फीचर्स

Valentine's Day 2026 special | 'Single' असणं गुन्हा आहे का?…जाणून घ्या बदलत्या जगाची नवी परिभाषा

Single असणं गुन्हा नाही. तो एक वैयक्तिक निर्णय आहे, त्याचा सन्मान समाजातील प्रत्येक व्यक्तिने केला पाहिजे

पुढारी वृत्तसेवा

आजच्या बदलत्या काळात भारतासारख्या देशात शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेषतः मुंबई, पुणे किंवा बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये तरुण-तरुणी करिअरला प्राधान्य देण्यापायी लग्नाला दुय्यम स्थान देत आहेत किंवा काही वेळा अविवाहित राहण्याचा निर्णय देखील घेत आहेत.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि जागतिक संस्कृतीशी वाढलेल्या संपर्कामुळे “Single” राहणं ही आता काही अनोखी गोष्ट उरलेली नाही. तरीही ग्रामीण भागात किंवा पारंपरिक कुटुंबव्यवस्थेत अजूनही “लग्न कधी करणार?” हा प्रश्न सतत विचारला जातो. आणि मग मनात प्रश्न उभा राहतो... 'Single असणं खरंच गुन्हा आहे का?'

समाजाचा दृष्टिकोन आणि वास्तव

आजही समाजात असा समज प्रचलित आहे की, जो व्यक्ती Single आहे, तो एकटा, दुःखी किंवा त्याच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत तर हा दृष्टिकोन अधिक तीव्र असतो. “वय निघून चाललंय…”, “कोण मिळत नाही का?”, “स्वभाव कठीण असावा…” अशा टिप्पणी सहजपणे केल्या जातात. पण Single असणं म्हणजे अपयश नव्हे; अनेकदा तो एक जाणीवपूर्वक घेतलेला परिपक्व निर्णय असतो.

Single असणं म्हणजे काय?

Single असणं म्हणजे एखादी व्यक्ती विवाहबंधनात किंवा प्रेमसंबंधात नसणे. ही एक वैयक्तिक जीवनस्थिती आहे. गुन्हा नव्हे. गुन्हा म्हणजे कायदा मोडणे; परंतु अविवाहित राहणे हे कोणत्याही कायद्याच्या विरोधात नाही. उलट भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. लग्न करायचं की नाही, कधी करायचं हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे.

प्रेमाची बदलती संकल्पना

पूर्वी प्रेम म्हणजे आयुष्यभराची एकत्र वाटचाल अशी धारणा होती. पण आज आत्मनिर्भरता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. अनेक तरुण-तरुणी आधी स्वतःला ओळखू इच्छितात, करिअर घडवू इच्छितात किंवा भावनिक परिपक्वता साधू पाहतात. म्हणूनच Single राहणं ही कमतरता नसून आत्मजाणीव आहे.

लग्न म्हणजेच प्रेम? एक गैरसमज

समाजाने तयार केलेलं समीकरण असं की, लग्न म्हणजे प्रेमाचं अंतिम रूप. पण वास्तव वेगळं आहे. अनेक विवाहित नात्यांमध्ये प्रेमापेक्षा तडजोडी, अपेक्षा आणि दबाव जास्त असतो. याउलट अनेक Single व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर, समाधानी आणि आनंदी असलेले दिसून येतात. प्रेम केवळ जोडीदारापुरतं मर्यादित नसतं. ते मित्रांमध्ये, कुटुंबात, कामात, छंदात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी असलेल्या नात्यातही असू शकतं.

लोक काय म्हणतील? ; घाईघाईचा निर्णय

लोक काय म्हणतील? या भीतीपोटी अनेक जण घाईघाईने लग्न करतात. काही वेळा अशा निर्णयांमुळे नातेसंबंध टिकत नाहीत आणि तणाव वाढतो. समाजाच्या दबावापेक्षा स्वतःच्या मानसिक तयारीला प्राधान्य देणं अधिक शहाणपणाचं ठरतं. जर एखादी व्यक्ती अजून तयार नसेल, तर Single राहणं हे चुकीचं कसं ठरू शकतं?

Single असणं म्हणजे स्वातंत्र्याची निवड

आज Single असणं म्हणजे एकटेपणा नव्हे; तर स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याची निवड आहे. स्वतःचे निर्णय, स्वतःच्या चुका आणि स्वतःचा आनंद याची जबाबदारी स्वतः घेणं, हेच खऱ्या परिपक्वतेचं लक्षण आहे. जर लग्न न करणं कोणालाही दुखावत नसेल आणि कायद्याने तो गुन्हा नसेल, तर समाजाला त्यात आक्षेप का असावा?

भारतातील महान व्यक्ती आणि त्यांची निवड

भारतात अनेक महान व्यक्तींनी अविवाहित राहूनही आयुष्यात मोठी उंची गाठली. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर विवाह केला नाही, पण विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत राष्ट्रपतीपद भूषवले. अटल बिहारी वाजपेयी हेही अविवाहित राहिले; तरी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. स्वामी विवेकानंद यांनी संसार न करता अध्यात्म, मानवसेवा आणि राष्ट्रजागृतीसाठी आयुष्य अर्पण केले. या सर्व व्यक्तींनी Single राहूनही व्यापक, सकारात्मक आणि समाजाभिमुख विचार जपले. यावरून स्पष्ट होतं की माणसाची महानता त्याच्या वैवाहिक स्थितीवर नाही, तर त्याच्या विचारांच्या उंचीवर ठरते.

Single राहणं नाही तर सिंगल विचार ठरतोय चुकीचा

Single राहणं चुकीचं नाही. पण जर एखादी व्यक्ती फक्त स्वतःपुरती मर्यादित राहिली, समाजापासून दूर गेली, जबाबदाऱ्या टाळल्या तर तो ‘Single’ विचार ठरतो आणि तोच खरा चुकीचा आहे. प्रश्न असा नाही की आपण Single आहोत की नाही; प्रश्न असा आहे आपला विचार किती मोठा, सकारात्मक आणि समाजाभिमुख आहे? Single असणं गुन्हा नाही. तो एक वैयक्तिक निर्णय आहे आणि प्रत्येक निर्णयाचा सन्मान समाजातील प्रत्येक व्यक्तिने केला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT