

संदीप पाटील, गुंतवणूक सल्लागार
वॉरेन बफे हे नियोजनबद्धरीत्या आर्थिक उत्पन्न मिळवण्याबाबत जसे ओळखले जातात, तशाच प्रकारे जगातील महादानशूर व्यक्तींमध्येही त्यांची गणना होते. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या एकूण देणगीचा आकडा ऐतिहासिक मानला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार बफे यांनी त्यांच्या संपत्तीतील सुमारे 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त हिस्सा विविध सामाजिक कार्यांसाठी दान केला आहे.
गुंतवणूक विश्वातील अढळ ध्रुवपद आणि जागतिक अर्थकारणाचे दिशादर्शक म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे वॉरेन बफे. केवळ नफा कमावणारा एक व्यापारी अशी त्यांची ओळख मर्यादित नसून, एक तत्त्वज्ञ आणि दूरद़ृष्टी असलेला मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग त्यांच्याकडे आदराने पाहते. अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील ओमाहा या छोट्या शहरातून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणार्या एका महाकाय साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. आधुनिक कॉर्पोरेट इतिहासातील आपल्या अत्यंत प्रभावशाली आणि प्रदीर्घ कार्यकाळानंतर बफे यांनी अलीकडेच ‘बर्कशायर हॅथवे’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून निवृत्ती घेतली. जगभरात ‘ओमहाचे भविष्यवेत्ता’ म्हणून ख्याती मिळवलेल्या बफे यांनी केवळ बर्कशायर हॅथवेलाच नव्हे, तर जागतिक गुंतवणूकदारांच्या विचार पद्धतीला आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीच्या संकल्पनेला एक नवी दिशा दिली आहे.
95 वर्षीय वॉरेन बफे यांनी सलग सहा दशके बर्कशायरचे नेतृत्व केले. एका डबघाईला आलेल्या कापड गिरणीपासून सुरू झालेला हा प्रवास आज विमा, रेल्वे, ऊर्जा आणि ग्राहक उत्पादने अशा विविध क्षेत्रांत विस्तारलेल्या अवाढव्य जागतिक समूहापर्यंत पोहोचला आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य 1 लाख कोटी डॉलर्सच्या पुढे गेले असून, अमेरिकेच्या उद्योगविश्वात अशा प्रकारचा कायापालट अभूतपूर्व मानला जातो.
वॉरेन बफे यांच्या धोरणांमधून आणि जीवनानुभवातून आधुनिक गुंतवणूकदारांना जे धडे मिळतात, ते काळाच्या कसोटीवर आजही तितकेच सखोल आणि प्रभावी ठरले आहेत. बफे यांचा जन्म दि. 30 ऑगस्ट 1930 रोजी झाला. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये व्यावसायिक चातुर्य आणि अंकगणिताची आवड होती. वयाच्या अकराव्या वर्षी, जेव्हा मुले खेळण्यामध्ये रमलेली असतात, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला शेअर खरेदी केला होता. प्रत्यक्षात ती एका महान कारकिर्दीची नांदी होती. तारुण्यात वर्तमानपत्रे विकण्यापासून ते शीतपेयांच्या बाटल्यांच्या विक्रीपर्यंत त्यांनी अनेक छोटेखानी व्यवसाय केले. यातून त्यांनी केवळ पैसाच कमावला नाही, तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे गणितही समजून घेतले. त्यांच्या कारकिर्दीला खर्याअर्थाने कलाटणी मिळाली ती कोलंबिया विद्यापीठात, जिथे त्यांना बेंजामिन ग्रॅहम यांच्यासारखे गुरू लाभले. ग्रॅहम यांनी त्यांना ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणजेच ‘मूल्यधारित गुंतवणूक’ या सिद्धांताची ओळख करून दिली. याच सिद्धांताला बफे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनवले.
बफे यांच्या धोरणांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा संयम आणि दीर्घकालीन द़ृष्टिकोन. आजच्या काळात जिथे लोक रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात आणि शेअर बाजारातील छोट्या चढ-उताराने घाबरून जातात, तिथे बफे हे एका वटवृक्षाप्रमाणे शांत उभे राहतात. त्यांनी नेहमीच असा विचार मांडला की, तुम्ही एखादा शेअर खरेदी करत नसून, तुम्ही एका व्यवसायाचा हिस्सा विकत घेत असता. तो व्यवसाय उत्तम असेल, त्याचे व्यवस्थापन प्रामाणिक असेल आणि उत्पादनाची समाजात गरज असेल, तर काळानुसार त्याचे मूल्य वाढणारच. बर्कशायर हॅथवे या मूळच्या कापड उद्योगाचे त्यांनी ज्या पद्धतीने जागतिक दर्जाच्या इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये रूपांतर केले, ते त्यांच्या धोरणात्मक यशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी कोकाकोला, अमेरिकन एक्स्प्रेस आणि अॅपलसारख्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही केवळ नफ्यासाठी नव्हती, तर त्या कंपन्यांच्या भविष्यातील क्षमतेवर ठेवलेला तो अढळ विश्वास होता.
गुंतवणूकदारांनी बफे यांच्याकडून शिकण्यासारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘गुंतवणुकीतील शिस्त’. बफे म्हणतात की, जेव्हा बाजारात भीतीचे वातावरण असते तेव्हा तुम्ही लोभी बना आणि जेव्हा सर्वजण लोभी असतात तेव्हा तुम्ही सावध राहा.’ हा विचार मांडणे सोपे असले, तरी प्रत्यक्षात आणणे अत्यंत कठीण असते. मानवी स्वभाव हा नेहमी गर्दीच्या मागे धावणारा असतो; मात्र बफे यांनी नेहमीच गर्दीच्या विरुद्ध दिशेला उभे राहून आपले निर्णय घेतले. त्यांना तांत्रिक कंपन्यांचा (डॉट कॉम बबल) मोह झाला नाही. कारण, त्यांना तो व्यवसाय समजत नव्हता. ‘जे आपल्याला समजत नाही, तिथे गुंतवणूक करू नका’ हा त्यांचा अत्यंत साधा; पण तितकाच मोलाचा नियम आजच्या काळात ऑप्शन ट्रेडिंगच्या नादात लाखो रुपये घालवणार्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणारा आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या मर्यादा ओळखून आणि सखोल अभ्यास करूनच पाऊल टाकावे, हे त्यांचे सूत्र जगातील सर्व गुंतवणूकदारांसाठी ब्रीद ठरायला हवे.
बर्कशायरची संपूर्ण टीम प्रत्येक संधीचे मूल्यमापन करताना कमालीचा संयम बाळगते; मात्र बफे यांनी या संयमाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, आमचा संयम म्हणजे निष्क्रियता नव्हे. जेव्हा आम्ही संधीची वाट पाहत असतो, तेव्हा आम्ही आमचा बराचसा वेळ वाचन आणि अभ्यासावर खर्च करतो, जेणेकरून संधी समोर येताच आम्ही तत्काळ कृती करू शकू. खासगी कंपन्या असोत किंवा समभाग, योग्य वेळ येताच कृती करण्यासाठी सज्ज असणे, हाच त्यांच्या संयमाचा मुख्य उद्देश असतो.
आर्थिक साक्षरतेच्या द़ृष्टीने बफे यांनी मांडलेला ‘चक्रवाढ व्याजाचा’ (कंपाऊंडिंग) सिद्धांत हा संपत्तीनिर्मितीचा खरा मंत्र आहे. बफे यांची 90 टक्क्यांहून अधिक संपत्ती ही त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की, गुंतवणुकीला दिलेला वेळ हा गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. सातत्य आणि संयम हे दोन गुण ज्यांच्याकडे आहेत, त्यांना बाजार कधीही निराश करत नाही. त्यांनी नेहमीच साधे राहणीमान आणि बचतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, खर्च करून उरलेले पैसे वाचवू नका, तर आधी बचत करा आणि मग उरलेले पैसे खर्च करा. ही विचारसरणी आजच्या चैनीच्या आणि कर्जावर आधारित जीवनशैली जगणार्या पिढीसाठी एक आरसा आहे. अनावश्यक गरजा टाळून भांडवलनिर्मिती करणे हाच आर्थिक स्वातंत्र्याचा एकमेव मार्ग असल्याचे ते ठासून सांगतात.
बफे यांच्या धोरणांमध्ये ‘नैतिकता’ आणि ‘प्रतिष्ठा’ यांना सर्वोच्च स्थान आहे. त्यांनी आपल्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रांमध्ये नेहमीच स्पष्ट केले आहे की, प्रतिष्ठा कमावण्यासाठी 20 वर्षे लागतात; पण ती गमावण्यासाठी फक्त पाच मिनिटे पुरेशी असतात. व्यवसायात नफा मिळवणे आवश्यक आहेच; पण तो मिळवताना तुमची मूल्ये गहाण ठेवता कामा नयेत. बफे यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांच्या स्वभावात अधिक दडलेले आहे. त्यांनी कधीही शॉर्टकटचा अवलंब केला नाही. बाजारातील अस्थिरता त्यांना विचलित करू शकली नाही. कारण, त्यांचा विश्वास स्वतःच्या संशोधनावर आणि अभ्यासावर होता. आजचे गुंतवणूकदार अनेकदा सोशल मीडियावरील सल्ल्यावर किंवा अफवांवर आधारित गुंतवणूक करतात. अशावेळी बफे यांची ‘स्वतः शिका आणि स्वतः निर्णय घ्या’ ही शिकवण दीपस्तंभासारखी काम करते. आज जगभरातील गुंतवणूकदारांसाठी बफे हे केवळ एक आदर्श नसून, गुंतवणूक गुरू आहेत. ज्याला बाजार समजून घ्यायचा आहे आणि ज्याला आयुष्यात शाश्वत प्रगती करायची आहे, त्याने बफे यांच्या संयमाचा, त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि त्यांच्या साधेपणाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. त्यांच्या धोरणांचा सारांश हाच आहे की, गुंतवणूक ही केवळ पैशांची नसते, ती ज्ञानाची आणि वेळेचीही असते. जो स्वतःच्या ज्ञानावर गुंतवणूक करतो आणि काळाला आपला मित्र बनवतो, त्याला यशाची शिखरे गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सचोटी आणि संयम यांच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, हे त्यांचा जीवनालेख सांगून जातो.
बफे यांनी 2006 मध्ये आपली बहुतांश संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून ते दरवर्षी नियमितपणे बर्कशायर हॅथवे या त्यांच्या कंपनीचे शेअर्स दान करत आले आहेत. जून 2025 मध्ये त्यांनी दिलेल्या मोठ्या देणगीनंतर त्यांच्या एकूण दानाचा आकडा 60 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. या दानाचा मोठा हिस्सा बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन या संस्थेला दिला जातो. त्यासोबतच त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावावर असलेल्या सुसान थॉम्पसन बफे फाऊंडेशन आणि त्यांच्या मुलांकडून चालवल्या जाणार्या शेरवुड, हॉवर्ड जी बफे व नोव्हो फाऊंडेशन या संस्थांनाही मोठी मदत दिली जाते. वॉरन बफे यांनी आपल्या मृत्युपत्रात असे नमूद केले आहे की, त्यांच्या निधनानंतर त्यांची 99.5 टक्क्यांहून अधिक संपत्ती एका धर्मादाय ट्रस्टला दिली जाईल. या ट्रस्टची देखरेख त्यांची मुले करतील. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही बफे यांनी मानवी कल्याणासाठी दिलेले हे योगदान जागतिक स्तरावर सर्वोच्च मानले जाते.