Dating App Scam
प्रेम, मैत्री आणि जोडीदार शोधण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर डेटिंग अॅप्सचा वापर होऊ लागला आहे. विशेषतः, ‘टिन्डर’, ‘बंबल’, ‘क्वाकक्वाक’सारख्या अॅप्सच्या माध्यमातून ओळखी वाढून प्रत्यक्ष भेटींचे प्रमाणही वाढले आहे. काही वेळा ही ओळख मैत्रीतून प्रेमात रूपांतरित होते; पण अनेकदा हीच डिजिटल जवळीक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये बदलते. राज्यात गेल्या काही महिन्यांत अशा स्वरूपाचे गुन्हे घडल्याची नोंद सायबर पोलिसांकडे आहे. त्यामुळे ऑनलाईन डेटिंग करताना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणीने बंबल अॅपवरून झालेल्या ओळखीनंतर मैत्री वाढवली. व्हिडीओ कॉल्स आणि चॅटिंगच्या माध्यमातून दोघांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांतच दोघांमध्ये वैयक्तिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणाने मालदीव ट्रिपचे आमिष दाखवत तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले. पुढे त्याने थेट शारीरिक संबंधांची मागणी केली. विरोध केल्यावर तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकाराने खचलेली तरुणी वाकड पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर बंबल अॅपवर ‘मॅडी सूर्या’ नावाने प्रोफाईल असलेल्या मुकेश सूर्यवंशी (रा. कल्पतरू सोसायटी, कल्याणीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नुकतेच पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अशाच स्वरूपाच्या फसवणुकीच्या प्रकरणात 11 जणांना अटक केली आहे. या आरोपींनीदेखील डेटिंग अॅपद्वारे महिलेशी संबंध साधत तब्बल 1 कोटी 55 लाख रुपये उकळले होते. अशा घटना मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
सायबर पोलिस विभागाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यात अशा स्वरूपाच्या 79 गुन्ह्यांची अधिकृत नोंद झाली आहे. याशिवाय हजारो तक्रारी अर्जाच्या स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. बहुतेक गुन्ह्यांत बनावट प्रोफाईल तयार करून आरोपींनी मैत्री केली. प्रेम, लग्नाचे आमिष देत वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडीओ मिळवले आणि त्याचा गैरवापर करत ब्लॅकमेल, खंडणी, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केला. काही पीडितांनी या छळामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे.
18 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणी डेटिंग अॅप्सवर अधिक सक्रिय आहेत. ‘टिन्डर’ हे सर्वाधिक लोकप्रिय अॅप असून, त्यानंतर ‘बंबल’ आणि ‘क्वाकक्वाक’चा वापर वाढतो आहे. या अॅप्सवर मोबाईल नंबर, फेसबुक किंवा गुगल खात्याच्या आधारे लॉगिन करून प्रोफाईल तयार करता येते. मात्र, अनेकदा खोटे नाव, बनावट छायाचित्र आणि आकर्षक माहिती वापरून फसवणूक करणार्या व्यक्ती या अॅपवर सक्रिय असतात. ओळख झाल्यानंतर गोड बोलून विश्वास संपादन केला जातो. काही वेळा ‘वन नाईट स्टँड’साठी आमिष देऊन गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार करणार्या घटनाही समोर आल्या आहेत.
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर सेलने विविध जनहित मोहिमा राबवल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारींसाठी सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून होणार्या गुन्ह्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 63, 308, 316, 318 नुसार कारवाई केली जाते. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आरोपीस 3 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी बनावट प्रोफाईल तयार करून पुरुषांकडून पैसे, गिफ्टस् वा अन्य लाभ मिळवले आहेत. अशा घटनादेखील पोलिस तपासातून समोर आल्या आहेत. त्यामुळे लिंगभेद न करता सर्वांनीच अशा अॅप्सचा वापर करताना स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची मानली पाहिजे.
‘डेटिंग’ ही संकल्पना चुकीची नाही; पण तिचा अंधविश्वासाने वापर केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतो. छायाचित्रे आणि गोड शब्दांच्या आधारे नाती तयार करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नात्यांच्या आड येणार्या फसवणुकीच्या सावटाला टाळण्यासाठी सतर्कता आणि सजगता अत्यंत आवश्यक आहे.
खासगी माहिती, फोटो शेअर करू नयेत
भेटीसाठी सार्वजनिक ठिकाणाचीच निवड
अश्लील संवाद वा व्हिडीओ कॉल टाळावेत
दबाव, आमिष किंवा धमकीला बळी पडू नये
संशयास्पद वर्तन आढळल्यास स्क्रीनशॉट घ्यावा आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधावा