अंबरनाथ (ठाणे) : पैशासाठी मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे आणखीन एक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आले आहे. कर्ज बुडवण्यासाठी एका महिलेने आपल्याच साथीदाराच्या मदतीने चोरीचा बनाव केला.
मात्र त्याच दरम्यान महिलेचा दिर घरी आल्याने महिलेच्या साथीदाराने त्याच्या डोक्यावर हातोडीने आघात केला. तर बिंग फुटू नये, यासाठी या महिलेने स्वतःच्या कपाळाला काचेच्या ग्लासने मारून स्वतःला जखमी केले. मात्र पोलिसांच्या खाक्यापुढे चोरीचा बनाव टिकू शकला नाही व हे बिंग फुटले.
सोने तारण ठेवून कर्ज बुडवण्यासाठी शिवगंगा नगर येथील एका महिलेने शक्कल लढवून आपल्या साथीदाराच्या मदतीने आपल्याच घरी चोरीचा बनाव केला. या साथीदाराने तब्बल सात लाखांचा सोन्याचा ऐवज चोरला व तो पसार झाला. या चोरट्याला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही चोरी झाल्याने पोलिसांना आधीच वेगळा संशय आला होता. त्यानुसार त्यांनी आपला खाक्या वापरून सत्य समोर आणले. त्यामुळे या महिलेनेच हा चोरीचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा साथीदार चोरटा रविराज कसबे (37) याला अटक केली असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाणे करीत आहे.
चोरट्याला महिलेच्या दिराने प्रतिकार केल्याने त्याने दिराला हातोड्याने डोक्यात प्रहार केला. रक्तबंबाळ झालेल्या दिराला स्थानिक समाजसेवक अविनाश सुरशे यांनी तात्काळ उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा आघात आणखीन जोराने झाला असता तर, महिलेच्या दिराचा जीव सुद्धा गेला असता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने कामगिरी केल्याने चोरीचा बनाव समोर आला आहे. त्यामुळे आता या महिलेला देखील आरोपी रविराज कसबे याच्या जोडीला आरोपीच्या पिंजर्यात उभे राहावे लागेल?