नाशिक : कॉलेजरोड गोळीबार प्रकरणात अजय बागुल याच्या अटकेनंतर भाजप नेते सुनील बागुल यांचे तिन्ही पुतणे ‘कायद्याच्या बालेकिल्ल्यात’ गजाआड झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित अजय बागुल, पप्प्या जाधव, सचिन कुमावत यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यालयालयाने त्यांना शुक्रवारी (दि. १७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित अजय बागुल व इतर संशयितांचे वकील मंदार भानोसे यांनी न्यायाधीश डी. आर. बडवे यांच्यासमोर केलेल्या युक्तीवादात घटनेमधील मुख्य संशयित तुकाराम चोथवे व अजय बोरीसा असून अजय बागुल व इतर दोघांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे यांना पोलिस कोठडी देऊ नये. मात्र, सरकारी अभियोक्ता अर्चना शिंदे- ठाकरे व गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांनी सदर आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याबाबत जोरदार युक्तिवाद केला. या घटनेतील वापरलेली हत्यारे पिस्टल व टॉमी ही अजूनही जप्त करण्याचे बाकी आहे तसेच या प्रकरणात संबंधित आरोपींचा थेट संबंध असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने संशयितांना १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर अजय बागुल यास गोळ्या औषधे सुरू आहेत, ती देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, या प्रकरणात संदीप रघुनाथ शेळके, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे, सागर बागुल, गौरव बागुल यांना यापूर्वीच अटक करण्यात आल्याने ते पोलिस कोठडीत आहेत. तर तुकाराम चोथवे, अजय बोरिसा, बॉबी गोवर्धने, गोपाल दायमा यांच्यासह इतर चार आरोपी अद्यापही फरार आहेत.
लोंढे पिता- पुत्राला १४ पर्यंत पोलिस कोठडी
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार व अमोल पगारे यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे लोंढे कुटुंबाच्या मागे लागलेला पोलिस चौकशीचा ससेमीरा अजूनही काही काळ सुरूच राहणार आहे. या घटनेत गुन्हा घडण्याच्या वेळी तेथे उपस्थित असलेला शुभम पाटील उर्फ भुरा, दुर्गेश वाघमारे व आकाश उर्फ अभिजीत अडांगळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. रविवार (दि.१२) रोजी न्यायालयात लोंढे पिता- पुत्र व संतोष पवार, अमोल पगारे यांना हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल, जावेद शेख व कोमल गुप्ता उपस्थित होते. ॲड. कासलीवाल यांनी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने गुन्हा केला म्हणून त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करणे अयोग्य असल्याचे न्यायालयास सांगितले. यामध्ये हॉटेल मालकाची फिर्याद नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी आरोपींना मिळावी अशी विनंती केली. तर सरकारी वकील व पोलिसांकडून आरोपींवर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे तपासाकामी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान लोंढे पिता- पुत्र व इतर दोघांना न्यायालयाने १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविवारी न्यायालयात पोलिसांचीच गर्दी
सातपूर व कॉलेज रोड या दोन्ही गोळीबाराच्या घटनेमधील मुख्य आरोपी यांची राजकीय पार्श्वभूमी मोठी असल्यामुळे त्यांचे समर्थकांनी मागील तारखेच्या वेळी मोठी गर्दी न्यायालयात केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्यासह मोठा फौज फाटा न्यायालय परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयामध्ये आरोपी व पोलिस वगळता कोणीही दिसून आले नाही.
लोंढेंच्या बालेकिल्ल्यात आढळले मोठे भुयार
सातपूर गोळीबार प्रकरणातील संशयित माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्या घराच्या झडतीत भले मोठे भुयार आढळून आले आहे. लोंढे व त्याच्या दोन्ही मुलांवर २४ तासांमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न अशी तीन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील तपासाचा भाग म्हणून लोंढेच्या घराची झडती घेण्यात आली. यात घराच्या तळामध्ये भुयार आढळून आले आहे. मात्र या भुयारात काय आढळले या विषयी पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, घरातील तळामध्ये अशा प्रकारची भुयारी खोली कशासाठी होती, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.