'कालीमाँ मला मोक्ष नको'|स्वामी विवेकानंद यांचा अखेरचा दिवस कसा होता?

'मला या जन्मानंतर पुन्हा भारतात जन्माला येऊ दे'
स्वामी विवेकानंद यांना ४ जुलै १९०२ला महासमाधी प्राप्त झाली
File Photo

स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त

शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या 'युगप्रवर्तक विवेकानंद' (विजय प्रकाशन) या ग्रंथातून साभार

हे कालीमाते, मी गेल्यावर तिला सांभाळ. आयुष्यभर ग्रीष्म झळाच पचवल्यात तिने. मृगाची बरसात कर तिच्यावर, भूपेन, महेनला तिच्यासमवेत राहण्याची बुद्धी दे. खरं तर ज्येष्ठ पुत्र मी, तिच्या करिता फारसं काही करू शकलो नाही, याचं मला दुःख आहे. ते माझ्यासह येणारच आहे.

काल मी माताजींना भेटायला गेलो होतो. ठाकूरजींच्या महाप्रस्थानानंतर आज पंधरा-सोळा वर्षे झालीत, त्या तपस्विनीप्रमाणे जगताहेत. मी जाण्याने झालेलं दुःख त्या सहज पचवतील. परंतु अंतर्यामी त्यांना धैर्य दे."

"कालीमाँ, आज तुला माझ्यासाठी एकच मागतो, माझ्या भारतवासीयांना सुखी ठेव. त्यांना अन्नधान्याची उणीव राहू देऊ नकोस. आत्ता आत्ता ते जागृत झाले आहेत. त्यांना जागृत राहू दे. स्वातंत्र्याची पहाट होणारच आहे. अंधार खूप झाला होता. आता उगवतीला स्वातंत्र्यसूर्य येणारच आहे. माझ्या भारतीय युवकांना साहस दे, शक्ती दे, नीतिपरायणता दे. त्यांना अनंत शक्ती दे, असीम उत्साह दे, कालीमाँ, युवकांना आता जाणीव झाली आहे. धर्माचं संघटन होऊ दे. ज्ञान, भक्ती, योग आणि कर्म याचं भान राहू दे. युवकांना सांभाळ. देश-विदेशात जाताना भारतभूमीचं भान असू दे.

'पुण्यभू भारत मातेच्या अंगावर खेळू दे'

मागच्या जन्मी कोण होतो, कुठे होतो आठवत नाही. परंतु माझ्या लेखी मी अधर्म केला, असं पूर्वसंचित आहे. म्हणूनच या जन्मी मी धर्मासाठी प्रयत्न केला आणि त्या अधर्म कृत्याच्या वेदना आता भोगतोय. कालीमाँ, पुढच्या जन्मी मला पुण्यभू भारत मातेच्या अंगावर खेळू दे. पुण्यसलीला भागीरथीच्या तीरावर बागडू दे. मला या जन्मानंतर पुन्हा भारतात जन्माला येऊ दे. मला मोक्ष नको कालीमाँ. मला मोक्ष नको"

'हे काही ठीक नाही नरेनचं'

बऱ्याच वेळाने ते मंदिराबाहेर आले. तेव्हा स्वरूपानंदानी विचारलं, "दारं, खिडक्या लावून इतका वेळ काय करत होतास. जिवाला घोर लावलास सर्वांच्या. ही काय रीत झाली?"

"खरंच लक्षच राहिलं नाही," ते शांतपणे म्हणाले. पण स्वरूपानंदांना वाटलं "हे काही ठीक नाही नरेनचं. आजकाल विचित्रच वागतोय तो." असं वाटलं ना वाटलं तोच विवेकानंद त्याच्यासह जेवणघरात गेले.

"आज मी सर्वांना वाढणार" विवेकानंद उत्साहाने म्हणाले. तसं स्वरूपानंद म्हणाले, "आज स्वामीजी अधिकच प्रसन्न दिसताहेत. सदानंद वाढू दे बाबा त्यांना. पूर्वी मनात आलं की स्वयंपाकघरात जाऊन अनेकदा स्वयंपाक करायचे. आज वाढायचं म्हणताहेत तर वाढू दे."

अद्वैतानंद गेल्या आठवड्यापासून असणारा त्यांचा उत्साह पाहून आजची तारीखही विसरले होते. विवेकानंद वाढत होते आणि विनोद करून हसवत होते.

Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद यांनी वेदांताच परिचय विश्वाला करून दिलाFile Photo

'भारतातच ज्ञानरवीचा उदय झाला'

जेवणं झाली, गेल्या आठ दिवसांत ते एकदाही दुपारी झोपले नव्हते. आजही त्यांनी नेहमीप्रमाणे संस्कृतचं व्याकरण शिकवायला सुरुवात केली आणि विषय बाजूला राहून देशाच्या आजच्या स्थितीत युवकांचं कर्तव्य या विषयावर बोलत राहिले.

"मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आहे. शिक्षणाने मनाचा विकास होती. परंतु आध्यात्मिक उन्नती स्वतःच करावी लागते. आध्यात्मिक हा काही चंदनलेप नाही, जो अंगावर लावता येईल.

भारतातच सर्वप्रथम ज्ञानरवीचा उदय झाला. इथला धुलीकण ऋषिमुनीच्या पदस्पर्शाने पुनित झाला आहे. या भूमीतून अध्यात्माच्या, तत्त्वज्ञानाच्या, संस्कृतीच्या, साधनेच्या लहरी प्रवाहित झाल्या आहेत आणि सहस्त्र सहस्त्र वर्षे याच लहरी अखिल विश्वाला संजीवन देणार आहेत. तुम्ही सारे भाग्यवान आहात, तुम्ही सारं हे अनुभवणार आहात. परंतु आता माझी वेळ झाली आता..."

त्यांच्या समोरून विद्यार्थी, शिष्य उठले.

संध्याकाळ हलक्या पावलांनी जमिनीवर उतरू लागली होती. विवेकानंद मठाच्या अंगणात येरझारा मारत होते आणि काहीतरी सतत बोलत होते. स्वरूपानंद, अद्वैतानंद, बोधानंद दूर थबकले होते. इतक्यात विवेकानंद मधुर स्वरात उंच आवाजात गाऊ लागले

"मन चलो निज निकेतने, संसार विदेशे, विदेशीर वेशे भ्रमो कैनो अकारणे, मन चलो निज निकेतने."

नरेनचं खूप आवडतं भजन आहे. ठाकूरजीना त्यांनी गाऊन दाखवलं होतं आठवतं ना?" बोलता बोलता ते तिघंही मठात गेले.

'वेदान्त मी दूरदेशी नेला'

विवेकानंद सदानंदासह आपल्या खोलीत परतले, तेव्हा संध्याकाळ गडद झाली होती. सदानंदानी दिवे लावले. खोली उजळली. विवेकानंदांनी चोलीच्या खिडक्या, दारं उघडायला सांगितली.

भागीरथीच्या पात्रात दीप सोडले होते. दीपावलीची प्रतिबिंबं भागीरथीच्या पाण्यात होती. आकाशात नक्षत्रांची दाटी होती. अद्याप चंद्राचा उदय झाला नव्हता. दूर दक्षिणेश्वरी ते पाहत होते. जीवनाचा खरा प्रवास जिथून सुरू झाला, ते स्थळ दिसता दिसत नव्हतं. एकदा एक वय संपलं की, त्या वयातले संदर्भ आठवतात. ऋतूप्रमाणे ते पुन्हा पुन्हा परतुन येत असतात. त्यांनी मंदिराच्या दिशेने नमस्कार केला.

"ठाकुरजी, जीवनाचा अर्थ शोधत भारतभर पायपीट केली. संवेदना तरल झाल्या. दु:खाशी नातं जुळलं आणि कळला मानवाचा धर्म, ती मानवधर्म संकल्पना ज्या वेदान्तात आहे, तो वेदान्त मी दूरदेशी नेला. मला खूप काही करायचं होतं. पण..." ते उदासले.

Swami Vivekananda
नरेंद्र ते स्वामी विवेकानंद, असा त्यांचा प्रवास आपल्यासाठी सदैव प्रेणादायी आहेFile Photo

'आता चिरनिद्रा येऊ दे'

"नोरेन, वत्सा तू खूप केलं आहेस. आता मृत्यूच तुझ्या येण्याचं प्रयोजन सिद्ध करीत, खूप थकला आहेस तू! आता ये वत्सा, माझ्याकडे आता तुझ्या समाधीच्या कुलपाची तुला दिली आहे. उघड कुलूप आणि ये माझ्याकडे. येतोस ना! मी प्रतीक्षा करतोय तुझी, ये वत्सा ये."

विवेकानंदांच्या अंतर्मनात त्यांचे शब्द उमटले होते. त्यांनी खिडकीतून मान आत ती सदानंद पुस्तक वाचत होता. ते त्याला म्हणाले-

"सदानंद, दाराबाहेरच्या व्हरांड्यात बसशील का? मी ध्यान करतो." सदानंद उठून बाहेर गेला. ते पूर्वेकडे तोंड करून पद्मासन घालून बसले.

"ये, मृत्यो ये. आज मी तुला आमंत्रित केलंय. आजवर मी कधीही आमंत्रित केलं नव्हत. आज तू सादर आमंत्रित आहेस. कदाचित तू व्यस्त असशील, विलंबाने येशील, माझी परीक्षाही घेशील. परंतु मृत्यो, आता मला माझी परीक्षा नकोय. कधीचीच निद्रा हरवलीय माझी. आता चिरनिद्रा येऊ दे. खूप शांत शांत झोपायचंय् मला. मग पुन्हा नवतेजाने मी परत येईन माझ्या भारतभूमीवर. परंतु आता ये. सत्वर ये. हातची कामं टाकून ये. तुझी पावलं जवळजवळ येऊ लागल्याचा मला भास तर होत नाही ना? निराकाराच्या प्रशस्त मार्गावरून तू येताना दिसत नाहीस. परंतु जाणवू लागलाय तुझ्या पावलांचा आवाज, ये मृत्यो ये. सहज ये. मधुरतम भावना घेऊन ये. सत्वर ये."

त्यांनी मनोमन मृत्यूचा धावा सुरू केला होता. हातात जपमाळ होती. मनात अनाहत नाद होता. निराकाराचा प्रशस्त मार्ग समोर साकारत होता. प्राजक्ताचा दरवळ होता. मार्गावर दोन्ही बाजूला वृक्षांची दाटी होती. समोर हिमशिखरावर गर्द निळ्या भात शिवशंकराची प्रतिमा होती. त्यावर शुभ्रधवल चंद्रकोर होती. शिवशंकराने दोन्ही बाहू पसरले आणि विवेकानंदांना मिठीत घेण्यासाठी ते पुढे सरसावले.

Swami Vivekananda
भारताकडे जगाला देण्यासारखे काय आहे, असा प्रश्न विचारला तर त्यांचे उत्तर असे, 'वेदांत, वैदिक संस्कृती आणि अध्यात्म'File Photo

'प्रत्यक्ष शिवशंकर आलेत माझ्याजवळ'

त्यांच्या हातातली जपमाळ खाली पडली आणि तसाच त्यांचा देहही जमिनीवर आडवा झाला. सदानंद एकदम धावला. त्याने विवेकानंदांना पडताना पाहिलं होतं. तो सर्वांना हाक मारायला धावला.

सारी जणं धावली. विवेकानंदांना अंथरुणावर ठेवलं, किंचित श्वास चालू होता. तत्काळ डॉक्टर आले. विवेकानंद मिटल्या डोळ्यांनी सर्वांची लगबग पाहत होते. अधरावर हसू होतं. ते मनोमन म्हणत होते. "आता मी निघालोय दूरस्थ देशाला, आता नाही परतणार या जन्मात. ते बघा, प्रत्यक्ष शिवशंकर आलेत माझ्याजवळ. त्यांनी मला दोन हातावर सहज उचललं आहे. गड्यांनो, एकच विवेकानंद जातोय. आता सहस्त्र सहस्त्र विवेकानंद तयार होणार आहेत. रडू नका. सारे शुभमंगल होणार आहे."

उशीवरून विवेकानंदांची मान कलंडली. डॉक्टरांनी आपले हात मागे घेतले, क्षणभर निःशब्द शांतता निर्माण झाली. दुसऱ्या क्षणी साऱ्यांना त्यांचा वियोग अनावर झाला होता. रात्र चढता चढता काही काळ थबकली होती.

बेलूर येथे अत्यंविधी

५ जुलै १९०२ ला त्यांचा पार्थिव देह बेलूर मठाच्या आग्नेय टोकाला गंगाकिनारी त्यांनी दाखवलेल्या रम्य वृक्षराशींमध्ये मिरवणुकीने आणण्यात आला. चंदनाप्रमाणे भारतीयांसाठी झिजलेल्या स्वामी विवेकानंदांना चंदनाच्या चितेवर अग्नी देण्यात आला. पुत्रवियोगाने दुःखी झालेली भुवनेश्वरी त्या चितेजवळ प्रार्थना करत होती.

शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या 'युगप्रवर्तक विवेकानंद' या ग्रंथातून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news