

नाशिक : नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगीरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच दरम्यान 'नाशिक जिल्हा गुन्हेगारींचा बालेकिल्ला' असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्याविरोधात पोलीसांनी कठोर कारवाई करत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
गेल्या आठ दिवसापासून नाशिकमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पथकाकडून गुन्हेगारी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा हा गुन्हेगारीचा नाही तर कायद्याचा बालेकिल्ला आहे, याचा प्रत्यय गुरूवारी (दि.९) न्यायालयात आला. सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार व अमोल पगारे यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा दिल्या. सातपूर गोळीबार प्रकरणात देवेश शिरसाटे व शुभम गोसावी राहणार जेलरोड या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये आता अटक केलेल्यांची संख्या ९ झाली आहे. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व दीपक लोंढे, संतोष पवार व आकाश पगारे यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सातपूर नाईस हाऊस जवळील औरा बारमध्ये ५ ऑक्टोबरला पहाटे २ वाजता झालेले गोळीबार प्रकरण हा पूर्व नियोजित कट होता. या आरोपावरून माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार व अमोल पगारे यांना यामध्ये सह आरोपी करण्यात आले आहे. हॉटेल मालक बिपिन पुरुषोत्तम पटेल व संजय सुरेंद्र शर्मा यांचे ६ ऑक्टोबर रोजी अपहरण करण्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस येथील घर बंगला बळकवल्याप्रकरणी खंडणी व जीवे मारण्याची धमकीचा गुन्हाही त्यांच्या विरोधात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये तीन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने लोंढे पिता-पुत्रांचे पाय खोलात गेले आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीची ही कारवाई करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.