

ठळक मुद्दे
राजकीय वर्तुळात खळबळ: 'नाथाभाऊ' सुरक्षित नाहीत, तर सामान्य माणसाचं काय?
जळगाव येथील शिवरामनगर येथील खडसे यांच्या घरात चोरी
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
जळगाव : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य आधारस्तंभ एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील शासकीय निवासस्थानावर (बंगल्यावर) चोरट्यांनी धाडसी चोरी करत हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जळगावसह संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातून सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने आणि घरातील कपाटात ठेवलेली ४० ते ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. लंपास झालेल्या सोन्या-चांदीच्या ऐवजाची किंमत लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक दशके आपला दबदबा ठेवणाऱ्या नेत्याच्या शासकीय बंगल्यातच जर चोरटे एवढ्या सहजतेने चोरी करत असतील, तर जळगाव शहरातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल या चोरीच्या घटनेनंतर उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे हे 'झेड' सुरक्षा श्रेणीत नसले तरी, त्यांना पोलीस संरक्षण असते आणि त्यांचा बंगला पोलिसांच्या नियमित गस्तीच्या (पेट्रोलिंग) हद्दीत येतो. या सगळ्या सुरक्षा यंत्रणेला भेदून ही चोरी झाल्याने, स्थानिक पोलिसांची कार्यक्षमता आणि त्यांच्या गस्ती व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.
सध्याच्या घडीला एकनाथ खडसे किंवा त्यांचे कुटुंबीय नेमके कुठे होते, चोरी कोणत्या वेळेत झाली, याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून येणे बाकी आहे. मात्र, सोमवार (दि.27) रोजी रात्री झालेली ही घटना समोर येताच जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, फॉरेन्सिक तज्ज्ञ (Forensic Experts) आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
या घटनेमुळे जळगाव शहर पोलीस पथकावर प्रचंड टीका होण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय वर्तुळातील बड्या व्यक्तींचे घर सुरक्षित नसेल, सामान्य नागरीकांनी कसे जगायचे, गुन्हेगारीने डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रतिक्रिया स्थानिक राजकीय नेते आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने शहराच्या सुरक्षेचा आढावा घेऊन गस्ती पथकांना अधिक सक्रिय करण्याची मागणी होत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासचक्रे वेग घेत आहे.