![डोंबिवली] ठाणे](http://media.assettype.com/pudharinews%2F2025-03-28%2Fn39p397h%2F9aa414cc-ce25-422c-a5e0-5c00b4abfbfc.jpg?rect=0%2C0%2C1100%2C619&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
![डोंबिवली] ठाणे](http://media.assettype.com/pudharinews%2F2025-03-28%2Fn39p397h%2F9aa414cc-ce25-422c-a5e0-5c00b4abfbfc.jpg?rect=0%2C0%2C1100%2C619&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळचा इराणी काबिला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या पटलावर आला आहे. पोलिसांसह स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या काबिल्यात घुसून कोंबिंग ऑपरेशनसह बुलडोझर कारवाई करण्यात येईल, याकडे राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या काबिल्यात चोरी-छुपे वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारांसह त्यांना वेळोवेळी वाचविणाऱ्या नातलगांचे भवितव्य लवकरच उद्ध्वस्त होणार आहे.
जाफर गुलाम इराणी (२७) हा आंतरराज्यीय पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार चेन्नईमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या वृत्ताने ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळच्या आंबिवली पश्चिमेकडे असलेला इराणी काबिला पुन्हा एकदा पोलिस आणि सरकारी यंत्रणांच्या रडावर आला आहे. या काबिल्यामध्ये लपलेल्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याच्या गेल्या १५ वर्षांत ११ घटना घडल्या आहेत. कुप्रसिद्ध असलेला हा काबिला तेथील खूँखार इराण्यांकडून पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कायम चर्चेत असतो. सराईत गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काबिल्यातील आक्रमक महिला त्यांच्या नातेवाईकाला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिसांवर तुफान दगडफेक करतात. वारंवार पोलिसांवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लवकरच कोंम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली. पोलिस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे नियोजन सुरू केले आहे. एटीएसचीही मदत घेत सराईत गुन्हेगारांना अटक करण्याचा निर्णय तर गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई देखील होणार आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य अनिल परब यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या इराणी काबिल्यामध्ये अनेक सराईत गुन्हेगार लपतात. पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्यास तेथील महिला त्यांच्यावर हल्ले करतात. त्यामुळे येथे कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची भूमिका कदम यांनी मांडली. या काबिल्यामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हेगार पडीक आणि वापरात नसलेल्या इमारतींमध्ये लपतात. त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू आहे. शिवाय गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. अशी कारवाई झाल्यास महिला इराण्यांचे मनोधैर्य खच्ची होऊन त्यांच्या गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी ऑपरेशनची तयारी पूर्ण केली असून, लवकरच मोठी कारवाई सुरू होणार आहे.
सराईत गुन्हेगारांना उचलण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांवर हिंसक हल्ले होण्याच्या घटनांना तेच पोलिस जबाबदार ठरतात. मुंबई वा अन्य भागातून आलेले पोलिस त्यांचे सावज उचलण्यासाठी स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता काबिल्यात परस्पर घुसतात. एकतर काबिल्यातून पळून जाण्याचे गुप्त मार्ग बाहेरच्या पोलिसांना माहीत नसतात. त्यातच आक्रमक महिलांमुळे पोलिसांना हवे असलेले सावज हाती लागत नाही. त्यामुळे साथीदाराला सोडवण्यासाठी हिंसक इराण्यांकडून मार खाण्याखेरीज पोलिसांचा नाईलाज असतो. पोलिसांनी मार तरी कितींदा आणि का खायचा ? हा प्रश्न अधोरेखित झाला आहे.