Bengaluru Anekal Suitcase Murder Case
बेंगळुरू : बेंगळुरूतील अनेकल तालुक येथील महामार्गाजवळ आढळलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. 17 वर्षीय तरुणीला फूस लावून बेंगळुरूत नेत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले असून तरुणीने या अत्याचाराची वाच्यता करू नये यासाठी हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील नवादा जिल्ह्यातून सात जणांना अटक केली आहे.
बेंगळुरू- होसूर राष्ट्रीय महामार्गालगत ओल्ड चांदपुरा रेल्वे पुलाजळ 21 मे रोजी सुटकेस आढळली होती. रेल्वे पोलिसांचे पथक सुटकेसजवळ पोहोचले असता त्यामधून दुर्गंधी येत होती. संशय आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती सूर्यनगर पोलिस ठाण्याला कळवली. स्थानिक पोलिसांनी सुटकेस उघडली असता त्यात 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह होता.
सुटकेसमधील मृतदेहाच्या वृत्तामुळे बेंगळुरू ग्रामीण भागात खळबळ उडाली होती. तरुणीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. दुसरीकडे तरुणीची ओळख पटत नव्हती. शेवटी पोलिस तपासात प्रकरणाचा उलगडा झाला.
बिहारमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणीचा हा मृतदेह होता. नवादा जिल्ह्यातील बेलारू येथून तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी 23 मेरोजी पोलिस ठाण्यात दिली होती. बेंगळुरू पोलिसांनी मृतदेह ओळख पटल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सहा दिवसात तरुणीची हत्या
15 मे रोजी आशिष कुमार या 42 वर्षांच्या व्यक्तीने फूस लावून तिला बेंगळुरूत आणले. आशिष कुमारचे नातेवाईक हे मृत तरुणीच्या गावी राहतात. या भेटीदरम्यान आशिषची आणि तरुणीची ओळख झाली होती. आशिष हा आधीपासून विवाहित असून त्याला दोन मुलं देखील आहेत.
आशिष 15 मेला पीडित तरुणीसोबत गावातून पळाला आणि तिला बेंगळुरूत आणले. काही दिवस बेंगळुरूत अनेकलमधील मित्राच्या घरी मुक्काम केला. सोबत आलेली तरुणी ही त्याची पत्नी असल्याचे आशिषने मित्रांना सांगितले होते. 20 मे रोजी मित्र कामावर निघून गेल्यावर आशिषने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला आणि तिची हत्या केली.
हत्येनंतर आशिषने मित्रांना कॉल केला. यानंतर आशिष आणि त्याच्या सहा मित्रांनी मिळून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला आणि रेल्वे ब्रिजजवळ फेकून दिला. रेल्वेमधून एखादी सुटकेस पडली असे वाटून पोलिस वेगळ्या दिशेने तपास करतील असे आरोपींना वाटत होते. हत्येनंतर सर्व आरोपी बिहारमधील मूळगावी पळाले होते. बेंगळुरू पोलिसांनी बिहारमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मृत तरुणीचे आईवडील हे बिहारमध्ये मजुरीची कामं करतात. दाम्पत्याला सातही मुली होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.