Budget 2024 Updates Income tax
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी (दि.२३) केंद्रीय अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला. file photo
केंद्रीय अर्थसंकल्प

Budget 2024 Updates Income tax |अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा, आता १७,५०० रुपये आयकर वाचणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी (दि.२३) केंद्रीय अर्थसंकल्पातून पगारदार, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला. नवीन कर प्रणाली अंतर्गत, स्टँडर्ड डिडक्शनच्या मर्यादेत ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून केली आहे. यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांचा १७,५०० रुपये आयकर वाचणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. (Budget 2024 Updates Income tax)

तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांसाठी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे.

नवीन कर प्रणाली अंतर्गत सुधारित कर स्लॅब असे

  • ०-३ लाख रुपये- शुन्य

  • ३- ७ लाख - ५ टक्के

  • ७ -१० लाख- १० टक्के

  • १०-१२ लाख- १५ टक्के

  • १२-१५ लाख - २० टक्के

  • १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर ३० टक्के

कर बचत होणार

स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ केल्याने पगारदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांची अधिक कर बचत होईल. पाच वर्षांनंतर प्रथमच स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वेळी, अंतरिम अर्थसंकल्प २०१९ मध्ये स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा ५० हजार रुपये करण्यात आली होती. आता पाच वर्षांनंतर त्यात वाढ करण्यात आली आहे.

"मी आयकर कायदा १९६१ च्या सर्वसमावेशक आढाव्याची घोषणा करते. यामुळे तंटे आणि खटले कमी होतील. ते ६ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे." असेही सीतारामन यांनी सांगितले.

काय आहे तरतूद?

सध्या, नवीन तसेच जुन्या कर प्रणाली अंतर्गत ५० हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन लागू आहे. जे पगारदार अथवा निवृत्ती वेतनधारक आहेत; त्यांच्यासाठी स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे, केवळ पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारक या डिडक्शनचा दावा करण्यास पात्र आहेत.

१७,५०० रुपये कसे वाचणार? जाणून घ्या गणित

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ज्यांचे करपात्र उत्पन्न १५ लाख किंवा त्याहून अधिक आहे अशा करदात्यांच्या नवीन कर प्रणाली अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शन मर्यादेत वाढ केल्यामुळे त्यांचे ७,५०० रुपये वाचतील. या लाभाव्यतिरिक्त दर सुसूत्रीकरणामुळे करदात्यांची १० हजार रुपयांची बचत होईल. यामुळे त्यांची एकूण कर बचत १७,५०० रुपये होईल.

SCROLL FOR NEXT