युधिष्ठिराने आयोजित केलेला अश्वमेध यज्ञ हा मानवी इतिहासातील सर्वांत भव्य यज्ञ म्हणून ज्ञात आहे. या यज्ञात कोणतीही उणिव राहाणार नाही, याची काळजी युधिष्ठिराने घेतली होती. यज्ञात सहभागी ऋषींना युधिष्ठिराने अन्नधान्य, कपडे, गाई देऊन सन्मान केला होता. मानवजातीच्या इतिहासात असा यज्ञ पूर्वी कधी झाला नव्हता, आणि भविष्यातही असा यज्ञ होणार नव्हता.
हा यज्ञ सुरू असताना दोन शेतकरी एक वाद घेऊन युधिष्ठिराकडे आले. या वाद फक्त युधिष्ठिर सोडवले, असे त्यांना मनोमन वाटत होते. यातील एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला त्याची शेतजमीन विकली होती. दुसरा शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्याला एक हंडा शेतात सापडला होता. हा हंडा रत्नांनी, माणकांनी भरला होता. हा हंडा घेऊन तो पहिल्या शेतकऱ्याकडे गेला, आणि म्हणाला या हंड्यावर तुझा अधिकार आहे, मी फक्त जमीन खरेदी केली आहे, जमिनीच्या पोटात काय आहे, यावर माझा हक्क नाही. तर पहिल्या शेतकऱ्याचे मत असे होते की त्याने जेव्हा शेत विकले तेव्हा शेतातील आणि शेताच्या पोटातील सर्व गोष्टींवर तुझाच अधिकार आहे.
कलियुग कधी सुरू झाले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला महाभारतात मिळते. युधिष्ठिराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञानंतर कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगात पृथ्वीवर किती धर्म शिल्लक राहिला आहे, याचे उत्तरही महाभारतात दिलेले आहे.
युधिष्ठिर या दोघांच्या प्रामाणिपणावर प्रसन्न झाला, पण या दोघांच्या वादात काय तोडगा काढायचा हे काही युधिष्ठिरला उमजत नव्हते.
युधिष्ठिराने ही समस्या श्रीकृष्णाला सांगितली. श्रीकृष्णाने या दोन्ही शेतकाऱ्यांना रत्नांचा हा हंडा राजाच्या ताब्यात देऊन तीन महिन्यांनी परत येण्याचे आदेश दिले. दरबारातून शेतकरी निघून गेले पण युधिष्ठिराला प्रश्न पडला की ३ महिन्यांनी काय बदल होणार आहे?
श्रीकृष्ण म्हणाला, "आजपासून ३ महिन्यांनी जेव्हा यज्ञ संपेल तेव्हा कलियुगाची पहाट उजाडलेली असेल. औदर्याची जागा लोभाने आणि आपुलकीची जागा क्रोधाने घेतलेली असेल. पृथ्वीवर जी मूल्यव्यवस्था घडवेलली होती, त्यातील फक्त एकचतुर्थांश मूल्येच पृथ्वीवर राहतील."
तीन महिन्यानंतर हे दोन शेतकरी युधिष्ठिराकडे आले आणि दोघेही ही घागर आपलीच असल्याचा दावा करू लागले. युधिष्ठाराला आता तोडगा काढणे शक्य होते. त्याने राजाच्या अधिकारात धनाचे तीन समान भाग केले. प्रत्येकी एक आपापसांत भांडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला तर एक भाग राजकोषात जमा केला.
यज्ञ संपल्यानंतर शाही अश्वाचा बळी देण्यात आला. या वेळी एका मुंगुसाने यज्ञ मंडपात प्रवेश केला. मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी होते तर एक बाजू नेहमीसारखी होती. ही बाजूही सोनेरी व्हावी म्हणून त्याने ही यज्ञकुंडातील राखेत घासली, पण त्याची ही बाजू सोनेरी होऊ शकली नाही. निराश झालेले मुंगुस यज्ञमंडपासून निघून गेले.
मुंगुसाने त्याची कथा ऋषींना सांगितली. तीन महिन्यांपूर्वी एका अतिशय गरीब कुटुंबात एक अतिथी आले होते. या कुटुंबाने त्यांच्याकडील अत्यल्प भोजन या अतिथीला जेवायला दिले. ज्या झाडांच्या पानावर अन्न वाढण्यात आले होते, त्या रिकाम्या पानांवर मुंगुसाने अंग घासले होते, आणि त्याचे अर्धे अंग सोनेरी झाले होते.
ऋषिमुनींना याचा अर्थ समजला. "युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ खरा होता, पण त्या औदार्य नव्हते. साहजिकच युधिष्ठिराचा यज्ञ खऱ्या यज्ञाची योग्यता गाठू शकला नाही," हे सत्य होते.
महायुद्ध सुरू होण्यापूर्वी धौम्य ऋषी म्हणाले होते, पृथ्वीवरचा धर्म पांडवांमध्ये एकवटलेला आहे. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्यात प्रत्येकी एकचतुर्थांश धर्म आहे, तर उरलेला एक चतुर्थांश धर्म नकुल आणि सहदेवमध्ये आहे. मात्र आता हे चित्र बदलेल, कारण पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात झालेली आहे. कलियुगात अर्जुन अहंकाराचा बळी ठरेल, भीमाला भूक आवरणार नाही, नकुल भौतिक सुखात रममाण होईल, तर सहदेव उद्धट होईल. याला अपवाद म्हणजे युधिष्ठिर, त्याचे वर्तन नेहमी धर्माला धरून असेल. थोडक्यात कलियुगात पृथ्वीवर केवळ एकचतुर्थांश इतक्याच धर्माचे अस्तित्व असेल.
संदर्भ - देवदत्त पट्टनायक लिखित जय - महाभारत सचित्र रसास्वाद, भाषांतर - अभय सदावर्ते, पॉप्युलर प्रकाशन