HDFC Bank Chairman Resignation Pudhari
अर्थभान

HDFC Bank: HDFC बँकेत चाललंय काय? चेअरमन अतनू चक्रवर्तींचा अचानक राजीनामा; शेअर्समध्ये मोठी घसरण

HDFC Bank Chairman Resignation: HDFC बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांनी नैतिक मतभेदांमुळे अचानक राजीनामा दिला. बँकेने कोणतीही गंभीर समस्या नसल्याचं सांगत गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे.

Rahul Shelke

HDFC Bank Chairman Resignation Atanu Chakraborty: भारताच्या सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेत अचानक घडलेल्या एका घडामोडीमुळे गुंतवणूकदार आणि शेअर बाजार दोन्ही हादरले आहेत. बँकेचे पार्ट-टाईम चेअरमन आणि स्वतंत्र संचालक अतनू चक्रवर्ती यांनी तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या राजीनाम्यामागे ‘नैतिक मूल्यांचा अभाव’ हे कारण दिल्यामुळे या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय आहे प्रकरण?

अतनू चक्रवर्ती यांनी बँकेच्या गव्हर्नन्स आणि रेम्युनरेशन कमिटीच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं की, गेल्या दोन वर्षांत बँकेतील काही घडामोडी आणि कामाच्या पद्धती त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी जुळत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी हेही सांगितलं की, याशिवाय इतर कोणतंही ठोस कारण त्यांच्या राजीनाम्यामागे नाही.

अतनू चक्रवर्ती कोण?

अतनू चक्रवर्ती हे माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी एप्रिल 2021 पासून HDFC बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात HDFC बँक आणि HDFC लिमिटेड यांचं ऐतिहासिक विलीनीकरण (Merger) पूर्ण झालं, ज्यामुळे HDFC बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनली. मात्र, या विलीनीकरणाचे पूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाहीत, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं.

राजीनाम्यामागचं खरं कारण काय?

चक्रवर्ती यांनी कोणतीही विशिष्ट घटना सांगितली नाही, मात्र त्यांनी “माझी विचारसरणी आणि संस्थेच्या कार्यपद्धतीत तफावत होती” असं सांगितलं. NDTV Profit शी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी कोणत्याही गैरप्रकाराचा आरोप करत नाही, पण माझ्या विचारधारेत आणि संस्थेच्या कामात तफावत निर्माण झाली आहे.” तज्ज्ञांच्या मते, बोर्डाच्या कामकाजावर काही काळापासून मतभेद असल्याच्या चर्चा होत्या, मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

कंपनीने काय स्पष्टीकरण दिलं?

या घडामोडीनंतर बँकेने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. HDFC बँकेचे नवे अंतरिम चेअरमन केकी मिस्त्री यांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त करत सांगितलं की, बँकेत कोणतीही मोठी समस्या नाही आणि सर्व काही सुरळीत सुरू आहे.

“बोर्ड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असं त्यांनी म्हटलं. तसेच बँकेच्या सीईओनेही स्पष्ट केलं की, बँकेच्या कामकाजात सातत्य राहील आणि ग्राहकांचा विश्वास कायम राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केकी मिस्त्री यांची तीन महिन्यांसाठी अंतरिम चेअरमन म्हणून नियुक्ती मंजूर केली आहे.

पुढे काय होणार?

सध्या केकी मिस्त्री हे तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी सांभाळत आहेत. पुढील काही महिन्यांत बँक कायमस्वरूपी चेअरमनची नियुक्ती करेल. या काळात बँकेच्या गव्हर्नन्स, निर्णयप्रक्रिया आणि विलीनीकरणानंतरच्या रणनीतीवर अधिक लक्ष दिलं जाईल.

शेअर बाजारावर काय परिणाम झाला?

या अचानक घडलेल्या घडामोडीचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकन बाजारात लिस्टेड HDFC बँकेचे ADR शेअर्स सुमारे 7.5 ते 8 टक्क्यांनी घसरले. भारतातही या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली.

याशिवाय, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, अमेरिका-इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री यामुळे बाजारावर आधीच दबाव होता. त्यात या राजीनाम्याने आणखी नकारात्मक भावना निर्माण केली.

अतनू चक्रवर्ती यांचा राजीनामा हा बँकेच्या अंतर्गत कामकाजाबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. बँकेने जरी सर्व काही सुरळीत असल्याचं सांगितलं असलं तरी गुंतवणूकदार आणि बाजार याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही आठवडे HDFC बँकेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT