सिया मारणे
गेल्या काही वर्षात भारतात एक नवीन फॅशन ब्रँड वेगाने वाढत आहे तो म्हणजे झुडिओ. स्वस्त कपडे मिळत असल्यामुळे या ब्रँडने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. अलीकडच्या काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ब्रँडचा विस्तार होताना दिसत आहे. मात्र किती लोकांना या ब्रँडच्या मॉडेल बद्दल आणि बिझनेसबद्दल माहिती आहे?
झुडिओ चा मालक कोण?
झुडिओ हा टाटा ग्रुप अंतर्गत ट्रेंट लिमिटेड कंपनीचा फॅशन ब्रँड आहे. जो सध्या अत्यंत लोकप्रिय आहे. खासकरून जेन झीमध्ये. त्याचं मुख्य कारण म्हणजे झुडिओ कमी दरात फॅशनेबल आणि ट्रेंडी कपडे बाजारात विकते. कमी किंमत असणारे पण स्टयलिश आणि तरुण पीढीला आवडतील अशा दर्जाच्या कपड्यांची ते विक्री करतात.
झुडिओ ची सुरुवात कशी झाली?
इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार सुरुवातीला ट्रेंट लिमिटेडने स्टार स्टोअर्स मध्ये झुडिओची सुरूवात केली. त्या नंतर बेंगलूरूच्या एका कमर्शिअल स्ट्रीट वर ट्रेंट कंपनीने झुडिओचे पहिले स्वतंत्र स्टोअर उघडले.
झुडिओचा मुख्य उद्देश हा भारतीय ग्राहकाला कमीत कमी किंमतीत स्टायलिश आणि ट्रेंडी कपडे देण्याचा आहे. तरुण पीढी झुडिओकडे या गोष्टीमुळे आकर्षित होत आहे. कमी किंमतीत स्टायलिश राहता येणं हे झुडिओमुळे सहज शक्य असल्याने जेन झी / तरुण पीढी झुडिओमध्ये खरेदी करायला प्राधान्य देते.
झुडिओ सातत्याने नवीन ट्रेंडनुसार कपड्यांचे स्टाईल आणि डिजाइन तयार करून बाजारात आणते. त्यांच्या ह्याच फास्ट फॅशन मॉडेलमुळे ग्राहक आकर्षित होऊन झुडिओतून कपडे खरेदी करतात.
व्यवसाय मॉडेल आणि कार्यपद्धती
झुडिओ चे मख्य तत्त्व हे कमी किंमतीत ट्रेंडी डिजाइन देणे आहे आणि हीच त्याची ओळख आहे. झुडिओ व्हॅल्यू फॅशन या संकल्पनेवर काम करते. झुडिओच्या कपड्यांच्या किंमती साधारण 199-999 पर्यंत असतात. कमी किंमतीत सुद्धा चांगली गुणवत्ता आणि स्टायलीश कपडे असल्याने ते भारतीय ग्राहकांना आकर्षित करतात. याच त्यांच्या मॉडेलमुळे सामान्य वर्ग आणि तरुण पिढी झुडिओमधून कपडे खरेदी करते.
झुडिओचे स्टोअर्स डिजाइन हे साधे पण आकर्षित आहे. स्टोअर्समध्ये अत्यंत महागडे आणि लक्झरी इंटेरिअर डिजाइन नाही. साधी रचना आणि नीटनेटकी मांडणी आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना जास्त त्रास होत नाही. झुडिओ मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगसाठी जाहिरातींवर खर्च करत नाही. मुख्यत: लोकेशन आधारित स्टोअर्स आणि लोकांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे त्याचे मार्केटिंग होते. ते स्वत:च्या ब्रँडचे कपडे विकतात. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा प्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण असते व खर्च कमी येतो. या सर्व घटकांमुळे त्यांचे लो-कॉस्ट बिझनेस मॉडेल यशस्वी झाले आहे.
झुडिओचे कलेक्शन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. ट्रेंडनुसार फॅशन कलेक्शन ते लाँच करत असतात. कारण त्यांचे कलेक्शन हे मर्यादित वेळेसाठीच असते आणि ते कलेक्शन रिपीट होण्याची शक्यता खूप कमी असते. ते नवीन- नवीन कलेक्शन सातत्याने बाजारात आणत असतात.
थिंक स्कूलच्या पॉडकास्टमध्ये टाटा ग्रुप मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झुडिओ ऑनलाइन नसण्यामागील कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, झुडिओचा मुख्य उद्देश हा ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत फॅशनेबल कपडे उपलब्ध करून देणे आहे. ई-कॉमर्स वर विक्री करताना पिकींग, पॅकिंग, शिपींग आणि रिटर्न यासारख्या प्रक्रियांमुळे कामकाजातील गुंतागुंत आणि अतिरिक्त खर्च वाढतो. कमी किमतीच्या उत्पादनांमध्ये हा अतिरिक्त खर्च समाविष्ट केल्यास, नफा कमी होतो किंवा ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारावे लागते. याचा परिणाम ‘व्हॅल्यू फॉर मनी’ या धोरणावर होऊ शकतो.
झुडिओने अतिशय जाणीवपूर्वक ऑफलाइन म्हणजेच फिजीकल स्टोअर आधारित मॉडेल उभारले आहे. या निर्णयामुळे व्यवसायाची रचना सोपी झाली, खर्च नियंत्रणात राहिला आणि ग्राहकांना प्रत्यक्षरित्या स्टोअर्समध्ये खरेदी करण्याचा अनुभव घेता येतो. त्यामुळे झुडिओचे ऑफलाइन केंद्रित धोरण त्यांच्या लो-कॉस्ट, आणि व्हॅल्यू ड्रिव्हन बिझनेस मॉडेलशी सुसंगीत आहे.
झुडिओच्या विस्ताराचा प्रवास
भारतभर झुडिओचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. सुरुवातीला फक्त मेट्रो सिटींमध्येच स्टोअर्स उपलब्ध होते. पण हळूहळू झुडिओने फक्त मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर मध्यम व लहान शहरांमध्ये ही स्टोअर्स सुरू केले आहेत. यामुळे अधिक ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कपडे मिळतात.
झुडिओच्या या जलद विस्तारामुळे भारतभर मोठ्या प्रमाणात त्यांचे नेटवर्क तयार झाले आहे. 2016 मध्ये फक्त एका स्वतंत्र स्टोअरने झुडिओची सुरुवात झाली होती.
ट्रेंट लिमिटेडच्या FY25 वार्षिक अहवालानुसार झुडिओचा विस्तार 235 शहरांमध्ये 765 स्टोअर्सपर्यंत झाला आहे. प्रत्येक स्टोअर चा आकार साधारण 7,000 ते 12,000 चौ. फुट आहे, त्यामुळे अनेक मायक्रो मार्केट्स सहजपणे विस्तारित करता येतात. FY25 मध्ये झुडिओने 244 नवीन स्टोअर्स सुरू केले.
ट्रेंट लिमिटेडच्या FY25 वार्षिक अहवालानुसार झुडिओ ने भारताबाहेरही विस्तार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करता दुबईमध्ये पहिले इंटरनॅशनल स्टोअर सुरू केले आहे.
झुडिओची उत्पादने नवीन फॅशन ट्रेंड सह अपडेट केली जातात. झुडिओ कपड्यांबरोबरच फुटवेअर, अंडरवेअर आणि ब्युटी प्रोडक्ट्समध्ये कमी किंमतीसह विविध उत्पादने उपलब्ध करून देत आहे.
मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च न करता, झुडिओ मायक्रो मार्केट्स स्टोअरमध्ये आपले मार्केटिंग करत आहे. स्टोअरमध्ये विक्री करण्याचा अनुभव ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
FY25 मध्ये झुडिओ ने 67 नवीन शहरांमध्ये आपले स्टोअर्स उघडले आहेत. आता झुडिओ 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 235 शहरांमध्ये आहे.
(स्रोत: ट्रेंट लिमिटेड, त्र्याहत्तरावा वार्षिक अहवाल FY 2024-25 PDF)
झुडिओच्या यशामागील कारणे
मध्यम आणि लहान शहरांवर भर
टाटा ब्रँडवरील विश्वास
लो-कॉस्ट स्ट्रक्चर
फिजीकल स्टोअर पद्धती
कमी किंवा परवडणाऱ्या किंमती
ट्रेंडी फॅशन
नवीन कलेक्शन
भारतातील व्हॅल्यू फॅशन आणि फास्ट फॅशन मार्केटमध्ये झुडिओने Yousta, Max, H&M, ZARA यांसारख्या ब्रँड्समध्ये स्पर्धा अधिक वाढवली आहे. Yousta आणि Max झुडिओ सारखेच कमी उत्पादनात चांगली फॅशन देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. यामुळे हे ब्रँड्स पुढील काळात झुडिओचे स्पर्धक बनू शकतात. तर H&M आणि ZARA ऑनलाइन खरेदी वर लक्ष केंद्रित करतात. झुडिओ ऑफलाइन खरेदीवर जास्त भर देत आहे. भविष्यात यामुळे बाजारपेठेत बदल होण्याची शक्यता आहे.
झुडिओ कमी दरात पुरुष, महिला, आणि लहान मुलांसाठी कपडे उपलब्ध करुन देत आहे आणि स्थानिक ग्राहकांवर फोकस करत आहे. झुडिआ फक्त कपडेच नव्हे तर फुटवेअर आणि स्वत:चे कॉस्मेटिक्सची पण विक्री करत आहे.
आधुनिक फॅशन आणि परवडणाऱ्या किंमती यावर लक्ष केंद्रीत करून झुडिओने भारतीय रिटेल बाजारात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि वाढत्या बाजारपेठेमुळे भविष्यात झुडिओचा आणखी मोठा विस्तार होण्याची शक्यता आहे. भविष्यात ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.