अर्थभान

Warren Buffett 'बर्कशायर'च्या अध्यक्षपदावरून पायउतार; १.०३ ट्रिलियन डॉलर्सच्या उद्योगसमूहाचे नेतृत्व कोण करणार?

तब्‍बल ५६ वर्ष होते अध्‍यक्ष, आता संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहणार

पुढारी वृत्तसेवा

warren buffett step down berkshire hathaway : जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी 'बर्कशायर हॅथवे'च्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. ९६ वर्षीय बफे यांनी शुक्रवारी भागधारकांना लिहिलेल्या पत्राद्वारे ही घोषणा केली. त्यांनी सुमारे ५६ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७० मध्ये हे पद स्वीकारले होते. तथापि, अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही बफे कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणार आहेत. आता त्यांचे पुत्र, हॉवर्ड बफेट, अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील, तर ग्रेग एबेल हे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून कायम राहतील.

बफे राहणार कंपनीचे मानद अध्यक्ष

बर्कशायर हॅथवेही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिचे मुख्यालय अमेरिकेतील ओमाहा, नेब्रास्का येथे आहे. कंपनीने आज (दि.१८) स्‍पष्‍ट केले की, ९६ वर्षीय बफे हे मानद अध्यक्ष होतील. ते तात्काळ आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचे पुत्र हॉवर्ड यांच्‍याकडे बर्कशायर हॅथवेची संपूर्ण धुरा देण्‍यात आले असून ते अध्यक्ष बनतील. हॉवर्ड बफे १९९३ पासून बर्कशायर हॅथवेच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. "चेअरमन एमेरिटस म्हणून, वॉरन बफेट संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील. ते मौल्यवान मत व दृष्टिकोन कंपनीला देत राहतील," असेही बर्कशायर हॅथवेने निवेदनात नमूद केले आहे.

सुमारे १.०३ ट्रिलियन डॉलर्सचा समूह

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बफे यांनी बर्कशायर कंपनीलाला सुमारे १.०३ ट्रिलियन डॉलर्सच्या एका मोठ्या समूहात रुपांतरीत केले. यामध्‍ये गेको कार विमा, बीएनएसएफ रेल्वे, बर्कशायर हॅथवे एनर्जी, डेअरी क्वीन आईस्क्रीम, फ्रूट ऑफ द लूम अंतर्वस्त्रे आणि स्क्विशमॅलोज प्लश टॉईज यांसारख्या अनेक व्यवसायांचा समावेश आहे. बफे यांनी मे २०२५ मध्ये प्रथम पदावरुन पायउतार होणार असल्‍याचे संकेत दिले होते.

"काळाचा विजय नेहमीच होतो"

आपल्या पत्रात वॉरन बफे यांनी वय आणि काळाचा ओघ या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी नमूद केले की, "काळाचा विजय नेहमीच होतो" म्हणजेच कालांतराने प्रत्येकाला काळाच्या प्रवाहापुढे झुकावेच लागते. मला नेहमीच काळाची साथ लाभली. त्याने मला बर्कशायरला अशा टप्प्यावर पोहोचताना पाहण्याची संधी दिली आहे, जिथे मला कंपनीच्या भविष्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास वाटतो."

आता कंपनीचा धुरा पुत्र हॉवर्ड यांच्‍याकडे

कंपनीने शुक्रवारी जाहीर केले की, वॉरन बफे यांचे पुत्र हॉवर्ड हे बर्कशायर हॅथवेचे नवीन अध्यक्ष बनतील. ते १९९३ पासून बर्कशायर हॅथवेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी ॲग्रो टेक, आर्चर डॅनियल्स मिडलँड , कॉनॲग्रा फूड्स , द कोका-कोला कंपनी , कोका-कोला एंटरप्रायझेस (Coca-Cola Enterprises) आणि फर्स्ट टियर फायनान्शियल यांसारख्या अनेक सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून काम केले आहे.

जगातील दहावे सर्वात श्रीमंत अब्जाधीश

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, वॉरन बफेट हे जगातील १० वे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

१९६५ मध्ये घेतली होती कंपनीची सूत्रे हाती

वॉरन बफे यांनी १९६५ मध्ये बर्कशायर हॅथवे कंपनीची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी या कंपनीची ओळख इंग्लंडमधील एक संघर्ष करणारी कापड (टेक्सटाईल) कंपनी अशी होती. बफे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने हळूहळू आपल्या व्यवसायाच्‍या प्रारुपात बदल केला. यानंतर रेल्वे, युटिलिटीज (सार्वजनिक सेवा) व विमा अशा क्षेत्रांमध्ये विस्तार केला. आज, बर्कशायर हॅथवे ही सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य असलेली एक प्रचंड मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचा कापड निर्मितीचा व्यवसाय १९८५ मध्ये बंद करण्यात आला. सध्या, बर्कशायर हॅथवेच्या कमाईचा मोठा हिस्सा त्यांच्या विमा व्यवसायातून येतो; या व्यवसायात 'गायको' सारख्या प्रमुख ब्रँड्सचा समावेश आहे. तसेच, कंपनी इतर विविध कंपन्यांमध्येही गुंतवणूक करते.

कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ

'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये बर्कशायर कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी जाहीर केली आहे. कंपनीचा नियमित प नफा १६ टक्क्यांनी वाढून १२.९८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. ही उलाढाल आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे. गुंतवणुकीतील नफा-तोटा धरून कंपनीचा एकूण निव्वळ नफा दुप्पटीहून अधिक वाढून २५.६७ अब्ज डॉलर्स झाला आहे. या कामगिरीसोबतच, कंपनीने आपल्याकडील प्रचंड रोख रक्कम वापरण्यास सुरुवात केली असून, 'अल्फाबेट' सारख्या मोठ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवले आहेत. तसेच स्वतःचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणावर परत विकत घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT