Tata Group Dispute Pudhari
अर्थभान

Tata Group Dispute: टाटा समूहात सत्तासंघर्ष! चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; टाटा सन्सने घेतला मोठा निर्णय

Tata Group Dispute: टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.

Rahul Shelke

Tata Group Dispute: टाटा समूहातील टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला असून, टाटा सन्सने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे. टाटा ट्रस्ट्सकडून भविष्यात कोणतीही नवीन याचिका दाखल झाल्यास, आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश देऊ नये, यासाठी टाटा सन्सने हे पाऊल उचलले आहे.

टाटा समूहातील हा वाद प्रामुख्याने टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीशी आणि कंपनीच्या संचालक मंडळातील टाटा ट्रस्ट्सच्या अधिकारांशी संबंधित आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. आता दोन्ही पक्षांकडून न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला जात असल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

कॅव्हिएट म्हणजे काय?

कॅव्हिएट म्हणजे न्यायालयात दाखल केलेली एक प्रकारची कायदेशीर सूचना. एखाद्या प्रकरणात दुसऱ्या पक्षाने याचिका दाखल केल्यास, आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाने कोणताही आदेश देऊ नये, अशी विनंती कॅव्हिएट दाखल करणारा पक्ष करतो.

टाटा सन्सनेही याच कारणासाठी दोन्ही न्यायालयांत कॅव्हिएट दाखल केले आहे. त्यामुळे टाटा ट्रस्ट्सने नवीन याचिका दाखल केल्यास टाटा सन्सला आपली बाजू मांडण्याची संधी मिळू शकते.

मुंबई उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

टाटा ट्रस्ट्सने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ३० नोव्हेंबर रोजी होणारी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक थांबवण्याची मागणी केली होती.

मात्र, २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने ही बैठक रोखण्यास नकार दिला. त्यामुळे ३० नोव्हेंबरची बैठक नियोजित वेळेनुसार होऊ शकते. मात्र, या बैठकीत घेतले जाणारे निर्णय अंतिम निकालाच्या अधीन असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

टाटा ट्रस्ट्स सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा न मिळाल्याने टाटा ट्रस्ट्स सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दुसरीकडे, टाटा सन्सने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आधीच कॅव्हिएट दाखल करून संभाव्य कायदेशीर लढाईसाठी तयारी केली आहे.

नेमका काय आहे टाटा समूहातील वाद?

टाटा समूहातील या वादाची सुरुवात १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर झाली. या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यांचा नवीन कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.

मात्र, या निर्णयावर संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे एकमत नव्हते. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला. तर वीनू श्रीनिवासन यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

त्यानंतर बैठकीचे कार्यवाहक अध्यक्ष हरीश मनवानी यांनी आपल्या अतिरिक्त मताचा वापर करून हा प्रस्ताव मंजूर केला. याच निर्णयावरून टाटा ट्रस्ट्सने आक्षेप घेतला आहे. कंपनीच्या नियमांनुसार काही महत्त्वाचे निर्णय घेताना टाटा ट्रस्ट्सच्या प्रतिनिधी संचालकांची संमती आवश्यक असते, असे टाटा ट्रस्ट्सचे म्हणणे आहे. त्यामुळे अतिरिक्त मताचा वापर करून चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करणे योग्य नसल्याचा त्यांचा दावा आहे.

आता हा वाद न्यायालयीन पातळीवर पोहोचला असून, ३० नोव्हेंबरच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि २१ जानेवारीच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT