सिबिल स्कोअर खराब असल्यास काय करावे?

जगदीश काळे

आपला क्रेडिट स्कोअर (सिबिल स्कोअर) खराब असेल तरीही आपल्याला सहजपणे गृहकर्ज घेता येऊ शकते. मात्र यासाठी काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. यानंतर गृहकर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही. आपण जेव्हा गृहकर्जासाठी बँकेत जातो तेव्हा क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसल्याने बँकेकडून कर्ज देण्यास मनाई केली जाते. याशिवाय क्रेडिट स्कोअर खराब असल्याने गरजेनुसार कर्ज मिळण्यास अडचणी येतात. आपल्या मागणीच्या कर्जाच्या तुलनेत 80 ते 70 टक्के कर्ज मंजूर होते. त्यामुळे आपण काही गोष्टींचे पथ्य पाळल्यास किंवा अनुकरण केल्यास सहजपणे गृहकर्ज मिळवू शकतो. 

को-अ‍ॅप्लिकंट जोडा

को-अ‍ॅल्पिकंट असल्याने कर्ज देणार्‍या बँकेची जोखीम कमी होते. ही व्यक्ती स्थायी रूपाने उत्पन्न मिळवणारी आणि क्रेडिट स्कोअर चांगली राखणारी असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता बळावते. जोपर्यंत आपण को अ‍ॅल्पिकंटला सोबत घेत नाहीत, तोपर्यंत कर्जाची रक्कम वाढणार नाही आणि मंजुरीची शक्यताही निर्माण होणार नाही. को-अ‍ॅल्पिकंट असल्याने कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक राहते. 

कमी रकमेसाठी अर्ज करा

कम लोन टू व्हॅल्यू (एलटीव्ही) रेशो हा कर्ज मिळवण्यासाठी सोयीचे ठरू शकते. याचाच अर्थ असा, घर खरेदी करताना वैयक्तिक योगदान वाढवणे गरजेचे आहे. कमी एलटीव्ही रेशोची निवड केल्याने मालमत्तेत खरेदीतील योगदान वाढते. त्यामुळे बँकेची जोखीम कमी राहते. त्याचवेळी कमी हप्त्यामुळे कर्ज आटोक्यात राहते. यामुळे कर्ज मिळण्याची संधी राहते. 

फिक्स ऑब्लिगेशन टू इन्कमचा रेशो

जेव्हा आपण गृहकर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँक फिक्स ऑब्लिकेशन टू इन्कम रेशोदेखील तपासते. यावरून दर महिन्याला आपण कितीपर्यंत हप्ता भरू शकतो, याचे आकलन करण्यात येते. आपल्यावर एखादा हप्ता सुरू आहे काय? घरभाडे, विमा पॉलिसी किंवा अन्य खर्च हे सध्याच्या उत्पन्नाच्या किती प्रमाणात आहे, हे जाणून घेतले जाते. जर आपला सर्व खर्च  वेतनाच्या 50 टक्क्यांपयर्र्ंत असेल तर कर्ज नामंजूर होऊ शकते. त्यामुळे कर्जाची रक्कम ही त्यापेक्षा अधिक असू नये. 

सुरक्षित कर्ज घ्या

जे कर्ज एखाद्या मालमत्तेच्या हमीवर घेतले जाते, त्यास सिक्यूअर्ड लोन असे म्हणतात. कोणताही व्यक्ती मालमत्ता, सोने, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर, म्युच्युअल फंड किंवा पीपीएफसारख्या मालमत्तेवर देखील कर्ज घेऊ शकतो. असुरक्षित कर्जाच्या तुलनेत सुरक्षित कर्जाचे नियम हे काही प्रमाणात लवचिक असतात. 

संबंधित बँकेत कर्जासाठी अर्ज करा

आपले नियमित उत्पन्न नसेल आणि क्रेडिट स्कोअर खराब असेल, तर आपण विद्यमान खाते असलेल्या बँकेतच कर्जासाठी अर्ज करायला हवा. ज्या बँकेत मुदत ठेवी, लॉकर आहे, अशा बँकेतून कर्ज मिळण्याची शक्यता अधिक राहते. 

एनबीएफसीमध्ये देखील अर्ज करा

आपल्याला नियमित बँकेतून कर्ज मिळण्यास अडचणी येत असतील, तर एनबीएफसीमध्ये कर्जासाठी अर्ज करणे हिताचे ठरू शकते. एनबीएफसीकडून कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्ज दिले जाते. अर्थात एनबीएफसीकडून आकारले जाणारे व्याज हे अन्य बँकांच्या तुलनेत अधिक असते, हे लक्षात घेतले पाहिजे. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news