क्राईम डायरी

पिंपरी : शहरातून साडेतीन किलो गांजा जप्त

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरात पाच ठिकाणी गांजा पकडण्यात आला आहे. यामध्ये एकूण सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवायांमध्ये तीन किलो 390 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यातील पहिल्या कारवाईमध्ये सचिन धर्मा बधाले (32, रा. मिंढेवाडी, ता. मावळ), ज्ञानेश्वर लोंढे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यातील सचिन याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 91 हजार 575 रुपयांचा तीन किलो 663 गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.गुन्हे शाखा युनिट पाचने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे दुसरी कारवाई केली. त्यात प्रकाश राघू ढोरे (61, रा. इंदोरी, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्याकडून 11.06 ग्रॅम गांजा आणि चिलीम असा 520 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई देहूरोड पोलिसांनी केली आहे. सोहेल शाकीर इनामदार (23), अनिकेत हेमंत भोरे (23, दोघे रा. देहूरोड) यांना अटक केली असून त्यांच्याकडून 200 रुपयांचा 10 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. हे दोघेजण एका शाळेजवळ गांजा ओढत बसले असताना पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
चौथी कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बालाजीनगर झोपडपट्टी येथे केली.

त्यात पोलिसांनी विजय मरिअप्पा गोटे (20, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. आरोपी विजय एका कंपनीच्या भिंतीच्या कडेला बसून गांजा ओढत असताना कारवाई केली आहे.
पाचवी कारवाई चाकण पोलिसांनी केली आहे. अंकित विरविरेन्द्र सिंग (26, रा. चिंबळीफाटा, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चिलीम आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी अंकित देखील गांजा ओढताना पोलिसांना आढळून आला आहे.

SCROLL FOR NEXT