Aastha Choubey Community of Wisdom: शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके वाचणे, परीक्षा देणे आणि चांगले गुण मिळवणे नव्हे, तर मुलांना विचार करायला, स्वतःचे मत मांडायला आणि आयुष्यातील अडचणींवर मात करायला शिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हाच विचार घेऊन आस्था चौबे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. त्यांच्या 'कम्युनिटी ऑफ विस्डम' (COW) या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे.
आस्था या फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राच्या तृतीय वर्षात शिकत असून, ह्युमन रिसोर्सेसमध्येही त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. २०२३ मध्ये त्यांनी कम्युनिटी ऑफ विस्डम या उपक्रमाची सुरुवात केली. सध्या त्या TEDxFLAME University २०२६-२७ च्या मुख्य संयोजक आणि लायसन्सी म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
या उपक्रमाची प्रेरणा त्यांना स्वतःच्या शालेय अनुभवातून मिळाली. आस्था यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतले होते. काही वर्षांनी त्या आपल्या जुन्या शाळेत गेल्या असता, विद्यार्थ्यांच्या वागण्यात आणि शाळेच्या स्वच्छतेबाबतच्या जबाबदारीत फारसा बदल झालेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. एका विद्यार्थ्याने 'आम्ही इथे फक्त शिकायला येतो, त्याने काय फरक पडतो?' असे उत्तर दिले. या उत्तराने त्यांना विचार करायला भाग पाडले. मुलांना अभ्यासासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीवही व्हायला हवी, असे त्यांना वाटले.
कोरोनाच्या काळात त्यांनी मर्यादित साधनांमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. स्वतःच्या खाऊच्या पैशातून पुस्तके खरेदी केली आणि भिंगाच्या मदतीने साधा प्रोजेक्टरही तयार केला. अवघ्या १८ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज सहा शाळांमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.
सध्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटल्यानंतर विशेष वर्ग घेतले जातात. संवाद कौशल्य, आत्मविश्वास, चिकित्सक विचार, समस्या सोडवणे, इतरांच्या मतांचा आदर आणि नेतृत्वगुण यांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना शाळेतील समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते.
शाळांच्या अभ्यासक्रमामुळे जीवनकौशल्यांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, हे मोठे आव्हान असल्याचे आस्था सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार उपक्रमात बदल केले जातात. २०३० पर्यंत किमान ५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, आस्था यांना फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. अशोका, केआरईए आणि अझीम प्रेमजी विद्यापीठांकडूनही त्यांना पूर्ण शिष्यवृत्तीच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. फ्लेम विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या डीन रोल ऑफ ऑनरमध्येही त्यांचा समावेश झाला आहे.
भविष्यात प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. शिक्षणातून मुलांनी केवळ माहिती मिळवू नये, तर स्वतंत्र विचार करावा आणि जबाबदार नागरिक बनावे, हाच आस्था यांच्या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.