वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 30 ते 35 लाख रुपयांची मागणी
पोलिस कर्मचाऱ्यांची वरच्या स्तरावर ओळख असल्याचा दावा
नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्याने दिली फिर्याद
नाशिक : पोलिस खात्यातही बदली प्रक्रियेत रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काही पोलिस कर्मचारी ३० ते ३५ लाख रुपयांची मागणी करत असून, आपली वरच्या स्तरावर ओळख असल्याचा दावा करत आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व प्रकरणाला वाचा फुटली आहे.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित नितीन चंद्रकुमार सपकाळे (४३, रा. सप्तश्रृंगी कॉलनी, मालेगाव) व सागर बाळासाहेब पांगरे-पाटील यांनी (३५, रा. पांगरे मळा, सिडको) २४ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास चांडक सर्कल येथून फिर्यादीला व्हॉट्स ॲपवरून कॉल केला. तेव्हा दोघांनी आपली वरपर्यंत ओळख असून, 'भद्रकाली'त कार्यरत असलेल्या दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर बदली करून देतो, त्यासाठी प्रत्यक्ष भेटून बोलू असे सांगितले. त्यानुसार २५ जुलै रोजी सकाळी सपकाळे हे चांडक सर्कल भागात आले. त्यांनी अंमलदारासह निरीक्षकांना बोलावून घेतले.
त्यावेळी संशयित पाटील याने 'तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमची कुठेही योग्य ठिकाणी बदली होणार नाही', अशी भीती दाखवली. तेव्हा सपकाळे यांच्या मोबाइलवर अंमलदाराने फोन करून रेकॉर्डिंग केले. तेव्हा दुसरे निरीक्षक ३५ लाख द्यायला तयार आहेत. मी पाच लाख कमी करतो. ३० पेक्षा कमी होणार नाही, जर साहेब २५ च्या वर द्यायला तयार नसतील, तर बदलीचे काम होणार नाही, असे सांगत संशयित सपकाळे आणि पांगरे पाटील याने ३५ लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.
बदली करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याकडून 'आपली वरपर्यंत ओळख आहे' असे अनेकांना सांगितले गेले. त्यामुळे वरपर्यंत ओळख असलेले नेमके कोण? याची चर्चा आता पोलिस खात्यात रंगली आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी आहेत काय? याचाही तपास केला जावा, अशी सुप्त मागणीही केली जात आहे.
याच रॅकेटने पोलिस अंमलदाराची दोन लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी हे मालेगाव शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार आहेत. त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सागर बाळासाहेब पांगरे - पाटील (३५, रा. पांगरे मळा, सिडको) याने फिर्यादीशी संपर्क साधला. वरपर्यंतच्या ओळखीचा हवाला देत त्याने फिर्यादी व त्याचा मित्र यांना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे बदली करून देतो, असे आश्वासन दिले. तसेच १५ ते २५ जुलैदरम्यान चांडक सर्कल येथे फिर्यादी व त्यांचा मित्र सपकाळे यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख रुपये खंडणी स्वरूपात घेऊन फसवणूक केली. आणखी एक लाख रुपये न दिल्यास तुमची कुठेही बदली करून नुकसान करू, अशी धमकीही दिली.