

डोंबिवली (ठाणे) : बदलापूर-पाईपलाईन क्रॉस तळोजा एमआयडीसी रोडला असलेल्या खोणी-पलावातील डाऊन टाऊनमध्ये असलेल्या फ्लॅटवर धाड टाकून पोलिसांनी २.१२ कोटी रूपये किंमतीचे १.९३ किलो वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई गेल्या आठवड्यात कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकाने स्थानिक मानपाडा पोलिसांसह केली.
ड्रग्ज तस्करांचा म्होरक्या मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान (३२, रा. मुंब्रा) यालाही जेरबंद करण्यात यश आले आहे. कुख्यात तस्कर मोहम्मद उर्फ फरहान याला बहरीन देशात पळून जाण्याआधीच हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईचे विद्यार्थ्यांसह शिक्षक/पालकांनी जोरदार स्वागत केले आहे. डीसीपी अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे, कलगोंडा पाटील, संपत फडोळ, णेश बडे, किशोर दिघे या पथकाने डाऊन टाऊनमधील फ्लॅटवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. पोलिसांनी धरपकड मोहिमेत असिल जावर सुर्वे (२६), मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी (२७) या दोघांसह मेहेर फातिमा रिजवान देवजानी (२२) हिला देखिल अटक केली. या तिघांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१ (क) २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पडद्यामागचा सूत्रधार असलेला हा बदमाश हाती लागत नव्हता. कुख्यात तस्कर तथा ड्रग्ज तस्करांचा म्होरक्या मोहम्मद उर्फ फरहान याला हुडकून काढण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत होते. हा बदमाश बहरीन देशात पळून जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर फिल्डींग लावली होती. प्रसंगावधान राखून पोलिसांनी मोठ्या महत्प्रयासाने या तस्कराला जेरबंद केले. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने ड्रग्ज तस्करांच्या या म्होरक्याला अधिक चौकशीसाठी सोमवार ( दि. 7 जुलै) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याकडून अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे हाती लागण्याठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
अटक करण्यात आलेला कुख्यात तस्कर मोहम्मद उर्फ फरहान आई आणि भावासमवेत मुंब्र्यात वास्तव्याला आहे. हा बदमाश चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसाया आडून अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. परदेशात जाऊन अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या बदमाशाचे अन्य काही काळे धंदे असावेत असा पोलिसांचा कयास आहे. या बदमाशाच्या विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात कलम ४८२ आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत असे २ गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे आणि त्यांच्या पथकाने या बदमाशाला वेळीच अटक केल्यामुळे त्याचा परदेशात पसार होण्याचा मनसुबा उधळला गेला. अन्यथा हा कुख्यात तस्कर लवकर हाती लागला नसता.