ज्योतिष आणि धार्मिक

Mahashivratri 2026 | घृष्णेश्वर दर्शन : ज्याच्या चरणी लीन झाल्याशिवाय १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा मानली जाते अपूर्ण!

Mahashivratri 2026 Grishneshwar Temple | घृष्णेश्वर मंदिर, जिथे कला आणि अध्यात्म यांचा अपूर्व संगम

पुढारी वृत्तसेवा

Mahashivratri 2026 Grishneshwar Temple |

छत्रपती संभाजीनगर : ज्यांच्या दर्शनाशिवाय ही ज्योतिर्लिंग यात्रा अपूर्ण राहते आणि दर्शनमात्रे या सर्व यात्रेचे फळ ज्यांच्या दर्शनाने मिळते, असे भगवान घृष्णेश्वर श्री क्षेत्र वेरूळ येथे निवास करतात. एल नावाच्या राजाची नगरी म्हणून व एलगंगा नावाच्या नदीकाठी वसलेले पुरातन नगर आज वेरूळ नावाने प्रसिद्ध आहे. पुराणकथा, स्थानिक विविध पोथी, लोककथा, महानुभाव साहित्य यातून वेरुळच्या विविध कथा आख्यायिका समोर येतात. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने घृष्णेश्वर भगवान यांची कथा व महती जाणून घेऊया...

वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. संभाजीनगर मार्गे जाताना रस्त्यावर दौलताबाद देवगिरी किल्ला व श्री भद्रा मारुती दर्शन घडते.छत्रपती संभाजीनगरवरून दर तासाला महानगरपालिकेच्या शहरबस उपलब्ध असतात.

श्री आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात 'घ्रुश्नेशंच शिवालये' असा उल्‍लेख

वेरूळ महात्म्य अर्थात ब्रम्हसरोवर नामक ग्रंथात विविध युगात असलेल्या वेरुळच्या पुरातन नामांविषयी उल्लेख आहे. कृतयुगात शिवालय, त्रेतायुगात शिवस्थान, द्वापारयुगात एलापूर आणि कलियुगात नागस्थान अशी नावे असल्याचे समजते. नागस्थान म्हणजे वारूळ व वारूळ या शब्दाचा अपभ्रंश वेरूळ असा झाला असावा, असे अभ्यासक मानतात. श्री आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात 'घ्रुश्नेशंच शिवालये' असा उल्लेख येतो. वेरूळ येथे असलेल्या ३४ लेण्या त्यात राष्ट्रकुट राजांच्या लेखात असलेला एलापूर नामक उल्लेख हा वेरूळचाच आहे, असे भांडारकर यांनी सिद्ध केले आहे. महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने वेरूळ भूमी पवित्र झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांचे पाटीलकीचे व वास्तव्याचे स्थान वेरूळ राहिलेले आहे.

पूर्वाभिमुख शिवपिंड

मंदिराचे बांधकाम १५ व्या शतकात मालोजीराजे भोसले यांनी केल्याचे पुरावे आहेत त्यासंबंधीचा शिलालेख आजही मंदिराच्या भिंतीवर आहे. यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचे भव्य काम १७ व्या शतकात केले जे आज आपल्यासमोर आहे. मंदिर लाल अग्निज खडकात असून मंदिराचा अर्धा वरील भाग हा चुना व तत्सम पदार्थ वापरून उभारला आहे. आतील खांबांवर सुंदर नक्षीकाम असून गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील रुद्राक्षाची माला खरी वाटावी इतकी सुंदर आहे. मंदिरात गणपती, अंबिका यांच्या मूर्ती आहेत. भव्‍य मंदिरातील शिवपिंड ही पूर्वाभिमुख आहे आणि जुने मुख्यद्वार दक्षिणाभिमुख आहे. महाशिवरात्र उत्सव, श्रावण सोमवार व विविध मुहूर्तावर घ्रुष्णेश्वराची अलंकार पूजा बांधली जाते. सकाळी ५ दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता आरती पारंपरिक वाद्यांसह केली जाते. अधिक मासात ७०० ब्राह्मणांच्या सहाय्याने अतिरुद पूजा ५ दिवस अखंड चालते. वर्षभर मंदिरात गर्दी असते. सुनियोजित रांगांमुळे दर्शन सुलभ होते.

शिवालय तीर्थ प्रसिद्ध कुंड

मंदिरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर वेरूळ येथे शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे तीर्थकुंड एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण ५६ दगडी पायऱ्या आहेत. या शिवालय कुंडात महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत, असे सांगितले जाते. यात उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल नैऋत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी आहेत. महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT