ना मृतदेह, ना रक्त, ना पुरावा, ना कोणी साक्षीदार... अशा विलक्षण परिस्थितीत कोरोना महामारीच्या काळात फ्रान्समध्ये घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा सध्या तिथे तपास व सुनावणी सुरू आहे. ज्याची चर्चा फ्रान्ससह सार्या जगभर जोरात सुरू आहे.
दक्षिण फ्रान्समधील कॅग्नॅक-ले-मीन्स या छोट्याशा गावात डिसेंबर 2020 च्या एका हिवाळी रात्री 33 वर्षीय नर्स डेल्फिन जुबिलार अचानक बेपत्ता झाली. त्यावेळी जगभर कोरोनाचा उद्रेक होता. चार वर्षांच्या सखोल तपासानंतरही तिचा अद्याप मृतदेह सापडलेला नाही. याच गूढ बेपत्ता प्रकरणावरून तिचा पती सेद्रिक जुबिलार याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असून, सध्या अल्बी येथील फौजदारी न्यायालयात 22 सप्टेंबर 2025 रोजी खटल्याला सुरुवात झाली आहे. हा खटला आता चार आठवडे चालणार आहे.
38 वर्षीय पेशाने पेंटर-डेकोरेटर म्हणून काम करणार्या सेद्रिकवर पोलिसांचा आरोप आहे की, त्याची पत्नी डेल्फिन ही एका दुसर्या पुरुषासोबत अनैतिक संबंधात गेल्याने तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने खून केला. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. तपास यंत्रणांनी काही परिस्थितीजन्य पुरावे मांडले आहेत, त्यात डेल्फिनचे मोडलेले चष्मे, शेजार्यांनी ऐकलेल्या किंकाळ्या, तसेच त्या दाम्पत्याच्या मुलाचे काही जबाब यांचा समावेश आहे. पोलिसांच्या मते बेपत्ता होण्याच्या रात्री घरात वाद झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत; मात्र ठोस पुरावे नाहीत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपासात त्यांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत. ना रक्ताचे डाग, ना गुन्ह्याचे ठिकाण, ना मृतदेह-असा कोणताही निर्णायक पुरावा आजवर त्यांच्या हाती लागलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार सेद्रिकचा डेल्फिनच्या शोधमोहिमेत फारसा सहभाग नव्हता आणि त्याने बर्याचदा आपल्या पत्नीविषयी धमकीवजा वक्तव्ये केली होती. यावरून त्याच्याविषयी पोलिसांचा संशय वाढला. पण, असे असला तरी सेद्रिक पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा करतोय.
33 वर्षीय डेल्फिन ही नाईट नर्स म्हणून एका क्लिनिकमध्ये काम करत होती. या दाम्पत्याला सहा वर्षांचा आणि अठरा महिन्यांचा अशी दोन मुले आहेत. पोलिसांच्या चौकशीतून त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव स्पष्ट झाला आहे. 38 वर्षीय सेद्रिक हा गांजाचे सेवन करायचा. जास्तकाळ तो त्यावरच अवलंबून असायचा. त्याचा स्थिर नोकरीचा अभाव आणि डेल्फिनची इंटरनेटवर झालेली एका नवीन व्यक्तीची ओळख, यामुळे दोघे घटस्फोटाची चर्चा करत होते. त्यामुळे कुटुंबात बेबनाव व मोठ्या प्रमाणात तणाव होता. सध्या डेल्फिनच्या कुटुंबासाठी हा खटला मानसिकद़ृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यांचा मोठा मुलगा, अकरा वर्षांचा लुई हा प्रचंड तणावाखाली असून, आपल्या आईबाबतच्या गुन्ह्याबाबतच्या सत्याची प्रतीक्षा करत आहे.
मृतदेह न सापडल्यामुळे तसेच ना कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार नसतानाही हा खटला संपूर्ण फ्रान्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर चर्चा होत असल्यामुळे विविध सिद्धांत तर्कवितर्क मांडले जात आहेत. त्यामुळे हा गुन्हा पुराव्यांचा अभाव आणि गुंतागुंतीची पार्श्वभूमी असल्यामुळे एखाद्या कादंबरीसारखा रोचक बनलाय. चार आठवडे चालणार्या या खटल्यात न्यायालयासमोर 65 साक्षीदार व 11 तज्ज्ञांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. 16,000 पानांचा पुरावा न्यायालयात सादर झाला असला, तरी अंतिम निकाल काय लागेल, हे अजूनही एक कोडेच आहे. डेल्फिनचा मृतदेह न सापडल्याने आणि स्पष्ट पुरावे हाती न लागल्याने संपूर्ण फ्रान्स मात्र एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, ते म्हणजे-खरंच, त्या रात्री काय घडले होते?