Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभर साजरा होत असताना, टाटा मोटर्सने या विजेत्या खेळाडूंना एक खास भेट दिली आहे. कंपनीने जाहीर केले की, भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ‘Tata Sierra’ SUV भेट दिली जाणार आहे.
2 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. हा क्षण भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. कारण भारताने प्रथमच महिला विश्वचषक जिंकला. या विजयात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र यांनी सांगितले की, “भारतीय महिला संघाने दाखवलेला आत्मविश्वास आणि निर्धार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. या विजेत्या खेळाडूंना आम्ही ‘Tata Sierra’ SUV भेट देऊन त्यांच्या कामगिरीला सलाम करतो.”
कंपनीने सांगितले की, संघातील प्रत्येक सदस्याला SUV चे टॉप मॉडेल भेट दिले जाणार आहे. ही गाडी 25 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार असून, विजेत्या संघाला Sierra च्या पहिल्या बॅचमधील गाड्या दिल्या जातील.
1990च्या दशकातील भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासात ‘Tata Sierra’ हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. ती देशातील पहिली ‘लाइफस्टाइल SUV’ होती. तीन दशकांनंतर टाटा मोटर्स ही गाडी पुन्हा आधुनिक रूपात आणत आहे.
Sierra मध्ये स्कल्प्टेड बोनट, शार्प कट लाइन्स आणि फ्रंटवर ‘SIERRA’ अशी आकर्षक नेमप्लेट आहे. LED लाइट बार, ब्लॅक्ड ग्रिल, ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि खास रॅप-अराउंड ग्लास डिझाइनमुळे गाडीचा लुक प्रीमियम दिसत आहे.
अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नसली तरी Tata Sierra ची किंमत ₹13.50 लाख ते ₹24 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. भारतीय बाजारात तिची स्पर्धा Mahindra Thar Roxx, MG Hector आणि Scorpio-N सारख्या SUV सोबत होईल.