मिरा रोड (ठाणे) : मिरा भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून ड्रग्स माफियांना हैदोस घातला आहे. रात्रभर ऑर्केस्ट्रा बार, हुक्का पार्लरच्या नावाखाली ड्रग्स विकले जात असल्याचा आरोप होतोय. पोलिसांची या सगळ्या प्रकारात असलेली भूमिकाच संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे. गुन्हेगारी रोखणार्या यंत्रणेकडूनच अशा बेकायदेशीर व्यवहारांना संरक्षण मिळत असेल, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहराचा विकास देखील झपाट्याने होत आहे. या वाढत्या विकासाबरोबरच अनैतिक उद्योगधंदे देखील वाढत आहेत. मिरा-भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बार, वेश्याव्यवसाय, गुटखा विक्री, हुक्का पार्लर, ड्रग्स विक्री खुलेआम सुरू आहे. यामध्ये तरुण पिढीचे आयुष्य बरबाद होताना दिसत आहे. मिरा भाईंदर शहरात वेगवेगळ्या भागात गांजा, ड्रग्स व मेफोड्रोन या अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. पोलीस प्रशासन कारवाई केल्याचे दाखवते. परंतु त्यांच्यावर कारवाई केली की त्यांना काही तासात किंवा काही दिवसात सोडून दिले जाते. त्यामुळे हे माफिया बाहेर आले कि पुन्हा त्यांचा अमली पदार्थांची विक्री सुरू करतात. या विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा देखील वापर केला जात असल्याचे दिसून येते.
झोपडपट्टी भागात हे अमली पदार्थ विक्रेते वावरत असल्याचे दिसून येते. शासनाने गुटखा बंदी केली असली तरी परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. बंदी असलेला गुटखा, ई सिगारेट आणि तंबाखूजन्य , गांजा, ड्रग्स या अमली पदार्थांची खुलेआम विक्री शहरात सुरू आहे. या सगळ्याकडे प्रशासनासह पोलीसही कानाडोळा करत असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील जवळपास सगळ्याच पान टपर्यांवर बिनधास्तपणे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसुन येते. शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात देखील पान टपर्यावर सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे गुटखा आणि सिगारेट यांसारख्या व्यसनांचे जाळे तरुणांमध्ये वेगाने पसरत आहे. अल्पवयीन विद्यार्थी सहजपणे हे पदार्थ विकत घेत असून, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून येत आहे.
दोन दिवसापूर्वी काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील हटकेश परिसरात एका इसमाने ड्रग्स विक्री करणार्याला काशीगाव पोलीस ठाण्यात घेवून गेला होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या ड्रग्स विक्री करणार्याकडे जवळपास 50 ते 60 ड्रग्स पुड्या होत्या. त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर त्या आरोपीला पोलीसांनी दोन तासात पुन्हा सोडून दिले. त्यामुळे हा कारभार संशयास्पद आहे. पोलिस हे अनेक वेळा ड्रग्स पेडलर पकडतात, त्यानंतर त्याला विक्री करणारा न दाखवता ड्रग्स विकत घेणारा दाखवतात. त्यामुळे त्यांना लगेच जामिन मिळतो.
शहरात अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार, हुक्का पार्लर सुरू आहेत. काशीमीरा हायवेवर असलेल्या हुक्का पार्लर व ऑर्केस्ट्रा बारमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय तसेच ड्रग्स व अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. काशीमीरा हायवेवरील हिल एनसी हा बार पहाटेपर्यंत सुरू असतो. या ठिकाणी हुक्का पार्लर देखील सुरू असल्याचे सांगितले जाते. या बार बाहेर मोठ्या प्रमाणात तरूण मुले-मुलींचा वावर असल्याचे दिसून येते. रात्रभर धुडगूस घालणार्या कायद्याचे उल्लंघन करणार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.