मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे अशा बड्या महानगरांत शेकडो बोगस कॉल सेंटर सुरू झालेले आहेत. या कॉल सेंटरच्या माध्यमातून देश-विदेशातील नागरिकांची टॅक्स डिफॉल्टर, ऑनलाईन लॉटरी, लोन, डेबिट-क्रेडिट कार्ड मिळवून देणे अशा विविध कारणांच्या नावाखाली सर्रास फसवणूक सुरू आहे. महानगरात सुरू असलेले बोगस कॉल सेंटरचे लोण आता राज्याच्या छोट्या शहरापर्यंत पोहोचू लागले आहे. जळगाव शहरात ललित कोल्हे या नेत्याच्या फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी रेड टाकल्यानंतर हा सारा बोगस कॉल सेंटरचा फ्रॉड मार्केट पुन्हा एकदा समोर आहे.
नरेंद्र राठोड, ठाणे
पाच वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी मीरा रोड येथे छापा टाकून बोगस कॉल सेंटरचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. सागर ऊर्फ शैगी ठक्कर हा गुजरातचा राहणारा 23 वर्षीय तरुण या सार्या बोगस कॉल सेंटरचा मुख्य मास्टरमाईंड होता. त्याने मीरा रोड येथे थाटलेल्या कॉल सेंटर मधून चक्कअमेरिकेन, ब्रिटिश अशा विदेशी नागरिकांची फसवणूक करून दरदिवसाला करोडो रुपयांची कमाई करण्यात येत होती.
शैगीच्या अटकेनंतर या बोगस कॉल सेंटरचा फर्दाफाश झाला खरा; पण या कॉल सेंटरमधून होणार्या कमाईचे आकडे जाणून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. साहजिकच या बोगस कॉल सेंटरची कल्पना अनेक माफिया, डॉन व भामटेगिरी करणार्यांच्या डोक्यात घर करून गेली. त्यानंतर असे अनेक बोगस कॉल सेंटर पुन्हा नव्याने सुरू होऊ लागले. ठाणे, मीरा रोड, नालासोपारा, वाशी, पनवेल, पेण आदी ठिकाणी सुमारे शेकडो बोगस कॉल सेंटर पुन्हा सुरू झाले आहेत.
जळगाव शहरातील एका फार्महाऊसवर रेड टाकून पोलिसांनी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह बोगस कॉल सेंटरमध्ये काम करणार्या परप्रांतीय तरुणांना अटक केली आहे. या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून देश- विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू होती, असे समोर आले आहे. अशा बोगस कॉल सेंटरचा मुंबई- ठाण्यात अलीकडे सुळसुळाट झालेला आहे. पोलिस कारवाईतून अनेक कॉल सेंटरचा फर्दाफाश देखील झाला आहे. मात्र, हे कॉल सेंटर हळूहळू ग्रामीण भागात स्थलांतर करीत आहेत.
गेल्या पाच वर्षांत ठाणे पोलिसांनी 150 पेक्षा अधिक बोगस कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. मात्र, तरी देखील फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून होणारी फसवणूक सुरूच आहे. राज्याच्या सायबर क्राईम विभागाला प्राप्त अहवालानुसार मुंबई- ठाण्यासह नवी मुंबई परिसरात शेकडो बोगस कॉल सेंटर सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांसोबतच या देशातील नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे धंदे सुरू आहेत. विनातारण फक्त दोन तासांत लोन मंजूर, क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड बंद पडल्याचे कारण देऊन फसवणूक, तसेच नोकरी, प्लेसमेंट, घरी बसल्या काम अशा अनेक प्रकारे ही फसवणूक सुरू आहे.
ठाणे पोलिसांनी 2017 साली एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. मीरा रोड तेथील बोगस कॉल सेंटरची कल्पना प्रत्यक्षात रुजली ती एका अमेरिकन कंपनीत काम करणार्या सागर ऊर्फ शैगी ठक्कर या 23 वर्षीय भारतीय तरुणाच्या सुपीक डोक्यातून! या तरुणाने भारतात येऊन मीरा रोड येथील काशिमीरा भागातील डेल्टा गार्डन जवळ हरीओम आयटी पार्क ही सात मजली इमारत शाहीन इकबाल बाळासाहेब, नदीम इकबाल बाळासाहेब आणि नसरीन इकबाल बाळासाहेब या तिघा भावांकडून भाड्याने घेतली. या इमारतीचे महिन्याला तब्बल सात लाख भाडे देण्याची सहज तयारी शैगी ठक्करने दर्शवल्याने त्यास ही इमारत लगेच भाड्याने मिळाली. या इमारतीत कॉल टेक सोल्युशन, टेक सोल्युशन, युनिव्हर्सल आऊटसोर्सिंग सोल्युशन आणि लारेक्स इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड अशा विविध कंपन्यांच्या नावाखाली शैगीने आपले कॉल सेंटर सुरू केले.
सुरुवातीला नोएडा, गुडगाव आणि दिल्ली येथील कॉल सेंटरमधून बाहेर पडलेल्या काही टीम लीडरचा शैगीने शोध घेतला आणि त्यांना आपल्या संपर्कात आणून त्याने त्यांना आपल्या कॉल सेंटरमध्ये कामाला ठेवले. या सर्व टीम लीडरांचा पगार देखील त्याने लाखोंच्या घरात दिला होता. त्यानंतर फर्राटेदार इंग्रजी बोलता येणार्या तरुणांचा शोध घ्यायचा व त्यांना आपल्या कॉल सेंटरमध्ये कामाला ठेवायचे असा सपाटा शैगीने सुरू केला. त्याच्या या कामात त्याला त्याची बहीण रिमा ठक्कर हिने मोलाची मदत केली. या कॉल सेंटरमध्ये कामास येणार्या प्रत्येक तरुणास एक स्क्रिप्ट आणि काही फोन क्रमांक दिले जायचे. त्यानंतर त्यांना काही दिवसांची ट्रेनिंग देण्यात येऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जायची.
या कॉल सेंटरमधील काम करणार्या तरुणांना देण्यात येणार्या स्क्रिप्टमध्ये लिहिल्याप्रमाणे : डिपार्टमेंट ऑफ इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस, हाऊ मे आय हेल्प यू? कॅन आय ह्याव यूवर फस्ट अॅण्ड लास्ट नेम अँड यूवर कांटेक्ट नंबर ऑन विच यू गॉट अ व्हॉईस मेल? माय नेम इज शॉन एंडरसन विथ द डिपार्टमेंट ऑफ़ लीगल अफेयर्स विथ यूनाइटेड स्टेट ट्रैजरी डिपार्टमेंट! वी कॉलेड यू टू इन्फॉर्म यू अबाऊट अ लीगल केस फाईल्ड अंडर यूवर नेम बाय इंटरनल रेवेन्यू सर्व्हिस अंडर विच यू आर लिस्टेड एज अ प्राईमरी सस्पेक्ट!
या वाक्यांनी सुरुवात झाली की पलीकडचा अमेरिकन नागरिक लगेचच पैसे दंड स्वरूपात भरण्यास तयार होतो, याची कल्पना येथे काम करणार्या तरुणांना यायची. आपण करतोय हे काम मोठा गुन्हा असून, हे सर्व बेकायदेशीर असल्याची कल्पना असूनदेखील ते हे काम फक्त पैशासाठी करत राहायचे. याचाच फायदा सागर ऊर्फ शैगीने पुरेपूर उचलला आणि आपल्या कॉल सेंटरमध्ये काम करणार्या प्रत्येक कर्मचारीला सावज फसवला की मोठी रक्कम भेट म्हणून देण्याचे आमिष दाखवले.
त्यामुळे येथे कामाला लागणारा प्रत्येक तरुण रोज अधिकाधिक सावजांना कॉल करून धमकावण्याचा व फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. या कॉल सेंटरमधून रोज 700 ते 800 अमेरिकन नागरिकांना कॉल केले जायचे. त्यापैकी 50 ते 100 सावज कॉल करणार्यांच्या जाळ्यात अडकायचे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड स्वरूपात 8 हजार ते 10 हजार डॉलरपर्यंत रक्कम गिफ्ट कार्डच्या माध्यमातून स्वीकारली जायची. त्यातील 70 टक्के रक्कम इमारतीचे भाडे, कर्मचार्यांचा पगार व इतर बाबींवर खर्च केली जायची; तर 30 टक्के रक्कम शैगीच्या खात्यात जमा व्हायची.
हे सर्व शक्य होते ते मॅजिक जॅक या डिव्हाईसमुळे. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत मीरा रोडसह, कासारवडवली, भिवंडी आणि मुंब्रा येथे केलेल्या बोगस कॉल सेंटरवरील कारवाईत हाच मॅजिक जॅक डिव्हाईस फसवणुकीचा मुख्य माध्यम असल्याचे समोर आले आहे. मॅजिक जॅक हे एक असे डिव्हाईस आहे, जे अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, जपान, चीन आदी देशांमध्ये बनवले जाते. मॅजिक जॅक या डिव्हाईसचा उपयोग व्हीओआयपी आणि इंटरनेट कॉल करण्यासाठी केला जातो. मॅजिक जॅक डिव्हाईस यूएसबी कॉडद्वारे फ़ोन आणि कॉम्प्युटर यांच्याशी सहज जोड़ता येते. एकदा का हे डिव्हाईस कॉम्प्युटर आणि फोनद्वारे जोडले की जगाच्या कुठल्याही भागातून कुठल्याही देशात त्याच देशाच्या लोकल पिन कोडने इंटरनेट कॉल करता येतो.