वायू प्रदूषण वाढल्याने लोकांच्या चिंतेत वाढ. Pudhari File Photo
बहार

चिंता प्रदूषणबळींची

वायू प्रदूषणामुळे 21 लाख भारतीयांचा मृत्यू, 1.69 लाख मुले मृत्युमुखी

पुढारी वृत्तसेवा
विकास मेश्राम

पर्यावरण प्रदूषण ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अनियोजित विकास यामुळे या समस्येत भर पडत आहे. पण आधुनिकतेच्या आणि विकासाच्या आंधळ्या शर्यतीमुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

युनिसेफ आणि अमेरिकेची स्वतंत्र संशोधन संस्था ‘हेल्थ इफेक्टस् इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. या अहवालामध्ये 2023 मध्ये वायू प्रदूषणामुळे 21 लाख भारतीय मृत्युमुखी पडल्याचे वास्तव समोर आणण्यात आले आहे. खेदाची गोष्ट म्हणजे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1.69 लाख मुले होती, ज्यांनी अजून जगही नीट पाहिले नव्हते. हे आकडे त्रासदायक आणि अस्वस्थ करणारे आहेत. त्याचबरोबर या दिशेने आजवर गांभीर्याने प्रयत्न का होत नाहीत, असा प्रश्न धोरणकर्त्यांना विचारण्यास भाग पाडणारेही आहेत.

केवळ भारतच पर्यावरण प्रदूषणाच्या संकटाशी झुंजत आहे, असे नाही. चीनमध्येही याच काळात 23 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जगात वर्षभरात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या सुमारे 81 लाख असल्याचे सांगितले जाते. भारत आणि चीनमध्ये वायू प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंच्या एकूण संख्येचा विचार केला तर जागतिक स्तरावर हा आकडा 54 टक्के आहे आणि ही चिंतेची बाब आहे. आपल्या व्यवस्थेचे अपयश आणि प्रदूषण नियंत्रणात सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष दर्शवते. प्रदूषण पसरण्याची मुख्य कारणे कोणती आहेत आणि ते कसे रोखता येतील, ही बाब सर्वश्रुत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामागे रस्त्यांवरील खासगी वाहनांची वाढती संख्या, दर्जेदार इंधनाचा वापर नसणे, उघड्यावर सुरू असलेली बांधकामे, घातक वायूंचे नियमन नसणे आणि उद्योगधंद्यांतून निघणारा धूर अशी अनेक कारणे आहेत. दुसरीकडे निवासी वसाहती आणि व्यावसायिक संस्थांचे शास्त्रीय पद्धतीने बांधकाम न होणे हेही प्रदूषण वाढण्याचे एक कारण आहे. किंबहुना अनियोजित वसाहती आणि बहुमजली इमारतींच्या बांधकामामुळे हवेचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत झाला आहे, जो वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त होता. शेतकरी शेतातील कचरा जाळतात म्हणून वायू प्रदूषण होते, असे म्हणत सरकार आपली जबाबदारी शेतकर्‍यांवर टाकून प्रदूषण नियंत्रणाच्या जबाबदारीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे; पण केवळ शेतकर्‍यांना यासाठी जबाबदार धरता येणार नाही.

पर्यावरण प्रदूषण ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अनियोजित विकास यामुळे या समस्येत भर पडत आहे. प्रदूषणामुळे जमीन, आकाश, पाणी, हवा सर्वच प्रदूषित होत आहेत. पण आधुनिकतेच्या आणि विकासाच्या आंधळ्या शर्यतीमुळे येणार्‍या पिढ्या आणि आताची लोकसंख्येला खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, याची कोणालाच चिंता नाही. प्रदूषित हवा आणि त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ रोज नवनवीन संशोधनात गुंतले आहेत. प्रदूषित हवेचा गुन्ह्याशीही खोल संबंध असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. वायू प्रदूषण वाढल्याने लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे. ताणतणाव आणि कॉर्टिसॉल हार्मोनच्या वाढीचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊ लागतो. ते अस्वस्थ होऊन अनैतिक गुन्हेगारी वर्तन करू लागतात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मार्च 2019 च्या अभ्यासात असेही दिसून आले होते की, विषारी, प्रदूषित हवेच्या संपर्कात असलेल्या किशोरांना मनोविकाराचा धोका जास्त असतो. यामुळे शिकण्यात आणि समजण्यात अडचण निर्माण होते व मुलांच्या बुद्धिमत्तेचे प्रमाण कमी होते. न्यूयॉर्कमधील कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या संशोधनात संशोधकांना असे आढळून आले की, ज्या ठिकाणी प्रदूषित हवेची पातळी जास्त आहे, तेथे गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. संशोधनाचे लेखक डॉ. जॅक्सन जी लू म्हणतात की, वायू प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्यच खराब होत नाही तर त्यांची नैतिकताही बिघडू शकते. आम्हाला आढळून आले की, हवेतील विषारी घटक आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात आणि लोकांच्या वर्तनावरही परिणाम करतात. किशोरवयीनांच्या आरोग्यावर करण्यात आलेल्या अभ्यासातही प्रदूषित हवेचा किशोरांच्या रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो याची पुष्टी केली आहे. या अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी निष्कर्ष काढला असून वायू प्रदूषण कमी केल्याने बालगुन्हेगार कमी होऊ शकतात.

प्रदूषित हवेचे परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावरील ज्ञात परिणामांच्या पलीकडे जातात. तरीही अनेक देशांमध्ये वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, हे विशेष. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरातील दहापैकी नऊ लोकांना आता विषारी हवेचा श्वास घेण्यास भाग पाडले जात आहे. परंतु आता सर्व संशोधन आणि अभ्यासांवर आधारित आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत की, खराब हवेची गुणवत्ता आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईट आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारांनी आपल्या देशाचे भविष्य आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी अधिक टिकाऊ वाहतूक, कार्यक्षम आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन आणि वापर आणि कचरा व्यवस्थापन विकसित करून ठोस कृती करणे आवश्यक आहे.

युनिसेफच्या अहवालात गतवर्षी वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या 21 लाख लोकांमध्ये दुर्दैवाने 1,69,400 मुले आहेत. ज्यांचे सरासरी वय पाच वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. गरोदर महिलांवर प्रदूषणाच्या घातक परिणामामुळे मुले वेळेआधीच जन्माला येतात आणि त्यांचा शारीरिक विकासही व्यवस्थित होत नाही. यामुळे मुलांचे वजन कमी, दमा आणि फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. नायजेरिया, पाकिस्तान, बांगला देश, इथिओपिया यांसारख्या अत्यंत गरीब देशांपेक्षा आपल्या देशात वायू प्रदूषणामुळे जास्त मुले मरत आहेत ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटामुळे वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. एक अब्ज 40 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासाठी हे संकट फार मोठे आहे. दक्षिण आशियातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण वायू प्रदूषण आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब, कुपोषण आणि तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतात. किंबहुना गरिबी आणि आर्थिक विषमतेमुळे, मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शक्य असेल त्या मार्गाने उदरनिर्वाह करण्यात गुंतलेली आहे. त्यांचे प्राधान्य प्रदूषणापासून संरक्षणापेक्षा भाकरीला आहे. ढिसाळ कायदे, यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि जनजागृतीचा अभाव यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्याने पुढाकार घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून धोरणे का बनवली जात नाहीत, असा प्रश्न पडतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT