सातारा : पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठल्याने खते, बी-बियाणे, किटकनाशके, तणनाशके यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. रासायनिक खतांचा अतिरेक पर्यावरणासह मानवी आरोग्यास मारक ठरु लागला आहे. याचबरोबर वाढती महागाई व शेतीची ढासळणारी गुणवत्ता यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती रासयनिकतेला पर्याय ठरु लागली आहे.
शेतकर्यांकडूनही शेतामध्ये जैविक खतांचा वापर वाढला असून मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरण संतुलनाला प्राधान्य मिळू लागले आहे.
परंपरागत शेती व्यवसायामध्ये आधुनिकतेचा शिरकाव झाला. यांत्रिकरणाबरोबरच रासायनिक खतांचा वापर वाढला. कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरेक होवू लागला. पिकांसाठी वापरलेल्या रासायनिक खतांची मात्रा प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षरित्या मानवी आरोग्यास घातक ठरु लागली आहे.
रासायनिक खतांवर उत्पादित अन्नधान्यामध्ये रासायनिक घटकद्रव्यांचा अंश आढळून येत आहे. वर्षोनुवर्षे होत असलेल्या रासायनिक खतांच्या मार्यामुळे जमीनीचा पोत घसरला आहे. जमीनीतील खनिजे, आवश्यक घटक नष्ठ होवू लागले आहेत. पूर्वी जमीनीमध्ये गांडूळांचे प्रमाण जास्त असे. रासायनिक शेतीमुळे ते कमी झाले असून शेतकर्यांना कृत्रिमरित्या गांडूळ जमीनीत सोडावे लागत आहेत. तसेच परागीभवनासाठी आवश्यक असलेल्या विविध पशु-पक्षी व किटकांच्या जातीही नामशेष होवू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण साखळी तुटू लागली आहे. जमीनीच्या विविध स्तरातून भूगर्भात निचरा होवू लागले आहेत. त्यामुळे विविध पाणी स्त्रोतही प्रदुषित झाले आहेत.
रासायनिक घटकांचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. मानवी शरीर विविध आजारांना सहज बळी पडू लागल्याचा निष्कर्ष आरोग्य संघटनांकडून स्पष्ट करण्यात आला आहे. या पर्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढली आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादित शेत मालाला मागणी वाढू लागली आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वाचा वापर शेतकरी वर्गाकडून होत आहे. त्यातूनच रासायनिकतेला सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे आला आहे. व्यवसाय व अर्थार्जनाचे माध्यम म्हणून सेंद्रिय शेती व्यवसायाचा विचार होवू लागला आहे.
या शेतीसाठी जीवामृत, गांडूळ खत, गांडूळ पाणी, कंपोस्ट खत या जैविक खतांचा वापर होवू लागला आहे. या खतांची निर्मिती व विक्रीतून नवीन व्यावसायिक माध्यम उपलब्ध झाले असून अनेक बोरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. शेतकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व सेंद्रिय शेती एक उत्तम पर्याय ठरु लागली आहे. तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीस शासनाने चालना देणे गरजेचे आहे.
गायीचे शेण, गोमूत्र, बेसन पीठ, काळी माती, गूळ यांपासून तयार झालेले जीवामृत रासायनिक खतांच्या तुलनेत कमी खर्चात, उत्पादकता वाढीसाठी जास्त फायदेशीर ठरत आहे. जीवामृतामुळे शेतजमीनीचा पोत सुधारत असून पिकांमध्येप्रतिकारकशक्ती वाढत आहे. मातीतील जीवाणूंची संख्या वाढत असून सेंद्रिय कर्वाचे प्रमाण वाढते. त्यामुळे सेंद्रिय शेती व शेतकर्यांसाठी जीवामृत वरदान ठरत आहे.
रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा वापर होत आहे. रासायनिक खतांवर पिकवलेल्या अन्नधान्यामध्ये त्या खतांमधील रसायनिक घटकांचा अंश आढळून येत असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढू लागली आहे. सेंद्रिय शेतीकडे वळू लागला असून पर्यावरण अभ्यासकांचे विषमुक्त शेतीचे स्वप्न साकार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.