Virat Kohli Anushka Sharma Alibaug Land Deal: मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये आता ‘सेकंड होम’ आणि लक्झरी व्हिलाचा ट्रेंड वेगाने वाढतोय. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध नोंदणी कागदपत्रांनुसार या दोघांनी अलिबागमधील सुमारे 5.1 एकर जमीन 37.86 कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
ही जमीन अलिबागमधील झिराड गावात असून त्यांनी ती सोनाली अमित राजपूत यांच्याकडून खरेदी केली आहे. या व्यवहारात शेजारील दोन भूखंडांचा समावेश आहे. ही खरेदी 13 जानेवारी रोजी झाल्याचे रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स कंपनी CRE Matrix ने सांगितले आहे. या व्यवहारासाठी सुमारे 2.27 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही सांगण्यात आले आहे.
या व्यवहारातील प्रक्रिया विराट कोहली यांच्या वतीने त्यांचे भाऊ विकास कोहली यांनी पूर्ण केल्याची माहिती आहे.
महत्त्वाचं म्हणजे, विराट आणि अनुष्कासाठी अलिबाग नवीन नाही. याआधी 2022 मध्ये त्यांनी अलिबागमध्येच जवळपास 8 एकर जमीन दोन वेगवेगळ्या व्यवहारांतून सुमारे 19.24 कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्या जमिनीवर त्यांनी नंतर एक लक्झरी व्हेकेशन होम उभारल्याचेही सांगितले जाते.
या जमिनीचा व्यवहार ज्या कंपन्यांच्या माध्यमातून झाला, त्या Samira Land Assets Pvt. Ltd. आणि Samira Habitats या एकाच समूहाच्या असून अलिबाग परिसरात या समूहाची मोठी जमीन आणि रिअल इस्टेटची कामं असल्याचेही समोर आले आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील निरीक्षकांच्या मते, अशा मोठ्या व्यवहारांचा स्थानिक बाजारावर थेट परिणाम होतो. विराट-अनुष्कासारख्या सेलिब्रिटींनी जमीन घेतली की त्या परिसरात “लक्झरी” आणि “हाय प्रोफाइल” घरांची मागणी वाढते. त्याचा परिणाम म्हणून पुढे अनेक श्रीमंत गुंतवणूकदारही त्या भागाकडे वळतात आणि जमिनींचे भावही वाढतात.
अलिबागमध्ये गेल्या काही वर्षांत लक्झरी प्रॉपर्टी आणि प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पूर्वी हे ठिकाण फक्त ‘वीकेंडला जाण्यासाठी’ आणि दक्षिण मुंबईतील काही श्रीमंत लोकांच्या व्हिलांसाठी ओळखलं जायचं. पण आता इथे गेटेड कम्युनिटीज, ब्रँडेड रेसिडेन्सेस आणि हाय-एंड हॉटेल्स यांच्या प्रोजेक्ट्सना वेग आला आहे.
यामध्ये मोठ्या डेव्हलपर्सचाही सहभाग वाढतोय. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी हिरानंदानी कम्युनिटीजने अलिबागमध्ये 225 एकरवर ‘हिरानंदानी सॅण्ड्स’ नावाचं टाउनशिप होणार असल्याचं जाहीर केलं, ज्यातून मोठ्या महसुलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय इतर मोठे डेव्हलपर्सही अलिबागमध्ये प्रीमियम प्रोजेक्ट्स उभे करत आहेत.