

मिरज : यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कराड- चिपळूण हातकणंगले- इचलकरंजी या नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची कोणती तरतूद केली याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसेच सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला फारसे काही मिळाले नसल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
कराड- चिपळूण या कोल्हापूर व कराड ही शहरे कोकणला जोडणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाचे पाच वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वेमार्गाला निधी मिळावा, अशी अपेक्षा होती. परंतु तो मिळाला नाही. यावर्षीही रेल्वे अंदाजपत्रकात या नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची प्रतीक्षाच आहे. हातकणंगले ते इचलकरंजी नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. यामुळे नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वे अंदाजपत्रकात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षीत आहेत. गेल्या वर्षभरात मिरज व कोल्हापूर स्थानकातून नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू झालेल्या नाहीत. प्रवासी संघटनांची मागणी आहे. पुणे ते मिरज दुहेरीकरण व विद्युतीकरण दुहेरीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र मिरज जंक्शन रेल्वेस्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतिक्षेत आहे.