Tata Motors Price Hike Pudhari
अर्थभान

Tata Motors Price Hike: सणासुदीच्या तोंडावर टाटांचा मोठा झटका; 1 सप्टेंबरपासून कारच्या किंमती महागणार, किती रुपये वाढणार?

Tata Motors Price Hike: फेस्टिव्ह सीझनच्या तोंडावर टाटा मोटर्सने ग्राहकांना महागाईचा धक्का दिला असून, 1 सप्टेंबरपासून प्रवासी वाहनांच्या किमतीत 25 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tata Motors Price Hike: सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या विविध मॉडेल्सच्या किमतीत 1 सप्टेंबरपासून तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. वाढता उत्पादन खर्च आणि महागाईचा दबाव यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ही दरवाढ कंपनीच्या पेट्रोल, डिझेल तसेच इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होणार आहे. मात्र, प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार दरवाढीची रक्कम वेगवेगळी असेल. त्यामुळे कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या पसंतीच्या मॉडेलची नवीन किंमत तपासावी लागणार आहे.

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, वाढता खर्च आणि महागाईचा परिणाम पूर्णपणे कंपनीवरच न टाकता त्यातील काही भाग ग्राहकांवर टाकला जात आहे. कंपनी अजूनही वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा स्वतः सहन करत आहे, मात्र वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांवरही काही प्रमाणात भार टाकावा लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

टाटाच्या वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये छोट्या कारपासून प्रीमियम एसयूव्हीपर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. टियागोपासून सफारीपर्यंत आणि हॅरियर EVसारख्या इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या वाहनांची सध्याची किंमत साधारण 4.7 लाख रुपयांपासून 31 लाख रुपयांपर्यंत आहे.

पाच महिन्यांत तिसऱ्यांदा दरवाढ

विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षात टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. एप्रिलपासून अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत कंपनीने वारंवार किमतीत बदल केले आहेत.

एप्रिलमध्ये कंपनीने वाढत्या इनपुट कॉस्टचा दाखला देत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमतीत सरासरी 0.5 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर जुलैमध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली होती.

आता 1 सप्टेंबरपासून होणारी नवी दरवाढ ग्राहकांच्या खिशावर आणखी भार टाकणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या किमतींचा कार खरेदीदारांच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो.

नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी मॉडेलनुसार नेमकी किती दरवाढ होणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे सर्व वाहनांवर समान दरवाढ लागू होणार नसून, मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार किमतीत फरक असेल.

दरम्यान, वाढत्या कच्च्या मालाच्या किंमती, उत्पादन खर्च आणि महागाई हे वाहन उद्योगासमोर मोठे आव्हान बनला आहे. अशा परिस्थितीत कंपन्या वाढलेल्या खर्चाचा काही भाग ग्राहकांपर्यंत पोहोचवत असल्याचे चित्र आहे. फेस्टिव्ह सीझनच्या तोंडावर टाटा मोटर्सच्या या निर्णयामुळे नवीन कार घेण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट पुन्हा कोलमडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT