कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळचा इराणी काबिला  Pudhari News Network
क्राईम डायरी

Thane Crime | जास्त आवाज केलास...तर जाळून टाकीन! इराणींच्या धमक्या, मग्रुरी कायम

टिटवाळ्याजवळच्या बल्याणीतील भयंकर प्रकार : इराणी चौकडीकडून शेतकऱ्याला मित्रांसह जाळून ठार मारण्याच्या धमक्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : इराणी काबिल्यातील जाफर गुलाम इराणी (२७) हा पोलिस रेकॉर्डवरील आंतरराज्यीय कुख्यात गुन्हेगार चेन्नईमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. पोलिसांनी जाफरला यमसदनी धाडले तरी देखिल इराण्यांची मग्रुरी काही कमी झाली नाही.

इराणी काबिल्यातील एका कुख्यात बदमाशाने खुन्नस दिल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मित्रांसह जाळून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्याजवळील बल्याणीत राहणाऱ्या आपल्या मित्रांकडे कारने गेलेल्या कल्याण तालुक्याच्या मोहिली गावातील या शेतकऱ्याला आंबिवलीच्या इराणी काबिल्यात राहणाऱ्या अली इराणी आणि त्याच्या तिघा साथीदारांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत कारसह जीवंत जाळण्याच्या धमक्या दिल्या.

या संदर्भात कल्याण तालुका पोलिस ठाण्यात संतोष शिंगोळे (४९) या शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अली इराणीसह त्याच्या तीन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कुख्यात गुन्हेगार अली इराणी याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जास्त आवाज केलास तर तुला तुझ्या साथीदारांसह गाडीसकट जाळून टाकीन

शेती व्यवसाय करणारे संतोष शिंगोळे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शिंगोळे हे टिटवाळ्यातील वासुंद्री भागात राहणाऱ्या मित्राकडे कारने संध्याकाळच्या सुमारास गेले होते. तेथून रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतत असताना बल्याणीतील आंबेडकर चौकातून दोन मित्रांना कारमध्ये घेतले. तेथून बल्याणीकडे जात असताना आंबेडकर चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर अली इराणी उभा होता. त्याने शिंंगोळे यांच्याकडे काय बघतोस ? असा जाब विचारला. पाहिलेच नाही तर तुझी अडचण काय ? असा प्रतीसावाल शिंंगोळे यांनी अली इराणीला केला. मी या भागातील कोण आहे हे तुला माहित आहे का ? जास्त आवाज केलास तर तुला तुझ्या साथीदारांसह गाडीसकट जाळून टाकीन, अशी धमकी अली इराणीने शिंंगोळे यांना दिली.

अली इराणीने शिंगोळे यांच्या कारची चावी काढून घेतली. शिंगोळे यांच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी अलीचे तीन साथीदार तेथे आले. त्यांनीही शेतकरी शिंगोळे यांना मारून टाकीन, असे धमकावले. अलीने कारच्या चाव्या परत देताना चल इथून...झटकन निघून जा....नाहीतर तुला मारून टाकीन...अशी पुन्हा शिंगोळे यांना धमकी दिली. या सगळ्या प्रकाराची माहिती संतोष शिंगोळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन दिली. पोलिसांनी संतोष शिंगोळे यांच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादीच्या कार्यालयातून शस्त्रास्त्रे हस्तगत

संतोष शिंगोळे यांच्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक दीपक मोरे आणि त्यांचे सहकारी रामदास भुवर हे तातडीने आंबिवली जवळच्या बल्याणी भागात पोहोचले. तेथे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. इक्बाल अन्सारी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर संतोष शिंगोळे आणि अली इराणी यांच्यात भांडण झाल्याचे जमावाने पोलिसांना सांगितले. झाले आहे. पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची तोडफोड झाल्याचे आणि तेथे भांडण करणारे इसम पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पक्ष कार्यालयाची झडती घेतली असता या कार्यालयात त्यांना एक तलवार, एक सुरा, गु्प्ती, मोबाईल आढळून आला. शस्त्रांसह मोबाईल जप्त करून पोलिसांनी फरार अली इराणी आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT