डोंबिवली (ठाणे) : कमरेला गावठी कट्टा लावून खाकी वर्दीचा रूबाब दाखवत फुशारक्या मारणाऱ्या एका पठ्ठ्याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गौरीपाड्यातून जेरबंद केले. पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या या बदमाशाकडून पोलिसांनी गावठी कट्ट्यासह पोलिसी गणवेश हस्तगत केला आहे. या बदमाशाने पोलिस असल्याची बतावणी करून गुन्हे केल्याचा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी त्यादिशेने तपासचक्रांना वेग दिला आहे.
सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण (१९, रा. बाबडी म्हात्रे चाळ, मिलींद नगर, कल्याण-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैद्य धंदे करणाऱ्या, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या, अंमली पदार्थ तसेच प्रतिबंधीत पदार्थांचा साठा, वितरण, विक्री करणाऱ्या बदमाशांवर कठोर कारवाई करण्याचे जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी फर्मान सोडले आहे. त्यानुसार पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांनी कारवायांच्या मोहिमांना वेग दिला आहे. अशातच कल्याणात खडकपाडा पोलिसांच्या हाती कट्टाधारी तोतया पोलिस अधिकारी लागला आहे.
कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरामध्ये एक इसम अग्निशस्त्रे घेऊन येणार असल्याची खबर खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजू लोखंडे, किरण शिर्के, संजय चव्हाण, गणेश चव्हाण, महेश बगाड, ललीत शिंदे, नवनाथ काळे आणि सुरजब खंडाळे यांचे पथक तैनात केले. या पथकाने गौरीपाडा परिसरात फिल्डिंग लावली. एका ठिकाणी एक इसम संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता चाहो बाजूंनी कडे करून त्याची जागीची गठडी वळली. चौकशी दरम्यान सनीकुमार पाल उर्फ चौहाण असे स्वतःचे नाव सांगणाऱ्या या बदमाशाकडून २५ हजार रूपये किंमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा हस्तगत करण्यात आला. शिवाय कस्सून चौकशी केली असता त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू पाहून पोलिसही अवाक् झाले. या पठ्ठ्याकडे चक्क पोलिस अधिकाऱ्याचे दोन युनिफॉर्म आढळून आले. युनिफॉर्मच्या शर्टच्या दोन्ही खांद्यावर एक-एक स्टार, निळ्या व लाल रंगाची रिबीन, स्टीलचे दोन मपो, शर्टच्या डाव्या दंडावर महाराष्ट्र पोलीसचा कापडी बॅच, खाकी रंगाचे लाईनयार्ड, त्याखाली काळ्या रंगाची शिट्टी, शर्टच्या डाव्या दंडावर महाराष्ट्र पोलीसचा कापडी बॅच आढळून आला.
आरोपीच्या विरोधात शस्त्र सह महाराष्ट्र पोलिस अधिनीयम सन १९५१ चे कलम ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अधिनियम कलम ३, २५ कलम (१) व (३), १३५ अन्वये अटक करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले. आरोपीने पोलिस युनिफॉर्मचा दुरूपयोग केला आहे का ? तसेच त्याच्याकडे सापडलेल्या गावठी कट्ट्याचा वापर केला आहे का ? त्याच्या विरोधात यापूर्वी अन्य कोणत्या पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत का याचा चौकस तपास सुरू केल्याचेही एसीपी कल्याणजी घेटे यांनी सांगितले.