Agarwood Farming Pudhari
अर्थभान

Farmer Income: हे झाड शेतकऱ्यांचं नशीब बदलू शकतं; लाकडाला आहे सोन्यापेक्षाही जास्त किंमत, शेती करण्याची मोठी संधी

Agarwood Farming India: अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अगरवुड (अगर) शेतीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. लाकूड आणि त्यातून मिळणारे ऊद तेल आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याहूनही महाग विकले जाते.

Rahul Shelke

Agarwood Farming Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शेती आणि शेतकऱ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. शेती केवळ उदरनिर्वाहापुरती मर्यादित न राहता ती नफ्याची व्हावी, यासाठी सरकारने नवीन धोरण आणले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती, त्यास पूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. यासाठी कृषी क्षेत्रासाठी तब्बल 1 लाख 62 हजार 671 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ईशान्य भारतातील ‘अगरवुड’ म्हणजेच ‘अगर’ वृक्षाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय. हा असा वृक्ष आहे, ज्याच्या लाकडाची किंमत अनेकदा सोन्यापेक्षाही जास्त असते. योग्य प्रकारे लागवड आणि संवर्धन केल्यास हा वृक्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं चित्र बदलू शकतो.

अगरवुड हे कोणत्या प्रकारचं झाडं आहे?

अगरवुडला ‘ऊद’ या नावानेही ओळखलं जातं. हे गडद रंगाचे, वजनदार आणि अत्यंत सुगंधी लाकूड असते. ‘एक्विलेरिया’ या प्रजातीच्या झाडाला बुरशीचा संसर्ग किंवा जखम झाली की झाड स्वतःच्या संरक्षणासाठी एक विशिष्ट प्रकारचा राळयुक्त पदार्थ तयार करतं.

हाच पदार्थ कालांतराने अगरवुड म्हणून ओळखला जातो. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी ती वेळखाऊ असते आणि त्यामुळेच अगरवुड दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. या लाकडापासून ‘हायड्रो-डिस्टिलेशन’ या प्रक्रियेद्वारे ऊद तेल काढलं जातं. हे तेल अत्यंत सुगंधी असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे.

किती आहे अगरवुडची किंमत?

माहितीनुसार, उच्च दर्जाच्या अगरवुडच्या एका किलो लाकडाची किंमत 70 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. तर ऊद तेलाची किंमत आणखी जास्त आहे. या तेलाचा एक ग्रॅम सुमारे 8 ते 9 हजार रुपयांपर्यंत विकला जातो. दुर्मिळता, सुगंध आणि पारंपरिक वापर यामुळे या लाकडाला आणि तेलाला ‘द्रव सोनं’ असंही म्हटलं जातं.

भारतामधील अगरवुडची लागवड

भारतामध्ये अगरवुड नैसर्गिकरीत्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळतो. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय या भागांमध्ये हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतो. आसाममध्ये अगरच्या झाडाला ‘जासी’ किंवा ‘सांची’ असंही म्हटलं जातं.

अलीकडच्या काळात अगरची शास्त्रीय आणि नियोजित लागवड ईशान्य भारतापुरती मर्यादित न राहता देशाच्या इतर भागांतही सुरू झाली आहे. केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांमध्येही अगरच्या लागवडीचे प्रयोग होत आहेत. या भागांची माती आणि हवामान अगरच्या लागवडीसाठी अनुकूल मानले जाते.

अगरचा वृक्ष साधारणतः 20 ते 21 मीटर उंच वाढतो. त्याचा खोड सरळ असून सुमारे 1.5 ते 2.4 मीटरपर्यंत जाड असू शकतो. योग्य काळजी घेतल्यास हा वृक्ष दीर्घकाळ उत्पादन देऊ शकतो.

अगर तेलाचा वापर कशासाठी होतो?

अगरवुडपासून काढण्यात येणारं ऊद तेल प्रामुख्याने इत्र उद्योगात वापरलं जातं. हे तेल स्वतंत्रपणे वापरलं जातं, तसेच चंदन, कस्तुरी, केशर आणि अंबर यांसारख्या नैसर्गिक सुगंधी घटकांसोबत मिसळूनही इत्र तयार केलं जातं. ऊद तेल हे जगातील सर्वात जुने आणि सर्वात महाग सुगंधी द्रव्यांपैकी एक मानलं जातं.

भारत, चीन आणि अरब देशांमध्ये ऊद तेलाचा वापर केवळ सुगंधापुरता मर्यादित नाही. पारंपरिक औषधांमध्येही याचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे. त्यामुळे या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने मागणी वाढत आहे.

शेतकऱ्यांसाठी संधी

अगरवुडच्या लागवडीला प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. योग्य प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास अगरची शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरू शकते. केंद्र सरकारने या दिशेने उचललेलं पाऊल शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT