त्यातील 2 वेळा संभाव्य धोक्यामुळे योजना बदलावी लागली.

जागतिक स्तरावर विक्रमी लाँच

2025 मध्ये जगभरात 315 यशस्वी लाँच झाले, ज्यातून 4,651 वस्तू अंतराळात पाठवण्यात आल्या. यापैकी 4,198 सक्रिय उपग्रह आहेत, तर अनेक जुने अवशेष (space debris) अजूनही कक्षेत फिरत आहेत.

वाढत चाललेला धोका

1,911 वस्तू पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट झाल्या असल्या तरी एकूण अंतराळातील वस्तूंची संख्या वाढतच आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही वर्षांत उपग्रहांची संख्या अवकाशातील कचऱ्यापेक्षा जास्त होऊ शकते.

अंतराळातील वाढती गर्दी म्हणजे अधिक अपघात होण्याचा धोका, मिशन्ससाठी काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आणि अचूक ट्रॅकिंग करावे लागणार. 2025 मध्ये मिळालेले 1.5 लाखांहून अधिक अपघाताचे इशारे हे अंतराळातील वाढत्या धोक्याचे संकेत आहेत. उपग्रहांची संख्या वाढत आहेत, कक्षा अरुंद होत आहेत आणि सुरक्षितता राखणं अधिक आव्हानात्मक होत चाललं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT