

प्रा. डॉ. विजय ककडे
‘वॉरेन बफे’ हे गुंतवणूकदारांना आदर्शवत व आपल्या वेगळ्या गुंतवणूक सल्ल्याने परिचित असून, अलीकडेच त्यांनी आपल्या विवेचनातून गुंतवणुकीचे नवे प्रवाह स्पष्ट केले आहेत. त्यांनी केलेले विश्लेषण, व्यक्त केलेली दिशा यातून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा तर मिळतोच; पण त्याहीपेक्षा गुंतवणूक नेमकी कशी हवी व गुंतवणुकीत असणारा सुरक्षिततेचा भ्रम हा अत्यंत भयकारी असू शकतो, हे त्यांनी सोन्याच्या गुंतवणुकीबाबतच म्हटलेले असल्याने ‘सुवर्णप्रेमी’ गुंतवणूकदारांना धक्का दिला आहे.
अर्थक्षेत्रात कोणताही सल्ला अंतिम नसतो, हे अंतिम सत्य लक्षात ठेवूनच वॉरेनची अर्थगीता समजून घेतली पाहिजे. पण, हे करीत असताना त्यांनीच सांगितलेले सुवर्ण नियम पूर्णतः वापरले पाहिजेत. यातील पहिला महत्त्वाचा नियम पैसे कधीही घालवू नका (Never Loose Money) हा असून, ज्या क्षेत्रात तुमची समज, ज्ञान कमी आहे, अपुरी आहे तिथे गुंतवणूक करू नका, हा महत्त्वाचा दुसरा नियम आहे. गुंतवणूक क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल गुंतवणूकदारांना संभ्रमित अर्जुन तयार करीत असून, वॉरेन शांतपणे आपली नव अर्थगीता वय वर्षे फक्त 94 असताना सांगत आहेत!
गुंतवणूक भ्रम व भय :
सध्याचा कालखंड हा अत्यंत अनिश्चिततेचा व भूराजकीय बदलांचा असल्याने त्यातून निर्माण झालेले ‘भय’ सुरक्षित गुंतवणुकीकडे किंवा सोने अथवा डॉलर गुंतवणुकीकडे वळत आहे. सोन्याच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही जागतिक अर्थवातावरणाचा भय-निर्देशांक ठरतो. 1971 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी अमेरिकन डॉलरची सुवर्ण परिवर्तनीयता रद्द केली होती, तेव्हाही असेच सुवर्ण विक्रम झाले होते. गुंतवणुकीबाबत फक्त सुरक्षितता हा निकष अल्पकाळात व भयकाळातच उपयुक्त असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात सोने हे सर्वस्वीकृत साधन होते त्याची जागा डॉलरने घेतली व डॉलर गुंतवणूक सोन्याला पर्याय ठरली. आता डॉलरची मक्तेदारी संपवण्याचे प्रयत्न सुरू असून, यातून येत्या दशकात बहुकेंद्री चलन व्यवस्था प्रस्थापित होईल. यातून सुरक्षित व साठा पद्धतीच्या गुंतवणुकीचे परतावे घटणारे तर उत्पादक, गतिमान असणारी गुंतवणूक लाभदायी ठरणार, ही भविष्यवाणी महत्त्वाची ठरते. सोने हे भाववाढपासून सुरक्षा देणारे साधन म्हणून गेल्या 60 वर्षांत 100 डॉलरचे 6000 डॉलर करू शकले, हे जसे खरे आहे तसेच याच काळात 100 डॉलरचे 20,000 डॉलर स्टंडर्ड अँड पुअर म्हणजे शेअर गुंतवणुकीतून दिले, हेही खरे आहे.
गुंतवणूक सुदर्शन :
केवळ सुरक्षितता या निकषावरील गुंतवणूक साठेबाजी, सट्टेबाजी प्रवृत्त करते. यातून संपत्तीचे (सोन्याचे) केंद्रीकरण वाढते. डॉलर हे एकमेव सुरक्षित जागतिक चलन त्याच्या मक्तेदारीमुळे चलन दहशतवाद निर्माण करू शकले, हे चित्र येत्या दशकात हळुवारपणे बदलत जाईल याची प्रचिती डॉलरचा कर्ज डोलारा देत आहे. यामुळेच अमेरिकन अध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांना डॉलरचे स्वार्वभौमत्त्व टिकवण्याची चिंता लागली आहे. ब्रिक्सच्या प्रयत्नांना त्यांचा विरोध यासाठीच आहे. डॉलरला पर्याय म्हणून युरो चलनाचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही, तरी चीनच्या प्रभुत्वाखाली ब्रिक्स देश आपले व्यवहार डॉलर न वापरता करीत आहेत. अमेरिकन ‘स्वीप्ट’ ही आंतरराष्ट्रीय व्यवहार पूर्तता व्यवस्था बाजूला ठेवून नवी व्यवस्था स्वीकारली जात आहे. त्यामुळे रशियावर आर्थिक प्रतिबंध अमेरिकेला शक्य झाले नाही. उलट यातून रशियाने स्वस्त तेल निर्यातीला चालना देऊन अमेरिकेला उत्तर दिले.
पर्यायी चलन व्यवस्था :
डॉलर केंद्रित जागतिक चलनव्यवस्था आता तंत्रआधारित, बहुकेंद्री व्यवस्था बनत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही विरोध केला तरी ब्रिक्स व त्याची चलनव्यवस्था पद्धती डॉलरला कालबाह्य ठरवेल. नवी चलन व्यवहारपद्धती ब्लॉकचेनचा वापर करून अधिक सुरक्षित, वेगवान व नियंत्रित पद्धती होत आहे. यातून सोने व डॉलर यांचे महत्त्व आधार चलन म्हणून राहणार नाही. विश्वासार्हता, वेगवान हस्तांतरण व लाभ ही गुंतवणूक साधनाची नवी वैशिष्ट्ये सोन्यात नसल्याने त्याचे महत्त्व हळुवारपणे पण निश्चितपणे घटत जाईल, असे वॉरेन बफे यांना ठामपणे वाटते.
गुंतवणूक नवी रचना-नवे पर्याय :
गुंतवणूक सुरक्षित असणे यासोबत ती उत्पादक, वर्धिष्णू व लवचिक असणे हे आवश्यक ठरते. सोने व डॉलर गुंतवणूक सुरक्षा देत असली तरी उत्पादक, लवचिक वर्धिष्णू नसल्याने ती दीर्घकाळात नुकसानकारक ठरते. डिजि नेटवर्क आधारित नव्या मत्तामधील गुंतवणुकी या चांगला परतावा देतील. याचा अर्थ आपल्या एकूण पोर्टफोलियोत सोने फार महत्त्वाचे न ठेवता नव्या मत्ता अभ्यासपूर्वक निवडाव्यात व भविष्यकालीन तंत्रबदलातून येणार्या संधी घ्याव्यात हा वॉरेन बफेंचा सुवर्णसल्ला निश्चितच नवा मार्ग दर्शवतो. त्यावर वाटचाल आपण आपल्या जोखीम आवड व सुरक्षा प्राधान्य यातून करावयाची आहे !