

Parli Vaijnath Mahashivratri Yatra
परळी वैजनाथ : महाशिवरात्र यात्रा महोत्सव उत्साहात व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कामाला लागावे असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी परळीत घेतलेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत दिले. प्रशासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महाशिवरात्र यात्रा भरते. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. पाच दिवस ही यात्रा भरते. या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक परळीत दाखल होतात. या महाशिवरात्र यात्रेची पूर्वतयारी प्रशासन व वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
या निमित्ताने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी परळीत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यानिमित्ताने वैद्यनाथ मंदिर येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाने सर्व तयारी करावी, कायदा व सुव्यवस्था, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना, आरोग्य सुविधा, स्वच्छता, यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेली पूर्वतयारी बाबत आढावा घेऊन यात्राकाळात आवश्यक तयारीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अंबाजोगाई उपविभाग अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके, परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक, संभाजीनगर पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस निरीक्षक, नगरपरिषद मुख्याधिकारी, महावितरण उपकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग आदींसह प्रशासकीय विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. देवल कमिटीच्या वतीने प्रशासनाकडून आवश्यक बाबी या बैठकीत मांडण्यात आल्या. यात्रा महोत्सव उत्साहात व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कामाला लागावे व शांततेत यात्रा महोत्सव पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.