जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम कॉलनी येथील ‘मुक्ताई’ बंगल्यात सोमवार (दि.२७) रोजी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. या घटनेत सुमारे ६ ते ८ तोळे सोने आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी या चोरी करताना खास करून २०२२ नंतरची महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याने या घटनेला राजकीय रंग चढत आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. ते जवळपास एक तास घरात थांबले असल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट होते. चोरट्यांनी तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील कपाटे उचकून सोने, रोख रक्कम आणि काही कागदपत्रे चोरली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी २०२२ नंतरची कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राईव्ह लंपास केल्याचा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.
चोरीच्या घटनेनंतर पत्रकार परीषदेत बोलताना खडसे म्हणाले, ही साधी चोरी नाही, ही राजकीय चोरी आहे. चोरट्यांचा डोळा सोन्या-रोकडपेक्षा कागदपत्रांवर होता. चोरीपूर्वी परिसरातील पथदिवे बंद करण्यात आले होते, यावरून ही कारवाई नियोजनबद्ध वाटत आहे. खडसे यांनी पोलिसांकडे सर्व कागदपत्रांचा तपशील दिला असून, त्यांनी या राजकीय चोरीचा तपास काटेकोरपणे करावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. पत्रकारांनी या घटनेमागे काही राजकीय षड्यंत्र आहे का? असे विचारल्यावर खडसे यांनी स्मितहास्य केले, ज्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच खडसे यांची सुन आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर देखील दरोडा पडला होता. आता खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या या चोरीमुळे खडसे परिवाराला कोणी टार्गेट करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरवस्तीतील या बंगल्यात चोरी झाल्याने जळगावमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राजकीय पातळीवर या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, या चोरीमागील ‘राजकीय षड्यंत्र’ उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.