Global Commodity Prices Rise pudhari photo
अर्थभान

Global Commodity Prices Rise : विविध वस्तूंच्या किमती भडकणार!

जागतिक बँकेचा इशारा : कच्च्या तेलाची भाववाढ, एल निनोमुळे भाववाढीचे संकट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे चार वर्षांच्या उच्चांकावर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती, एल-निनोमुळे पर्जन्यात झालेली घट यामुळे जागतिक बाजारात विविध वस्तूंच्या किमतीत २०२६मध्ये २३ टक्क्यांनी वाढ होईल. त्याचबरोबर अन्नसुरक्षेचा धोकाही असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.

कमोडिटी मार्केट्स आऊटलूकमध्ये जागतिक बँकेने सद्यःस्थितीवर भाष्य केले आहे. तेल पुरवठा घटल्याने जग आता कच्च्या तेलाच्या बाबतीत अधिक असुरक्षित झाले आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. विविध वस्तूंच्या किमतीवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.

इंधन महाग झाल्याने आणि व्यापार विस्कळीत झाल्याने वस्तूंच्या किमती वाढण्यास मदत झाली आहे. महागाई, अन्नसुरक्षा आणि आर्थिक सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे जागतिक बँकेचे उपमुख्य अर्थशास्त्रज्ञ अयहान कोसे म्हणाले.

इंधन दराचा भडका...

कच्च्या तेलाच्या भावात २०२६मध्ये तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर २०२६मध्ये सरासरी ९१ डॉलर्स प्रतिबॅरवर गेला आहे. कॅलेंडरवर्ष २०२५मध्ये हा दर ६९ डॉलर्स प्रतिबॅरल होता.

जागतिक तेल पुरवठ्यात २०२६मध्ये ५.२ टक्क्यांची घट झाली असून, मागणीही अडीच टक्क्यांनी घटली आहे. तेलपुरवठ्यात २०२० नंतरची सर्वात मोठी घट झाली आहे. तर, कॅलेंडरवर्ष २०२७मध्ये दर ७९ डॉलर्स प्रतिबॅरलवर येतील असा अंदाज जागतिक बँकेने गुरूवारी वर्तविला आहे.

धातूंच्या किमतीत उच्चांकी वाढ

विविध धातूंच्या किमतीमध्ये २०२६मध्ये २५ टक्क्यांनी वाढ होईल. ॲल्युमिनियम, तांब्याच्या किमतीत मोठी वाढ होईल. जगभरातून अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटरसाठी या धातूंची मागणी वाढल्याने पुरवठा विस्कळीत होऊन भाववाढ झाली आहे. पुढील वर्षी धातूंच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट होण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तवली आहे.

अन्नधान्य-खते महागणार...

एल-निनो, महागडे इंधन आणि वाढलेल्या खतांच्या किमती यामुळे २०२६मध्ये अन्नदान्याच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ होईल. तर, २०२७मध्ये धान्याच्या किमतीत सात टक्क्यांनी वाढ होईल. खतांच्या किमतीत २०२६मध्ये १४ टक्क्यांची वाढ होईल. मात्र, पुढीलवर्षी खतांच्या किमती २०२५च्या पातळीवर येतील असा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT