

संध्याकाळची वेळ होती. आदित्यने आपल्या मित्राला फोनवरून सरकारने जुन्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) सक्ती केली आहे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, असे विचारतो. त्याचा मित्र घाईगडबडीत असतो. तो त्याला म्हणतो, गुगलवर एचएसआरपी सर्च कर. तुला सगळी माहिती मिळेल.
मग काय आदित्यने गुगलवर ‘एचएसआरपी नंबर प्लेट बुकिंग’ शोधून समोर आलेल्या एका लिंकवर क्लिक केले. ती वेबसाईट अगदी सरकारी असल्यासारखीच होती. वेबसाईटवर दिलेला फॉर्म उघडून त्याने लागणारी सर्व माहिती त्यामध्ये भरली.
फॉर्म सबमिट करायचे वेळी त्याला ऑनलाईन 750 रुपये भरण्यासाठीची विंडो खुली झाली. त्याने ते ऑनलाईन पेमेंट करून टाकले. पेमेंट करताच त्याला एका आठवड्यात नंबर प्लेट मिळेल, असे सांगणारा एसएमएस आला. तो निश्चिंत झाला. मात्र आठवडा उलटून गेला, तरी नंबर प्लेटचा काही पत्ता नाही. वेबसाईटवर दिलेले फोन लावण्याचा आदित्यने प्रयत्न केला. पण नंबर सतत ‘स्विच ऑफ’ येत होता. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली. तिथे विचारणा केली असता त्याला समजले की, त्याने ज्या वेबसाईटवरून पैसे भरले होते, ती बनावट होती!
सध्या सायबर चोरटे प्रत्येक ऑनलाईन व्यवहारात डरला मारण्यासाठी बसलेले असतात. सरकारने देशभरातील 2019 सालच्या पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची (एचएसआरपी) सक्ती केली आहे. ही नंबर प्लेट आपण स्वतः परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरून घेऊ शकतो.
मात्र सायबर चोरट्यांनी हुबेहूब परिवहन विभागाच्या संकेतस्थळासारखे फेक संकेतस्थळ तयार केले आहे. त्यामुळे या नंबर प्लेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना जरा सावध राहा. कारण तुमचे एक चुकीचे क्लिक तुम्हाला सायबर चोरट्यांच्या सापळ्यात अडकवू शकते. पुण्यासह राज्यभरात अनेकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे आणि या सर्व घटना ताज्या आहेत.
वेबसाईट तपासा : एचएसआरपी नंबर प्लेटचे बुकिंग करण्याआधी अधिकृत वेबसाईटची खात्री करा. परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करा.
फोन नंबर आणि ई-मेल तपासा : अधिकृत सरकारी वेबसाईटस्वर नेहमी कार्यरत हेल्पलाईन नंबर आणि ई-मेल असतात. ते नंबर एकदा डायल करून पाहा.
फिशिंग मेसेज आणि कॉल्स : तुमचे एचएसआरपी नंबर प्लेट अपडेट करण्याची गरज आहे या लिंकवर क्लिक करा, असे मेसेज तुम्हाला येऊ शकतात. अशा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सायबर चोरटे नवीन तंत्र वापरून फसवणूक करत आहेत. या चोरट्याने आता एचएसआरपी नंबर प्लेट बुकिंगचा सापळा म्हणून वापर केला जात आहे. यामुळे अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा. कोणत्याही फेक फेक वेबसाईट किंवा मेसेजद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी एकदा नक्की खात्री करा.