एस्सीचे शिक्षण घेतलेला अमित साळुंके (वय २४) आणि बीएस्सीच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली विद्या (वय १९) हे एकाच गल्लीत राहणारे. अमितचे वडील मुरलीधर हे प्लंबरचे काम करतात, तर विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही हे प्लंबरचे ठेकेदार आहेत. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन धर्मपरिवर्तन केलेले. अमित आणि विद्या एकाच शाळेत शिकले.
वेगवेगळ्या वर्गात असले तरी ते एकाच गल्लीत राहणारे असल्यामुळे लहानपणापासून एकमेकांच्या ओळ- खीचे होते. विद्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब हा एका राजकीय पक्षाचे काम करायचा. अमितही त्याच्याच ग्रुपचा सदस्य होता. त्यामुळे अमितचे त्यांच्या घरी येणे-जाणे नियमित असायचे तो त्यांच्या चांगला परिचयाचा होता.
शाळेपासून ओळखीचे असलेले अमित आणि विद्या कॉलेजमध्ये जायला लागले. त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, त्यांच्या प्रेमाला विद्याच्या घरातून प्रचंड विरोध सुरू झाला. तिच्या वडिलांनी विद्याचे परस्पर दुसरीकडे लग्न ठरविले. त्यामुळे अमित आणि विद्या हे दोघे घरातून पळून गेले.
२ मे रोजी त्यांनी आळंदीत लग्न केले. इकडे विद्याच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर ठाण्यात विद्याची बेपत्ता म्हणून तक्रार दिली. तिचा शोध सुरू झाला. दरम्यान, अमित आणि विद्याने लग्न केल्याचे अमितच्या कुटुंबीयांना समजले. त्याचवेळी विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अमितच्या घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली.
'जिथं दिसतील तिथं त्यांना संपविणार', अशी धमकी विद्याचा बाप गीताराम याने अमितच्या घरच्यांना दिली होती. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. अमित आणि विद्या आपल्यापासून दूर आहेत. त्यांच्या जीवाचे काही बरे- वाईट झाले तर आपण मदतही करू शकत नाही, या विचाराने भेदरलेल्या अमितच्या वडील मुरलीधर यांनी थोडेसे वातावरण निवळल्यानंतर अमित आणि विद्याला महिनाभरापूर्वी घरी बोलावून घेतले.
आळंदीत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलेले असताना मुरलीधर यांनी १३ जून रोजी बौद्ध रीतिरिवाजाप्रमाणे पुन्हा लग्न लावले. या प्रकारानंतर तरी विद्याच्या कुटुंबीयांचे मनपरिवर्तन होईल, ही अशा अमितच्या कुटुंबीयांना होती. मात्र, जातीचे भूत डोक्यात घुसलेल्या गीताराम यांना लेकीचा संसार, प्रेम, मानवता हे काहीही दिसले नाही. ते जणू संधीची वाटच पाहात होते. अडीच महिन्याच्या काळात त्यांनी अतिशय शांत डोक्याने कट रचला.
१४ जुलैचा दिवस उजाडला. इकडे नवीन लग्न आणि जीवाला धोका असल्यामुळे अमित जास्त घराबाहेर जात नव्हता. त्याचे पेंटरचे कामही बंद होते. विद्या आणि अमितचा सुखी संसार अडीच महिन्यांचा झाला होता. त्यादिवशी संध्याकाळी घरात गेम्स खेळत असलेल्या अमितला त्याच्या मित्राने बोलावले म्हणून तो घरापासून काही अंतरावर गेला.
तेवढ्यात गल्लीतील वीज गेली. त्याच अंधाराचा फायदा घेत गीताराम आणि आप्पासाहेब यांनी अमितवर चाकूने हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्याने तो खाली पडला. त्याचवेळी त्यांनी त्याच्या पोटावर आणि मांडीत जवळपास ८ वार केले. काही वार जिव्हारी लागल्याने अमित रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडला होता. त्यानंतर गीताराम आणि आप्पासाहेब तेथून पसार झाले.
अमितच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यांनी अमितला रिक्षातून तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तेव्हापासून अमितची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्याची प्रिय पत्नी विद्या त्याच्यासोबतच होती. पण, २५ जुलैला अमितने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या अडीच महिन्यांत विद्या अन् अमितच्या प्रेमविवाहाचा शेवट झाला.
विद्या अमितसोबत पळून गेल्याचे लक्षात येताच वडील गीताराम यांचा पारा चढला. त्यांनी तिचा शोध घेतला; पण दोघांनीही लग्न केल्याचे समजताच त्याने घरात विद्याचा फोटो अडकवून त्याला हारद- `खील घातला. विद्याचे सर्व कपडे जाळून टाकले. विद्या आमच्यासाठी मेली, असा संदेश अमितच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविला.
या प्रकारानंतरही विद्या डगमगली नाही. तिने अमितची साथ सोडली नाही. अमितनेही तिला धीर देत 'मी तुझ्यासोबत आहे', अशी ग्वाही दिली. एवढे सर्व होऊनही विद्याने माघार घेतली नाही. त्यामुळेच विद्याच्या कुटुंबीयांनी अमितचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणात आतापर्यंत गीताराम, आप्पासाहेब आणि गीतारामचा जावई स्वप्नील पटेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.