श्रावण महिना म्हटलं की, निसर्ग अगदी आपल्याला भरभरून देत आहे असंच वाटत असतं आणि ते अगदी खरं आहे. निसर्गाला आणि मानवाला वरदान असलेल्या या महिन्यात धार्मिक सणवारांत आपला वेळ कसा जातो हे आपल्याला कळतच नाही. विविध सणावारांचा महिना म्हणून या श्रावण महिन्याकडे आपण पाहतो. दिव्याच्या अमावस्येपासून ते पोळ्यापर्यंत (अमावास्या) आपण सणावारांमध्ये गुंतलेलो असतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये होणारी धुपारती ही अंगावर रोमांच उभे करते. कापराच्या वासात सारा आसमंत एक तेज समान भासू लागतो. तर दुसरीकडे निसर्गामध्ये होणारे बदल अगदी झाडांपासून ते प्रत्येक जीवमात्रांपर्यंत सर्वांना खुणावतात. म्हणूनच श्रावण म्हणजे जणू आनंदाचा धबधबा होय. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. (Shravan month's all festivals & vrat)
समुद्र मंथनात तयार झालेले 'हलाहल' भगवान महादेवाने प्राशन केले तो हा सोमवार. सोमवारी शंकराची पूजा करतात. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. नवविवाहीत महिलांनी पाच वर्षापर्यंत हे व्रत करण्याची परंपरा आहे. अशाच प्रकारे परंपरेने केल्या जाणाऱ्या फासकी व्रतात पसाभर तांदूळ शंकराची पिंड आणि नंदीला वाहतात.
महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. विशेषत: नवविवाहितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष आणि नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदकुंकू, ओटी भरणं, रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ या निमित्ताने माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम अनुभवायला मिळतं.
शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पूजा करतात. त्याला इजा होऊ नये म्हणून या दिवशी जमीन खणत नाही किंवा नांगर चालविला जात नाही. वारुळाला जावून नागाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. महिला या दिवसाला 'झोकापंचमी' म्हणूनही संबोधतात.
नागपूजनाच्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृतीसाठी चांगले असते आणि ते झाल्यानंतर झिम्मा, फुगडी आणि वडाच्या पारंब्यावरचे झोके. हा सण शेतीप्रधान संस्कृतीचे द्योतक असल्याने नागाचे महत्व लक्षात घेऊन अंधश्रद्धांना बळी न पडता या सणाची खरी पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच बदलत्या परिस्थितीत नागपंचमीचे व्रत करतांना नागाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.
श्रावण महिन्यात १५ ऑगस्टला पुत्रदा एकादशीची तिथी येते. एकादशी १५ ऑगस्टला १० वाजून २६ मिनिटांनी सुरुवात आणि १६ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी संपणार आहे. जर उदय तिथी विचारात घेतली तर पुत्रदा एकादशी १६ ऑगस्टला असेल.
शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'नारळी पौर्णिमा' म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण. ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा 'समिंदराला' या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मासेमासाठी होडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.
महिलांसाठी या दिवसाचे खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. या सणाच्या निमित्ताने सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसेच अनाथालयातील मुले, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न होतात.
शिळसप्तमीची अग्नीदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपाने पुजा झाली की 'गोविंदा आला रे आला..' चा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. महिला मंडळांचे गोविंदा पथकही महानगरात मनोरे रचून दहीहंडी फोडतांना दिसतात. काळानुसार उत्सवाचे स्वरूप व्यापक होताना दिसत आहेत.
श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावस्या. आईच्या हाताचं वाण घेतांना लहानपणी मजा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या 'जिवा-शिवाच्या' बैलजोडीला विश्रांती देण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. खान्देशात पुरणपोळीऐवजी खापरावरचे मांडे करण्याची पद्धत आहे. ताज्या दुधाबरोबर मांड्यांची चव काही वेगळीच असते.
माहेरवाशीण मंगळागौर आटोपून सासरी परतते आणि गौरी गणपतीच्या तयारीला लागते. नव्या उत्सवाचे नवे रंग, आनंद देणं आणि घेणं हे आपल्या संस्कृतीचे मूळ श्रावण महिना अधोरेखित करतो. माणसांना एका सूत्रात बांधण्यासाठीचे वेगवेगळे सण आणि उत्सव असतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.