Putrada Ekadashi
मुंबई : या वर्षातील शेवटची पुत्रदा स्मार्त एकादशी ३० डिसेंबर २०२५ रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास केल्याने आणि विधीवत पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जात. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. एकदा श्रावण महिन्यात आणि दुसऱ्यांदा पौष महिन्यात. हिंदू कॅलेंडरनुसार पौष हा दहावा महिना असतो, जो डिसेंबर-जानेवारी दरम्यान येतो.
पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतानाशी संबंधित समस्या दूर होतात आणि मुलांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेनुसार, अशी मान्यता आहे की, अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या दांपत्यांना या व्रतामुळे सुदृढ आणि बुद्धिमान संतान प्राप्त होते. पूजेसोबतच भगवान विष्णूंना काही विशेष गोष्टी अर्पण केल्यास सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा कायम राहते.
तुळस: भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये, ती एक दिवस आधीच तोडून ठेवावी. तसेच एकादशीला तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि पाणीही घालू नये, असे सांगितलं जातं.
केळी: पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना केळी अर्पण करा. यामुळे भगवान प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
पंचामृत: दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्यापासून बनवलेले पंचामृत अर्पण करा. यामध्ये तुळशीची पाने नक्की टाकावीत.
फळे: भगवान विष्णूंना ऋतुमानानुसार मिळणारी फळे अर्पण करा. यासोबतच डाळिंब, सफरचंद यांसारखी फळेही अर्पण करता येतात.
पिवळी फुले: पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी पिवळी फुले आणि हार अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.