Thane Crime News | डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटकेत
ठाणे : तुम्ही विदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्ज असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल तीन कोटी चार लाखांची ऑनलाईन लूट करणार्या तीन जणांच्या टोळीस ठाणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर बन्सीलाल जैन (63, रा. दादर), महेश पवन कोठारी (36, रा. सांताक्रूज), धवल संतोष भालेराव (26, रा. भांडुप) अशी या भामट्यांची नावे असून त्यांनी फसवणूक करून आपल्या खात्यात वळती केलेली रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवल्याचे देखील समोर आले आहे.
ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका नागरिकास काही महिन्यांपूर्वी एक फोन कॉल आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने तुम्ही विदेशात पाठवलेले पार्सल पोलिसांनी जप्त केले असून त्यात एक लॅपटॉप, 140 ग्रॅम एमडी ड्रग्ज, थाई पासपोर्ट, क्रेडिट कार्ड व कपडे सापडले आहेत अशी बतावणी केली. त्यानंतर काही वेळातच दुसर्या एका क्रमांकावरून तक्रारदारांना फोन आला. त्याने तो सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भीती घातली. त्यानंतर या तथाकथित ऑफिसरने बँक खाते पडताळणी करण्याच्या नावाखाली तक्रारदारांना 3 कोटी चार लाख रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यांत ऑनलाईन पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रादारांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी ठाणे सायबर पोलिसांनी 19 जून रोजी तिघांना अटक केली.
मुख्य आरोपी एका पतसंस्थेचा अध्यक्ष
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी किशोर जैन हा एका पतसंस्थेचा अध्यक्ष असून ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाचप्रकारे अनेकांना फसवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या टोळीने फसवणूक केलेल्या रकमेपैकी 82 लाख 46 हजार रुपये क्रिप्टो करन्सीद्वारे परदेशात पाठवल्याचे देखील तपासातून उघड झाले आहे.

