Pakistan cricket team faced internal struggle
पाकिस्तानच्या संघात गेल्या दोन वर्षांपासून काहीही आलबेल नाही.  Pudhari File Photo
बहार

पाकिस्तानच्या क्रिकेटला घरघर

पुढारी वृत्तसेवा

सुनील डोळे

निवड समितीतील वशिलेबाजी, खेळाडूंमधील गटबाजी, फिटनेसचा अभाव, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप, अशा अनेक कारणांमुळे पाकिस्तानचे क्रिकेट रसातळाला चालले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तर पाक संघाला बाद फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या दारुण पराभवाची बीजे तिथल्या भोंगळ व्यवस्थेत लपली आहेत.

संपन्न भूतकाळ आणि अस्वस्थ करणारे वर्तमान अशी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची अवस्था झाली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत या संघाचे आव्हान अपेक्षेपेक्षा फारच लवकर आटोपले. यजमान अमेरिकेचा संघ म्हणजे पाकिस्तानपुढे अगदीच तान्हुले बाळ. आश्चर्य म्हणजे, या संघाकडूनही पाकला आश्चर्यकारक पराभव स्वीकारावा लागला. गेल्या स्पर्धेत याच पाक संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. यावेळी बाद फेरीसुद्धा बाबर आझमच्या टीम पाकिस्तानला गाठता आली नाही.

टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा गाजावाजा करीत दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली पाक बाद फेरीपर्यंतही पोहोचू शकलेला नाही. यामुळे संपूर्ण संघ आणि कोचिंग स्टाफवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्स्टन यांनी हे सगळे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. संघातच एकोपा नसेल, तर प्रशिक्षक काय करणार, असे त्यांनी म्हटले आहे. पाक संघाला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यांत दोन पराभवांचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने त्यांना धूळ चारली. नंतर कॅनडा आणि आयर्लंड या संघांवर विजय मिळवून पाकने शेवट गोड केला. तोपर्यंत अर्थातच खूप उशीर झाला होता. या पार्श्वभूमीवर, बाबर आझम याने कर्णधारपदाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काहीच साध्य होणार नाही. कारण, आडातच नसेल तर पोहर्‍यात येणार कुठून, याचे उत्तर कोणाकडेही नाही.

गटबाजीमुळे संघ पोखरला

पाकिस्तानच्या संघात गेल्या दोन वर्षांपासून काहीही आलबेल नाही. वन-डे विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर बाबर आझम याला कर्णधारपदावरून हटवून वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. मध्येच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला कसला तरी साक्षात्कार झाला आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी आफ्रिदीऐवजी बाबर आझमकडे कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे आफ्रिदी चवताळला. त्याने मैदानात आणि मैदानाबाहेरही आझम याच्याशी पंगा घेतला. हा वाद एवढा टोकाला गेला की, दोघे मैदानातही परस्परांना पाण्यात पाहू लागले. संघात दोन गट निर्माण झाले. त्याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होत गेला. त्याबद्दल कुणालाच ना खंत, ना खेद. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने (पीसीबी) यात आपण जणू त्या गावचेच नाही, अशी भूमिका घेतली. पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर यासंदर्भात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. त्यानंतर ‘पीसीबी’ला किंचित जाग आल्याचे दिसते. आता म्हणे, संघावर मोठी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. माजी महान खेळाडू वसीम अक्रम याने या वादात उडी घेऊन, बैल गेला अन् झोपा केला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, संघाची रचना तर सदोष आहेच; शिवाय ‘पीसीबी’मध्ये वशिलेबाजी बोकाळली आहे. त्याचा फटका अंतिमतः संघाला बसत आहे. मात्र, त्याने केलेल्या या अचूक निदानाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.

‘त्या’ व्हिडीओनंतर संतापाचा विस्फोट

संकटे कधीच एकटी येत नाहीत. ती सोबत आपल्या सग्यासोयर्‍यांनाही घेऊन येतात, असे म्हटले जाते. अमेरिकेविरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावल्यानंतर पाकमधील वरिष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, बाबरसह त्याच्या निवडक संघ सहकार्‍यांना महागडी गिफ्ट मिळाली आणि त्या बदल्यात त्यांनी अमेरिकेला सामना बहाल केला. काहींना आलिशान कार, तर काहींना ऑस्ट्रेलिया आणि दुबईत महागडी अपार्टमेंट मिळाल्याचा दावा लुकमान यांनी या व्हिडीओत केला आहे. यामुळे चाहत्यांच्या संतापाचा विस्फोट झाला आहे. त्यांनी ‘पीसीबी’कडे या आरोपांची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. एवढेच नव्हे, तर टीम इंडियाविरुद्ध गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी केलेली हाराकिरी संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. आपला मुद्दा पटवून देताना लुकमान यांनी म्हटले आहे की, जर आयर्लंडविरुद्धच्या लढतीत जिगरबाज खेळ करून पाकिस्तानने विजय खेचून आणला, तर अमेरिकेविरुद्ध त्यांना अशी विजिगिषू वृत्ती का दाखवता आली नाही. यावर बाबर आझमचे म्हणणे असे की, संघात अकरा खेळाडू असतात. मी एकटा सर्व खेळाडूंच्या जागी खेळू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी समजली पाहिजे. त्याचे हे म्हणणे खरे असले, तरी या संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानने केलेली कामगिरी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे, यात शंका नाही. आता ‘पीसीबी’च्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ‘आयसीसी’कडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाले तर पाकिस्तानच्या क्रिकेटची उरलीसुरली प्रतिष्ठाही मातीमोल होण्याचा धोका संभवतो.

‘पीसीबी’तील सावळागोंधळ

पाकिस्तान क्रिकेट मंडळावर तेथील राजकीय परिस्थितीचा प्रचंड प्रभाव असल्याचे लपून राहिलेले नाही. सध्या मोहसीन नक्वी यांच्याकडे ‘पीसीबी’ची धुरा आहे. भारतीय संघाने सहा धावांनी पाकवर विजय मिळवला, तेव्हा ते स्टेडियममध्ये उपस्थित होते. खिन्न मनाने त्यांनी तेव्हा सांगितले होते की, आम्हाला कटू निर्णय घेण्याखेरीज पर्याय नाही. नक्वी यांच्या आधी झका अश्रफ यांच्याकडे ‘पीसीबी’चे अध्यक्षपद होते. शाहिन आफ्रिदी हा त्यांचा लाडका खेळाडू असल्यामुळे बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेण्यासाठी ते उत्सुक होते. वन-डे विश्वचषकातील सुमार कामगिरीचे कारण देत त्यांनी आझमला नारळ देऊन संघाची कमान आफ्रिदीकडे सोपविली. मोहम्मद हाफिज यांच्याकडे ‘पीसीबी’चे संचालकपद देण्यात आले. सलमान बट यांना निवड समितीचे अध्यक्ष करून, वहाब रियाझ यांची नियुक्ती त्यांचे सल्लागार म्हणून करण्यात आली. मात्र, मध्येच कोठे तरी माशी शिंकली आणि काही तासांतच रियाझ यांची नियुक्ती रद्दबातल ठरविली गेली. कसोटीसाठी शान मसूद आणि वन-डेसाठी शाहिन आफ्रिदी यांना कर्णधार करण्यात आल्यानंतर पाक संघाने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ला. दरम्यान, ‘पीसीबी’मध्ये पुन्हा खांदेपालट झाली. नक्वी यांच्या हाती सूत्रे येताच त्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना संधी देण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे प्रतिभावंत खेळाडूंची मुस्कटदाबी होत गेली.

फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा फिटनेस म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांपेक्षाही रहस्यमय कथा बनली आहे. संघाचे प्रशिक्षक कर्स्टन यांनी सूत्रे हाती घेताच, संघाच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली. त्यांना असे दिसून आले की, काही खेळाडू एका दमात दोन कि.मी. धावण्याचा निकषही पार करू शकत नाहीत. तरीही त्यांना संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे कर्स्टन यांनी आहारविषयक पुस्तिका जारी केली आणि नियमांचे कसोशीने पालन करण्याचे फर्मान सोडले. याविरोधात खेळाडूंनी ‘पीसीबी’ला साकडे घातले. दुसर्‍याच दिवशी सूत्रे फिरली आणि कर्स्टन यांना ते फर्मान मागे घ्यावे लागले. चमचमीत बिर्याणीसह मसालेदार पदार्थांवर ताव मारणे हा पाकिस्तानी खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतात फिटनेस हा परवलीचा शब्द मानला जातो. अगदी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे खेळाडूसुद्धा पाहता क्षणीच फिट दिसतात. याच्याविरुद्ध स्थूलता म्हणजे पाकिस्तानी खेळाडू असे समीकरणच बनले आहे. कर्स्टन यांनी कितीही डोकेफोड केली, तरी जोपर्यंत या परिस्थितीत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानचा संघ असाच गाळात जात राहणार. किडलेली यंत्रणा, खजिन्यातील खडखडाट, बोकाळलेली वशिलेबाजी, फिटनेसचा अभाव, गटबाजीचा सुकाळ आणि युवा खेळाडूंची कोंडी ही पाकिस्तानी क्रिकेटच्या र्‍हासाची मुख्य कारणे आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल, तर ‘पीसीबी’चे सर्वेसर्वा मोहसीन नक्वी म्हणतात त्याप्रमाणे मोठी शस्त्रक्रिया बड्या धेंडांवर करावी लागणार आहे. त्यानंतरच पाकचा संघ कात टाकू शकेल.

110 किलोचा आझम खान

बहुतांश खेळाडूंना अतिरिक्त चरबीच्या समस्येने घेरले आहे. त्याबद्दल वारंवार त्यांची खिल्लीही उडविली जात आहे. पंचवीस वर्षीय क्रिकेटपटू आझम खान हे त्याचे नमुनेदार उदाहरण. त्याचे वजन आहे 110 किलो. तरीही या वजनदार खेळाडूला संधी मिळाली आणि तीसुद्धा जिथे शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत. तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे, असे म्हणतात. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली होती. एवढेच नव्हे, तर त्याच्याऐवजी साठ किलो वजनाचे दोन खेळाडू पाकिस्तानने खेळवावे, अशी उपरोधिक मागणी करण्यात आली होती. आझम खानची ओळख इथेच संपत नाही. कारण, तो पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक मोईन खानचा चिरंजीव आहे. वडिलांमुळेच त्याला पाक संघात स्थान मिळाले आहे, असा आरोप अनेकदा केला जातो. मोईन खान हा एक उत्कृष्ट खेळाडू होता. नंतर त्याने पाकिस्तानचे कर्णधारपदही भूषवले. सोबतच तो एक चतुर फिनिशर म्हणूनही प्रसिद्ध होता.

SCROLL FOR NEXT