फीचर्स

Exam Stress : मुलांना समजून घ्या, परीक्षेचे टेन्शन देऊ नका; मानसोपचार तज्ज्ञांचा पालकांना सल्ला (Video)

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच अधिक टेन्शन (Exam Stress) असते. त्या तणावातून पालक मुलांना सतत परीक्षेसंदर्भात विचारतात. पेपर कसा गेला?, किती गुणांचा सोडवला?, काय चुकलं, काय बरोबर आलं? यासारख्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना पालकवर्ग त्रासून सोडतो. त्यातूनच मुले तणावात जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांचा तणाव हलका करणारी चर्चा केली पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मेराज कादरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी आता परिक्षा कालावधीत नो टेन्शनची भुमिका घेणे आवश्यक आहे. पालकांनी परिक्षा आहे, अभ्यास कर, असा तगादा न लावता पाल्यांची प्रकृती उत्तम ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार तसेच पुरेशी झोप याकडे लक्ष दिले पाहिजे. कमी झोप झाल्यानेही मुले तणावात जाऊ शकतात. त्यामुळे मुले टेन्शन फ्रि कसे राहतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा टर्निंग पॉइंट असतात. त्यामुळे विद्यार्थी अधिक चिंता करतात. अभ्यास केलेला असला तरी प्रत्यक्ष परीक्षेत त्यांचा गोंधळ उडतो. त्यात पालक आणखी भर घालतात. त्यामुळे पालकांनी या काळात मुलांना भावनिक आधार दिला पाहिजे. मुलांनी परीक्षेला गेल्यावर दीर्घ श्वास घेऊन सर्व आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी मुलांना पेपरबाबत जास्त काही न विचारता त्यांना आधार दिला पाहिजे. तसेच, परीक्षेच्या काळात मुलांच्या चांगल्या गुणांचे कौतूक केले पाहिजे.

पालकांनी घ्यावयाची काळजी

  • परीक्षेच्या काळात पालकांनी पाल्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याच्या वागण्या, बोलण्यात बदल झाल्यास त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे.
  • परीक्षेच्या काळात घरातील वातावरण शांत ठेवावे. त्यामुळे मुले प्रसन्न राहतील.
  • पालकांनी मुलांना स्वतःवर विश्‍वास ठेवण्याची प्रेरणा द्यावी.
  • मुलांना सकारात्मक गोष्टींची आठवण करून दिली पाहिजे.
  • मुलांना आत्मविश्‍वास द्यावा. तो हे काम सहज करू शकतो, असा विश्वास द्यावा.
  • पेपर कसा गेला, किती गुणांचा सोडविला हे तणाव निर्माण करणारे प्रश्‍न टाळावे.
  • एकच सुचना मुलांना परत-परत देऊ नका.

विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी (Exam Stress)

  • विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करावा.
  • स्वतःवर विश्‍वास ठेवावा.
  • परिक्षा म्हणजे जीवन नाही. परीक्षेला परिक्षाच समजावी. शिक्षणापुरतेच महत्त्व द्यावे.
  • मोबाईलचा वापर टाळावा. स्क्रीन टाईम कमी ठेवावा. जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही.
  • प्रकृती चांगली ठेवण्यासाठी पोटभर जेवावे. आरोग्य बिघडल्यास पेपर सोडविणेही कठीण होईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT