Why Your Credit Score Is Not Improving
क्रेडिट स्कोअर का सुधारत नाही? Pudhari News Network
अर्थभान

क्रेडिट स्कोअर का सुधारत नाही?

पुढारी वृत्तसेवा
सत्यजित दुर्वेकर

कर्जाचे हप्ते वेळेवर भरूनही, एकदाही हप्ता न चुकवूनही, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळच्या वेळी भरूनही अनेकदा क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा होत नाही. यामुळे प्रश्न पडतो की, जबाबदार आर्थिक वर्तनाचा क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम का दिसत नाही? सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीला कर्ज देताना बँका सर्वांत आधी त्याची कर्जाची पात्रता किती आहे, हे तपासतात आणि त्यासाठी प्रामुख्याने क्रेडिट स्कोअर हा आधार मानला जातो. त्याआधारे किती कर्ज मिळेल किंवा ते मिळणार की नाही, हे ठरवले जाते. क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला असणे हे आपले घर-गाडी चांगल्या स्थितीत राखण्याइतकेच महत्त्वाचे ठरत आहे.

कर्ज आणि सर्व बिले वेळेवर भरूनही क्रेडिट स्कोअर सुधारत नाही, याची अनेक कारणे असू शकतात.

हाय क्रेडिट युटिलायझेशन : उपलब्ध क्रेडिट मर्यादेने एकूण कर्जाच्या रकमेला भागून याची गणना केली जाते. उदाहरणार्थ, तुमची मर्यादा 10,000 रुपये असेल आणि तुम्ही 8000 रुपये वापरले असतील, तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो 80 टक्के आहे. चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी तज्ञांनी हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याची शिफारस केली आहे. जास्त युटिलायझेशन रेशो तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करू शकतो.

सतत कर्जासाठी अर्ज : कमी कालावधीत खूप जास्त क्रेडिट कार्डचा वापर केला असेल किंवा त्यासाठी अर्ज केला असेल किंवा सतत कर्जासाठी अर्ज केला असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा कर्जदाता तुमच्या आर्थिक व्यवहारांची छाननी करतो. यामुळे क्रेडिट स्कोअर काही गुणांनी कमी होऊ शकतो.

भागीदारीत कर्ज घेणे : एखाद्यासोबत संयुक्तपणे कर्ज घेतले असेल आणि त्याचे हप्ते थकले असतील, तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो कारण जर एक भागीदार कर्जाची परतफेड करू शकत नसेल, तर त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आपोआप दुसर्‍यावर येते. अशा परिस्थितीत तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.

क्रेडिट स्कोअर गणना करताना खालील गोष्टी पाहिल्या जातात.

पेमेंट हिस्ट्री : क्रेडिट कार्ड, कर्ज आणि बिले वेळेवर भरणे ट्रॅक केले जाते. यामध्ये आपण जर विविध प्रकारची देयके उशिरा अदा केली असतील किंवा चुकवली असतील, तर क्रेडिट स्कोअर कमी होतो.

युटिलायझेशन रेशो : चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी युटिलायझेशन रेशो 30 टक्क्यांच्या खाली ठेवणे महत्त्वाचे आहे.

क्रेडिट हिस्ट्री : क्रेडिट स्कोअरसाठी तुमचे क्रेडिट खाते किती जुने आहे, हेदेखील पाहिले जाते. दीर्घ क्रेडिट हिस्ट्रीमुळे क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक प्रभाव पडतो.

क्रेडिट मिक्स : जेव्हा क्रेडिट स्कोअर किंवा कर्ज पात्रतेचा प्रश्न येतो, तेव्हा बँका क्रेडिट मिक्स म्हणजेच क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा गहाण याची तपासणी करतात. वैविध्यपूर्ण क्रेडिट मिश्रण तुमचा स्कोअर सुधारण्यास मदत करते.

नवीन क्रेडिट चौकशी : जेव्हा तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा कर्ज देणार्‍या बँका किंवा एजन्सी तुमच्याबद्दल अधिक सखोल चौकशी करतात. असे पुन्हा पुन्हा होत असल्यास, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर तात्पुरता नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

क्रेडिट अहवालातील त्रुटी

तुमच्या क्रेडिट अहवालाचे पुनरावलोकन करताना, त्यात फक्त तुमच्याशी संबंधित गोष्टी आहेत याची खात्री करा. त्यामध्ये दिलेली सर्व माहिती आणि तपशील पूर्णपणे बरोबर आणि पूर्ण आहेत, याची खात्री करा. ग्राहकांनी त्यांचे क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे. त्यात काही चूक आढळल्यास लगेच दुरुस्त करा. याकडे दुर्लक्ष केल्यास क्रेडिट स्कोअरला नक्कीच धक्का बसेल.

SCROLL FOR NEXT