

Stock Market Live Updates: आज (19 मार्च) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. जागतिक बाजारातील घसरण, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन फेडच्या धोरणात्मक संकेतांमुळे बाजारावर दबाव दिसून आला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स तब्बल 1,953 अंकांनी घसरत 74,750 च्या आसपास उघडला, तर निफ्टी 50 निर्देशांकही 580 अंकांनी खाली येत 23,200 च्या खाली गेला. बाजार उघडताच मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. विशेषतः HDFC बँकेचा शेअर जवळपास 8 टक्क्यांनी घसरला.
जागतिक पातळीवरही परिस्थिती फारशी सकारात्मक नव्हती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले असले तरी वाढत्या ऊर्जा किमतीमुळे महागाई वाढू शकते, असा इशारा दिला. यामुळे अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली आणि त्याचा परिणाम आशियाई तसेच भारतीय बाजारावरही झाला.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर 3.7 टक्क्यांनी वाढून 111 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला, तर WTI क्रूडही जवळपास 100 डॉलरच्या आसपास पोहोचले. ऊर्जा क्षेत्रातील या वाढीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि गुंतवणूकदारांवर झाला आहे.
इंडिगो आणि अदानी पोर्ट्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही सुमारे 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. एकूणच, जागतिक अनिश्चितता, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाईच्या भीतीमुळे बाजारावर दबाव कायम आहे.
या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पुढील काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि आर्थिक संकेतांवर बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
इराणच्या प्रमुख गॅस क्षेत्रांवर आणि तेल प्रकल्पांवर झालेल्या हवाई हल्ल्याच्या बातमीने परिस्थिती आणखी चिघळली आहे. या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री, इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
प्रत्युत्तर म्हणून, इराणने कतारच्या गॅस प्रकल्पांवर क्षेपणास्त्रे डागली. तसेच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील तेल प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. यामुळे पश्चिम आशियामध्ये अस्थिरता आणखी वाढण्याचा धोका आहे.