US and Iran Ceasefire | फसवी युद्धबंदी 
बहार

US and Iran Ceasefire | फसवी युद्धबंदी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. योगेश प्र. जाधव

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये इराणने एकदाही आम्हाला युद्धबंदी हवी आहे, अशी घोषणा प्रथम केलेली नाही. अगदी अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर उतरवण्याची गर्जना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तेव्हाही इराणने ‘नरकात तुमचे स्वागत आहे’ अशी टिप्पणी करत गर्भित इशारा दिला. यावरून इराणमधील राजवट अमेरिकेच्या कोणत्याही दबावापुढे झुकण्यास तयार नाही, हे स्पष्ट होते. इराणने अनेकदा हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकेचे एकतर्फी आर्थिक निर्बंध पूर्णपणे उठवले जात नाहीत, त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ले करणे थांबत नाही, तोपर्यंत कोणत्याही वाटाघाटी निष्फळ आहेत.

दीर्घकाळ चालणारी युद्धे हे वर्तमानातील जागतिक संघर्षांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बनताना दिसताहेत. युरोपच्या भूमीवर लढले जाणारे रशिया-युक्रेन युद्ध साडेतीन वर्षे उलटूनही संपलेले नाही. दुसरीकडे इराण-अमेरिका यांच्यात पश्चिम आशियात सुरू झालेल्या संघर्षालाही पाहता पाहता पाच महिने उलटून गेले आहेत. या युद्धात अमेरिका, इराण, इस्रायल, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती या देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे; पण त्याहून मोठे नुकसान हाेर्मुझच्या सामुद्रधुनीतील ब्लॉकेडमुळे जगाचे होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या १२५-१३० दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच वेळा लष्करी हल्ले अचानक रद्द केल्याच्या घोषणा केल्या आहेत. महाविनाशक हल्ल्यांचे इशारे द्यायचे आणि ऐन वेळी माघार घेत वाटाघाटींचा उगम शोधायचा, ही इराणविरुद्धच्या हल्ल्यातील ट्रम्प यांच्या धोरणांची ठळक शैली बनली आहे. वारंवार बदलणार्‍या या पवित्र्यामुळे मध्य पूर्व आशियातील शांततेचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहेच. त्याहीपेक्षा ट्रम्प यांच्या धरसोड भूमिकांमुळे अमेरिकेची जागतिक पातळीवर नाचक्की होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शत्रू गुडघे टेकवण्याच्या मार्गावर असल्याचे दावे कितीही केले जात असले, तरी प्रत्यक्षात तेच अचानक माघार घेतात, हे जगाने पाहिले आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी इराणवर महाविनाशक हल्ले करण्याचे ठरवले होते; परंतु ऐनवेळी सौदी अरेबियासह खाडी देशांच्या दबावामुळे आणि वाटाघाटींच्या शक्यतेमुळे त्यांनी हे हल्ले स्थगित केल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, युद्धबंदीच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अत्यंत संवेदनशील जलमार्गावर तणाव कायम ठेवायचा, ही दुहेरी भूमिका ट्रम्प घेत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून त्याच्या झळा तेलाच्या आयातीवर अवलंबून असणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थांना बसत आहेत.

इराण शांततेच्या चर्चेपासून दूर का राहतो? : विशेष म्हणजे, गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये इराणने एकदाही आम्हाला युद्धबंदी हवी आहे, अशी घोषणा प्रथम केलेली नाही. अगदी अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर उतरवण्याची गर्जना ट्रम्प यांनी केली तेव्हाही इराणने ‘नरकात तुमचे स्वागत आहे’ अशी टिप्पणी करत गर्भित इशारा दिला. यावरून इराणमधील राजवट अमेरिकेच्या कोणत्याही दबावापुढे झुकण्यास तयार नाही, हे स्पष्ट होते. इराणने अनेकदा हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकेचे एकतर्फी आर्थिक निर्बंध पूर्णपणे उठवले जात नाहीत, त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ले करणे थांबत नाही, तोपर्यंत कोणत्याही वाटाघाटी निष्फळ आहेत. ट्रम्प एका बाजूला चर्चेचा हात पुढे करतात आणि दुसर्‍या बाजूला लष्करी नाकेबंदी कायम ठेवतात. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने आणि सुरक्षा यंत्रणांनी वारंवार हे सिद्ध केले आहे की, आम्ही अमेरिकेच्या अटींवर कोणतीही तडजोड करणार नाहीत. परिणामी, ट्रम्प वाटाघाटींचा दावा करतात, तेव्हा इराणकडून थेट नकारघंटा वाजवली जाते किंवा चर्चांचे वृत्तच फेटाळून लावले जाते. यामुळे ट्रम्प आणि अमेरिका तोंडघशी पडते.

आताही ट्रम्प यांनी नुकतेच हल्ले टाळून चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस चर्चा सुरू नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. होर्मुझची खाडी पुन्हा सुरू करणे आणि इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अमेरिकेच्या चिंतेवर मार्ग काढणे यावर या चर्चेचे मुख्य केंद्र असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते; पण अमेरिकेचे हल्ले थांबलेले असतानाही इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या तळावर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. तिकडे लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच प्रकार सुरूच आहेत.

युद्धबंदीसाठी अनेक देश प्रयत्नशील : या भीषण युद्धजन्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक देशांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी थेट ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून संघर्ष अधिक न वाढवण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने मार्ग काढण्याचे जोरदार आवाहन केले आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांसारख्या खाडी देशांना या युद्धाचा सर्वात मोठा फटका बसण्याची भीती आहे. कारण, कोणत्याही युद्धाच्या परिस्थितीत या देशांमधील तेल क्षेत्रे आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जाण्याचा धोका सर्वाधिक असतो.

ओमानसारखे देश इराण आणि अमेरिका यांच्यात दुवा बनून वाटाघाटी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानने मागील काळात मध्यस्थीचे प्रयत्न केले. त्यातून तत्कालिक मार्ग निघाल्याचे भासले; पण ते फार काळ टिकलेले नाहीत. जोपर्यंत परस्पर अविश्वासाची भिंत ओलांडली जात नाही आणि दोन्ही पक्ष समान पातळीवर वाटाघाटी करण्यास तयार होत नाहीत, तोपर्यंत पश्चिम आशियातील हे युद्ध आणि ट्रम्प यांच्यापुढील कोंडी अशीच कायम राहणार यात शंका नाही. अमेरिकेने हाेर्मुझवरील इराणचे सार्वभौमत्व पूर्णपणे मान्य केल्यास युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे इराणचे म्हणणे आहे; परंतु असे करणे म्हणजे केवळ अमेरिकेचेच नव्हे, तर जवळपास तीनशे वर्षांपासून चालत आलेल्या पाश्चात्त्य वर्चस्वाच्या अस्तावर शिक्कामोर्तब करण्यासारखे ठरेल. मुक्त नौवहनाची हमी देणारा प्रमुख देश म्हणून अमेरिकेची प्रतिमा कमकुवत होईल.

इराण-ओमानची ‘वेगळी वाट’ : होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरातील सागरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी इराण आणि ओमान यांच्यात एका नवीन आणि महत्त्वपूर्ण कराराची जोरदार हालचाल सुरू आहे. या प्रस्तावानुसार, पर्शियन आखातामध्ये प्रवेश करणारी व्यापारी जहाजे इराणच्या नियंत्रणाखालील ठरवून दिलेल्या मार्गाने जातील, तर आखाताबाहेर पडण्यासाठी ओमानच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र मार्गाचा वापर केला जाईल. या द्विपक्षीय यंत्रणेमुळे या सामरिक जलमार्गावरील ताण कमी होऊन वाहतूक पूर्ववत होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा तोडगा यशस्वी ठरला, तर गेल्या काही महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे ठप्प झालेला जागतिक तेल आणि गॅसपुरवठा सुरळीत होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल; पण हा मार्ग सरळसरळ अमेरिकेच्या ब्लॉकेडला वळसा घालून तयार होणार असल्याने ट्रम्प यांना धक्का बसला आहे. इराणकडे आणखी एक प्रभावी दबावाचे साधन आहे. येमेनमधील अन्सारुल्लाह अर्थात हुती संघटनेच्या माध्यमातून बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवरही तो प्रभाव टाकू शकतो. होर्मुझ आणि बाब-अल-मंदेब हे दोन्ही समुद्री मार्ग अडविण्याची क्षमता इराणकडे असल्यामुळे जागतिक तेलपुरवठा, कंटेनर वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा फटका बसू शकतो.

अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात चिंताजनक घट : डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला उद्ध्वस्त करायचे आहे. जेव्हा जेव्हा इराण अमेरिकेला आव्हान देतो, तेव्हा ट्रम्प यांची ही इच्छा अधिक उग्र स्वरूपात बाहेर येते; मात्र अमेरिकेसाठी नवीन हल्ले करणे अत्यंत धोकादायक आहे, असे त्यांचे लष्करी सल्लागार स्पष्ट करतात आणि त्यांच्या या धमक्यांमुळे महागाई तसेच अमेरिकन बाँडचे व्याजदर झपाट्याने वाढू लागतात, तेव्हा ट्रम्प पावले मागे घेतात; पण नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांमधून ट्रम्प यांच्या कोलांटउड्यांमागे केवळ राजनैतिक दबाव नसून अमेरिकेच्या लष्करी संसाधनांवर पडलेला ताणही तितकाच महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. 'रॉयटर्स'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पाच महिन्यांच्या संघर्षात अमेरिकेने आपल्या सर्वाधिक अचूक आणि महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्रसाठ्यात चिंताजनक घट झाली असून, पेंटागॉनमध्ये याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. भविष्यात चीन किंवा रशियासारख्या महासत्तांशी संघर्ष निर्माण झाल्यास अमेरिकेकडे पुरेशी शस्त्रसामग्री उपलब्ध राहील का, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात विशेष उल्लेख केला जात आहे तो एटीएसीएमएस आणि पीआरएसएम या दोन अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा.

ही दोन्ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी, अत्यंत अचूक आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. शत्रूच्या महत्त्वाच्या तळांवर सुरक्षित अंतरावरून अचूक हल्ला करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. रॉयटर्सने संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धादरम्यान अमेरिकेने उपलब्ध असलेल्या एटीएसीएमएस आणि पीआरएसएम क्षेपणास्त्रांचा जवळपास संपूर्ण साठाच वापरून टाकला आहे. या साठ्यातील घट किती गंभीर आहे, याची माहिती यापूर्वी कधीही सार्वजनिक करण्यात आली नव्हती. एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांनी युक्रेन—रशिया युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेने पुरविलेल्या या क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने युक्रेनने रशियाच्या नियंत्रणाखालील लष्करी तळांवर अचूक हल्ले केले होते. तर पीआरएसएम ही एटीएसीएमएसची पुढील पिढी मानली जाते. अधिक अंतर, अधिक अचूकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान ही तिची वैशिष्ट्ये आहेत. भविष्यात चीनविरुद्ध संभाव्य संघर्षात ही क्षेपणास्त्रे निर्णायक ठरू शकतात, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यांचा साठा कमी होणे ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. आता जगातील इतर लष्करी कमांडकडील उपलब्ध साठा मध्यपूर्वेत हलवून युद्ध सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वृत्त आहे. ट्रम्प यांनी हे वृत्त फेटाळून लावत उत्पादन वाढत असल्याचे म्हटले असले तरी दीर्घकाळ चालणार्‍या युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रनिर्मिती अजूनही पुरेशी नाही. सीएसआयएसच्या अहवालानुसार, फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत अमेरिकेने पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा सुमारे 65 टक्के साठा वापरला आहे. त्याचप्रमाणे टीएचएएडी इंटरसेप्टरच्या साठ्यातही किमान 38 टक्के घट झाली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा जवळपास निम्मा साठा या युद्धात वापरला गेल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेचे सामरीक सामर्थ्य इराणपेक्षा कैकपटींनी अधिक आहे; पण सर्व बाजूंनी प्रतिकूल बनलेल्या परिस्थितीमुळे ट्रम्प यांना बॅकफूटवर जावे लागत आहे आणि इराण या संधीचा फायदा घेत अमेरिकेवरचा दबाव वाढवत आहे. युद्धबंदीचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे ही ट्रम्प यांची आगतिकता असल्याचे सध्याची परिस्थिती दर्शवते. पण जगासाठी हा संघर्ष संपूर्ण हार्मुझमधील व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्ववत होणे आणि कडाडलेले कच्च्या तेलाचे भाव कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. हा शांततेचा सूर्योदय कधी होतो, हे पहायचे.

ट्रम्प यांची कोंडी...

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष प्रत्येक वेळी अशा अडचणीत का येतात, याचे उत्तर अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात आणि जागतिक हितसंबंधांमध्ये दडलेले आहे. ट्रम्प यांच्यासमोर एकीकडे अमेरिकेचे सामर्थ्य जगात सर्वतोपरी सिद्ध करण्याचे आव्हान आहे; तर दुसरीकडे अमेरिकन सैनिकांना दीर्घकाळ चालणार्‍या आणि न संपणार्‍या पश्चिम आशियाई युद्धाच्या खाईत न लोटण्याची राजकीय अपरिहार्यता आहे. तिसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून सतत लष्करी कारवाईचा दबाव आणला जात आहे; तर आखाती देशांकडून ‘पुरे झाले आता’ ही भूमिका घेतली जात आहे. यामुळे ट्रम्प सातत्याने कात्रीत अडकताना दिसत आहेत. ट्रम्प पूर्ण ताकदीने हल्ल्याची भाषा करतात, तेव्हा त्यांना इराणच्या प्रत्युत्तराची आणि पूर्वमध्येतील अमेरिकेच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेची चिंता सतावू लागते. त्यामुळे ते लागलीच शांतीचे तुणतुणे वाजवून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याअर्थाने ते स्वतः एका चक्रव्युहात अडकले आहेत. हा चक्रव्यूह इराणची बाजू वरचढ बनवत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT