

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगर येथील निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. परंतु, ही केवळ साधी चोरी नसून 'नियोजनबद्ध डाका' असल्याचा गंभीर आरोप खुद्द खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
खडसे म्हणाले की, चोरट्यांचा उद्देश घरातील मौल्यवान वस्तू लंपास करणे हा नव्हता, तर भ्रष्टाचारासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरून नेणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. ही घटना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने, रेकी करून घडवण्यात आली आहे. ही साधी चोरी नसून विशिष्ट पुरावे चोरण्याचा हेतू यामध्ये असल्याचा संशय आहे. खडसे यांनी सांगितले की, त्यांच्या घरातून सुमारे 10 महत्त्वाच्या सीडीज आणि 25 ते 30 पेनड्राईव्ह चोरीला गेल्या आहेत. उर्वरित सात सीडी अजूनही शिल्लक असून त्या पोलिसांकडे लवकरच सुपूर्द केल्या जाणार आहेत. तसेच भ्रष्टाचारासंबंधी आणि इतर काही महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे देखील चोरीला गेल्याचा दावा खडसे यांनी यावेळी केला. उर्वरीत सीडी आणि महत्वाचे कागदपत्रे मी लवकरच पोलिसांना दाखवणार आहे. या संदर्भात मी स्वत: लेखी विनंती करणार आहे, असे खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
ही घटना कुणाच्या सांगण्यावरून झाली का, असा प्रश्न उपस्थित करताना खडसे म्हणाले की, मी सध्या कुणाचे नाव घेणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर सर्व स्पष्ट करेन. या चोरीनंतर खडसे यांनी तात्काळ त्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत गंभीर दावे केले आहेत. एकंदरीत या प्रकरणामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.